वेलकम टू इशापूर

42

 

खरा हिंदुस्थान अनुभवायचा असेल तर एकदा तरी ‘इशापूर’ला जायला हवं. येथे आजही मानवी रिक्षा धावत आहेत. नोटाबंदीमुळे त्यांच्या जीवनात फरक पडलाच नाही. लाल दिवे विझल्यामुळे त्यांचे जीवन उजळले नाही. हाच खरा हिंदुस्थान आहे काय?

ब्रिटिशांविरुद्ध पहिले बंड करणाऱ्या मंगल पांडेस फाशी दिले. त्या इशापूर परिसरात एक दिवस होतो. कोलकात्यापासून वीस किलोमीटरवर हे इशापूर. मुंबई-ठाणे तसे कोलकाता-इशापूर. ज्या झाडावर मंगल पांडेस फासावर लटकवले ते झाड अजूनही तेथे आहे. त्या झाडाखाली आजही दिवा लावला जातो. बाकी मंगल पांडेच्या आठवणींना उजाळा मिळावा असे तेथे आज काही उरले नाही. शहर तसेच बकाल आणि निर्जीव. पोटासाठी धावणाऱ्या मानवी रिक्षा रस्त्यांवर दिसतात. तेव्हा या अमानुषतेस संपवून त्यांना अच्छे दिन आणणारा राज्यकर्ता नावाचा ईश्वर या भूमीवर कधी अवतरणार असा प्रश्न पडतो. रिक्षात बसणारेही गरीब व रिक्षा ओढत पळणाराही गरीब. गरिबी गरीबाला ओढते आहे, पण अच्छे दिनाची मंझिल काही त्यास सापडत नाही.

पंतप्रधान मोदी यांनी दोन निर्णय गेल्या काही महिन्यांत घेतले. त्याचा या गरीबांच्या जीवनावर काय परिणाम झाला?
1) पंतप्रधान मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्या. नोटाबंदीमुळे श्रीमंत बँकेच्या रांगेत उभा राहिला. त्याबद्दल गरीबांनी टाळ्या वाजवल्या, पण कोलकात्यासारख्या मोठ्या शहरातही बैल घाण्यास जुंपावा तशी माणसे रिक्षाला जुंपून धावत असतात. हे क्रौर्य नोटाबंदीमुळे संपले नाही. इशापुरात ते जास्त दिसलं.
2) पंतप्रधान मोदी यांनी व्हीआयपी कल्चर संपविण्यासाठी मंत्री व अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे काढले हे योग्यच झाले, पण लाल दिवे काढले म्हणून गरीबांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले नाहीत. व्हीआयपी कल्चर संपवण्याआधी रिक्षा ओढून बैलांचे जीवन जगणाऱ्यांचे ‘कल्चर’ संपवले असते तर बरे झाले असते.

rokh-thok

इतिहास येथे आहे
इशापूरला काही लोक इच्छापूर असेही म्हणतात. हिंदुस्थानातील अनेक गावे आज विस्मृतीत आहेत, पण या गावांत इतिहासाची पावले उमटली आहेत. ती जतन करण्यात आपण कमी पडलो आहोत. मंगल पांडे येथे वावरला. येथे ‘हुगळी’ नदीच्या किनाऱ्यावर त्याने ब्रिटिशांविरुद्ध योजना आखल्या. त्याचे सशस्त्र बंड फसले व तो येथे फासावर गेला. तेव्हाचे इशापूर व आताचे इशापूर यात फरक आहे. इशापूर पूर्वी डचांची वसाहत होती. डच येथे ब्रिटिशांच्या आधी आले. m/s “ostend” या डच कंपनीने येथे बंदुकांच्या दारूची फॅक्टरी १७१२ साली सुरू केली. इशापूर तेव्हा बांकी बझार नावाने ओळखले जात होते. डच कंपनीने येथील स्थानिकांना रोजगाराची पहिली संधी उपलब्ध करून दिली. डचांचा पराभव करून ही फॅक्टरी इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतली. एक गोरे जाऊन दुसरे गोरे आले. इंग्रजांनी बंदुकांच्या दारूची फॅक्टरी बंद करून छोट्या बंदुकांचे उत्पादन सुरू केले. ‘0.303’ Bolt Action Rifle चे उत्पादन १९०४ साली तेथेच सुरू केले. ५६ एकरांचा हा परिसर. डच गेले, इंग्रज गेले. त्यांनी निर्माण केलेली ही ‘शस्त्र कंपनी’ आज आमच्या संरक्षण दलाच्या ताब्यात आहे. डच, इंग्रजांनी उभे केलेले हे काम आमच्या राज्यकर्त्यांनी किती पुढे नेले? हा संशोधनाचा विषय आहे. या परिसरातील रोजगाराचे मोठे साधन हीच फॅक्टरी आहे. मग इशापूरसाठी गेल्या १०० वर्षांत नवे काय उभे राहिले? इशापूर एक नाही. देशाच्या नकाशावर अनेक आहेत. कुठे मानवी रिक्षा धावत आहेत तर कुठे मानवी सापळे मरण्याची व आत्महत्यांची वाट पाहात आहेत.

