रोखठोक : पुतळे तोडले, लेनिन आठवला!

rokhthokलेनिन तसा विस्मृतीतच गेला होता त्याच्या रशियातून आणि जगातूनही. त्रिपुरात त्याचे दोन पुतळे तोडले व लेनिनचे पुन्हा स्मरण झाले. कष्टकरी व श्रमिकांची हुकूमशाही यायलाच हवी असे त्याने सांगितले. ज्या ठिकाणी ती आली त्यांनी श्रमिकांना फक्त श्रमिकच ठेवले. त्यामुळे लेनिन बदनाम झाला व त्याचे पुतळेही लोकांनी तोडले…

त्रिपुरातील भाजप विजयाने कम्युनिस्टांचा शेवटचा किल्लाही साफ ढासळून गेला, पण या विजयापेक्षाही ‘त्रिपुरा’ आता गाजत आहे लेनिनचे दोन भव्य पुतळे बुलडोझर लावून तोडल्याने. निवडणुकीनंतर हिंसा उसळली. त्या हिंसेत लेनिनचे दोन पुतळे ‘मारले’ गेले. लेनिन हा १९१७ च्या रशियन क्रांतीचा नायक होता. दक्षिण त्रिपुरातील बेलोनिया चौकात लेनिनची ११.५ फूट उंचीची फायबर मूर्ती सोमवारी रात्री बुलडोझर लावून नष्ट केली गेली. मंगळवारी सबलम मोटार स्टॅण्ड भागातील लेनिनची मूर्ती उद्ध्वस्त करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरात पंचवीस वर्षे कम्युनिस्ट राजवट होती. या काळात राज्याचा व लोकांचा विकास झाला नाही. उद्योग आले नाहीत व रोजगार निर्माण झाला नाही. ‘आम्ही गरीब आहोत, तुम्हीही गरीब रहा’ या सूत्राने मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी राज्यकारभार चालवला. विकास म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण किंवा नीरव मोदी तयार करण्याचा कारखाना असेच माणिक सरकार यांना वाटले असावे. ते स्वच्छ आणि प्रामाणिक होते. ते स्वतः सरकारी सुविधा घेत नव्हते. सरकारी बंगला, गाडी ते वापरत नव्हते. सायकलवरून मंत्रालयात जात. हे इतरांप्रमाणे ढोंग नव्हते, पण जनतेने आपल्याला गरिबी दूर करण्यासाठी सातत्याने निवडून दिले याचा त्यांना विसर पडला. नव्या पिढीस गरिबीच्या चिखलातून बाहेर काढायला ते विसरले व गरिबीत खितपत पडणे हाच ‘मार्क्सवाद’, ‘लेनिनवाद’ या कारभाराविरोधातील बंडाच्या ठिणगीतून त्रिपुरात राजकीय परिवर्तन झाले. त्याच उद्रेकातून लेनिनचे पुतळे तोडले गेले. त्रिपुरातील नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार हजर होते. शपथ घेणाऱ्या अनेक मंत्र्यांनी माणिक सरकार यांचा ‘चरणस्पर्श’ करून शपथ घेतली. हा त्यांच्या सचोटीस नमस्कार होता.

विचारांचे मोल काय?
हिंदुस्थानातून कम्युनिस्टांची राजवट संपली याचा अर्थ विचार संपला असा होत नाही. पुस्तके जाळून, पुतळे फोडून विचार मारला जात नाही. मी स्वतः कम्युनिस्टांचा विरोध करतो. मुंबईसारख्या शहरात एकेकाळी कम्युनिस्टांचा प्रचंड प्रभाव आणि दहशत होती. त्यातून हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र कम्युनिस्टांची दडपशाही आणि सद्दी संपवून शिवसेना उभी राहिली हे सत्य आहे, पण त्यानंतर शिवसेनेने कम्युनिस्टांचे पुतळे फोडले नाहीत. उलट शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनात कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना आमंत्रित करण्याचे औदार्य शिवसेनाप्रमुखांनी दाखवले. कारण तोपर्यंत कम्युनिस्ट विचारांवर शिवसेनेने मात करून विजय मिळवला होता व जे कर्माने मेले त्यांना धर्माने का मारायचे, ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती.