इशापूर ही मंगल पांडेची जन्मभूमी किंवा कर्मभूमी नाही. त्याने ब्रिटिशांविरुद्ध पहिले सैन्य बंड केले, ते फसले व याच भागात त्याला फासावर लटकवले. योगायोग असा की, त्याच इशापुरात आज सैन्याला व पोलीस दलास लागणारी शस्त्र बनवली जातात, पण शस्त्रांस्त्रांचा पुरवठा होऊनही देश सुरक्षित नाही व दहशतवाद थांबलेला नाही. इशापुरात २००७ सालापासून बंदुका आणि पिस्तुलांचे उत्पादन सुरू झाले. इशापूरच्या कारखान्यात काय बनवले जाते ते पाहा –

Years Weapons Developed
2007 5.56 mm EXCALIBUR RIFLE
2007 30-06 SPORTING RIFLE
2011 12 BORE PUMP ACTION GUN (PB)
2013 ANTI RIOT GUN
2013 TEAR GAS GUN
2014 12 BORE PUMP ACTION SHOT GUN (NPB)
2014 l 32 PISTOL
2015 7.62 MM GHAATAK
2015 7.62 MM SNIPER RIFLE
2015 22 REVOLVER (NIDAR)
2016 5.56 MM ASSAULT RIFLE
2017 l 32 PISTOL (MODIFIED)

देशभरातील शस्त्र आणि दारूगोळा कारखान्यांत इतकी शस्त्र बनवूनही शेवटी सैन्यासाठी आधुनिक शस्त्रे परदेशातून आयात करावी लागतात. रशिया, अमेरिका, स्वीडन, फ्रान्सची लढाऊ विमाने, रायफली, तोफा आणि हेलिकॉप्टर्स कंपन्यांचे दलाल दिल्लीत तंबू टाकून कायम बसलेले आहेत. बोफोर्स तोफांपासून हेलिकॉप्टर घोटाळय़ापर्यंत घटनांनी फक्त धक्के बसतात. त्या धक्क्यातून आपण काहीच शिकायला तयार नाही. आमच्या सैन्याला हवी आहेत त्या ताकदीची आधुनिक शस्त्रे बनविण्याची क्षमता आमच्या लोकांत नाही. ते करण्यासाठी सर्व ‘इफ्रास्ट्रक्चर’ पुरवायला हवे ते मिळत नाही. हिंदुस्थानच्या शस्त्र कंपन्यांना परदेशी भागीदारी मिळत नाही. आमच्या शस्त्राना परदेशात मागणी नाही. फक्त महिलांना सुरक्षा मिळावी व त्यांना वापरता यावे यासाठी इशापूर फॅक्टरीने ‘निडर’ हे सगळ्यात स्वस्त आणि हलके रिव्हॉल्व्हर बनवले. स्वसंरक्षणासाठी महिलांना ते सहज वापरता येईल, पण एक वर्षात २० रिव्हॉल्व्हर विकली गेली नाहीत. याचे कारण असे की, आपल्या देशात शस्त्र परवाने आता सहज मिळत नाहीत. महिलांनी स्वसंरक्षण करायला हवे, पण पन्नास हजार रुपयांचे ‘निडर’ विकत घेण्याची ऐपत नाही व शस्त्र परवाना नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत सर्वाधिक शस्त्र परवाने मिळत होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरळ बंदी आणली. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात शस्त्र परवान्यांचे वाटप खिरापतीसारखे झाले. शस्त्र बाळगणे व सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे, पण हिंदुस्थानी बनावटीच्या शस्त्रांना आजही मागणी नाही व परदेशातून शस्त्र मागवण्यावर बंदी आहे. इशापूरसारख्या शस्त्र कारखान्यात नवे संशोधन सुरू आहे, पण निडरपासून घातकपर्यंत सर्व शस्त्रांची मागणी मर्यादित आहे. सतराव्या शतकात डचांनी उभारलेल्या कारखान्यांत आधुनिकतेची रंगसफेती झाली नाही. संरक्षण सिद्धतेवर आपण फक्त बोलतो. प्रत्यक्षात जमिनीवरील वस्तुस्थिती वेगळी आहे. डच आणि इंग्रजांनी अनेक क्षेत्रांत उभारणी केली. तोच वारसा घेऊन आपण पुढे चाललो आहोत. रेल्वेपासून संरक्षण सामुग्रीपर्यंत. इशापूरचे नाव कधीकाळी मंगल पांडेशी जोडले जात होते. हुगळी नदीच्या किनाऱ्यावर क्रांतीच्या स्मृतीची एकही खूण आढळत नाही.

खरा हिंदुस्थान पाहायचा असेल तर ‘वेलकम टू इशापूर.’ येथे आजही मानवी रिक्षा धावत आहेत. हाच खरा आपला हिंदुस्थान!

@rautsanjay61 – twiter handle
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या