उच्चाटन
खुद्द रशियातून मार्क्स व लेनिन यांचे तर चीनमधून माओ विचारांचे उच्चाटन झाले आहे. लेनिन यांचे पुतळे पेरिस्रोईकानंतर रशियातच पाडण्यात आले. तेव्हाही रशिया भूक, बेरोजगारी व बजबजपुरीच्या अराजकात होरपळत होता. ‘युक्रेन’ हा सोव्हिएत युनियनचा भाग होता. ‘युक्रेन’ हा रशियातून फुटून स्वतंत्र देश झाला. तेव्हा लेनिनचे १३२० पुतळे त्या देशाने स्वतःच दूर केले. हे नंतर सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेल्या अनेक राष्ट्रांनी केले. साम्यवादाने समतेचा पुरस्कार केला. पण रशियात नवा मिरासदार वर्ग निर्माण झाला. त्याला सर्व साधनसामग्री मिळत गेली. सुखाचे जीवन मिळाले. परदेशी प्रवास करता आला. नाटक, सिनेमांचा आस्वाद घेता आला. त्यांची मुलं उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर झाली. त्यांना उद्योग व रोजगारांत स्थान मिळाले. याच वर्गाविरुद्ध सर्वसामान्य लोकांत असंतोष निर्माण झाला. त्यापैकी कुणाची मोटार गेली की लोक तिरस्काराने पाहू लागले, चिडू लागले व शेवटी त्याच गरिबीविरुद्ध बंड करून रशियापासून प. बंगाल, त्रिपुरापर्यंतच्या कम्युनिस्ट राजवटी मोडून पडल्या. लेनिन आणि माओचा साम्यवाद अन्न, वस्त्र, निवारा देणार नसेल तर तो काय कामाचा? त्रिपुरातील दीपा कर्माकार या मुलीने तेथील दुरवस्था व बजबजपुरीवर प्रकाशझोत टाकला. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील ‘रियो’ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकमध्ये चौथे स्थान पटकावले ती दीपा त्रिपुराची. तिच्यामुळे हे राज्य चर्चेत आले. तिला पदक मिळाले नाही, पण ती चमकली. तिचे कास्यपदक थोडक्यात हुकले. सिंधू व साक्षी या दोन मुलींनी पदके जिंकली. पण दीपासह या दोघींना बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या महागड्या गाड्या भेट दिल्या. तेव्हा दीपाने विनंती केली, गाडीपेक्षा मला रोख रक्कम द्या. कारण ही गाडी त्रिपुरात उपयोगाची नाही. आगरतळा या राजधानीत रुंद रस्ते नाहीत व राज्यात बिनखड्ड्यांचे रस्ते नाहीत. ज्या राज्यात गाडी चालू शकत नाही असे राज्य २५ वर्षे कम्युनिस्टांच्या ताब्यात होते व माणिक सरकार तेथे मुख्यमंत्री होते.

कष्टकऱ्यांचे राज्य
लेनिनचा विचार आज पटणारा नाही, पण लेनिनला टाळून जागतिक राजकारणाचा इतिहास लिहिता येणार नाही. सोव्हिएत युनियनचे आता विसर्जन झाले आहे. सोव्हिएत युनियनचा संस्थापक कॉम्रेड लेनिनचे पुतळे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, पण लेनिन हा आपल्या काळात मार्क्सवादाचा महान उद्गाता होता. कष्टकऱ्यांची हुकूमशाही हा विचार त्याने मांडला. त्याने सरळ सांगितले की, हुकूमशाहीची कास धरल्याशिवाय जगात चिडलेल्या, दडपलेल्या वर्गाला कधीही सत्ता मिळालेली नाही. लेनिनचा हाच विचार सोप्या व वेगळ्या भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. जे आपले शोषण करतात, अपराध करतात त्यांचा प्रतिकार करा व सत्ता हाती घ्या. हीच कष्टकऱ्यांची हुकूमशाही व त्याच हुकूमशाहीचा मार्ग हिंदुस्थानातील लोकशाहीच्या ठेकेदारांनी स्वीकारला. लेनिन, स्टॅलिन किंवा माओ यांच्या राजवटी या निर्घृण होत्या, असे आमच्याकडील लोकशाहीवाले सांगतात तेव्हा हसू येते. राजकीय हत्या व राजकीय हिंसा म्हणजे आमच्या लोकशाहीच्या चरणी वाहिलेले प्रसादाचे फूल आहे. अशी फुले आम्ही नियमित वाहत असतो. त्रिपुरातील विजयानंतर तेथे हिंसा भडकवण्याचे व लेनिनचे पुतळे तोडण्याचे काहीएक कारण नव्हते. पण त्रिपुरातील विजय हा वैचारिक विजय नव्हता. त्रिपुरातील काँग्रेस व तृणमूल काँग्रेस संपूर्णपणे भाजपात विलीन करून हा विजय मिळवला गेला. त्यामुळे हल्लेखोर हे भाजपचे ‘भगवे गमचे घातलेले मूळचे तृणमूल’वाले आहेत. हिंसा व ओरबाडणे हेच त्यांचे राजकारण. त्रिपुरात भाजपची विचारधारा कालही नव्हती व आजही नाही. संघाच्या शाखा मोठ्या प्रमाणात प. बंगालात व तामीळनाडू, केरळातही आहेत, पण राजकीय यश लांब आहे. जयललितांच्या मृत्यूनंतर अम्मांची संपूर्ण अण्णा द्रमुक गिळण्याचाही प्रयत्न झाला, पण तो घास गिळणे जमले नाही.

सावरकरांचे काय?
ईशान्येकडील विजयाचे अभिनंदन करायला हवे. पण त्या राज्यांची परंपरा आहे की, ज्यांची केंद्रात सत्ता त्यांचेच राज्य साधारण या लहान राज्यांत असते. उद्या केंद्रात सत्ताबदल होताच एका रात्रीत येथील आमदारांचे घाऊक मतपरिवर्तन होईल व त्रिपुरात लेनिनचे पुतळे नव्याने उभे राहतील. काँग्रेस राजवटीत कम्युनिस्ट विचारसरणीच्या मणिशंकर अय्यरने अंदमानातील वीर सावरकरांचा पुतळाच हटवला किंवा त्यांच्या पुतळ्याखालील क्रांतिकारक ओळी पुसल्या तेव्हा कम्युनिस्टांनी आनंद व्यक्त केला. त्यांना आनंदाचे उधाण आले. सावरकर तर याच भूमीतले व मातीतले होते. त्यामुळे लेनिनचे पुतळे मारले म्हणून डाव्यांना छाती पिटण्याचा नैतिक अधिकार आहे काय?

विकृत स्टॅलिन
लेनिन हा क्रांतिकारक होता व त्याने कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला. त्याने समाज व त्याच्या देशाची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी ‘नको’ असलेल्यांना संपवून टाकले. आपल्यानंतर स्टॅलिनच काय तर कोणाही नेत्याच्या हाती अनिर्बंध सत्ता येऊन तो मदांध होऊ नये ही लेनिनची इच्छा होती. यासाठी २३ साली एका डोंगराळ भागात झिनोव्हिव, बुखारिन, व्होरोशिलॉव्ह वगैरे जमले आणि सामुदायिक नेतृत्व कसे आणावे याची चर्चा केली, पण एकमत झाले नाही. बुखारिन इतरांच्या विरुद्ध गेला. पुढे बुखारिनला पाठिंबा देऊन स्टॅलिनने इतरांचा काटा काढला. लेनिनपेक्षा स्टॅलिनची राजवट क्रूर होती. एका अर्थाने विकृत होती. त्याच्या बायकोने आत्महत्या केली. त्या दिवशी संध्याकाळी क्रेमलिनमध्ये एक पार्टी होती. स्टॅलिनची पत्नी अगोदर आली होती व ती हास्यविनोद करीत होती. ते करीत असताना तिने तत्कालीन अधिकाऱ्यांबद्दल हसत हसत टीका केली. तेवढय़ात तेथे आलेल्या स्टॅलिनने ते ऐकले व त्याला अतिशय संताप आला. त्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर जळकी सिगारेट फेकली. या अपमानाने व्यथित झालेल्या स्टॅलिन पत्नीने त्या रात्रीच आत्महत्या केली. स्टॅलिन व त्याचा मुलगा यांचे अजिबात पटत नव्हते. नेहमी खटके उडत. एकदा रागाच्या भरात या मुलाने स्वतःवर गोळी मारून घेतली. ती नीट लागली नाही व तो जखमी झाला. धड गोळीही मारता येत नाही अशी स्टॅलिन नंतर त्याची नेहमी निर्भर्त्सना करी. स्वतःचा मुलगा वाचला याचा आनंद त्याला नव्हता. कम्युनिस्टांत ही विकृती सतत दिसत आली.

लेनिनचे स्मरण!
रशियातच लेनिन उरला नाही तेथे तो इतर देशात तरी कसा उभा राहणार? ‘‘प्रत्येक महान व्यक्ती दोनदा निधन पावते,’’ असे उद्गार कवी कुसुमाग्रजांनी आपल्या भाषणात काढले होते. ‘‘महान व्यक्ती एकदा शरीराने मरते आणि नंतर त्याचे शिष्योत्तम त्याच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा निकाल लावतात तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्यांदा मरते.’’ अनेक नेत्यांच्या बाबतीत हेच घडले आणि कार्ल मार्क्सच्या बाबतीत त्यांच्या रशियन भूमीवर आणि कम्युनिस्ट युरोपमध्ये तेच घडले. ‘सबंध जगातील कामगारांनो, एक व्हा’, अशी घोषणा कार्ल मार्क्सने दिली. पिळवणूक करणाऱ्यांच्या हातातील सत्ता श्रमणाऱ्यांच्या हाती गेली पाहिजे, असा राजकीय आणि आर्थिक विचार त्यामधून स्थिर झाला. लेनिनने तो पुढे नेला, कृतीत आणला. त्या लेनिनचे पुतळे त्रिपुरात फोडले म्हणून लेनिनचे पुन्हा स्मरण झाले.

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या