टागोर आज हवे होते! लुसलुशीत कोकरांची मेजवानी

200

rokhthokरवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ सालात ब्रिटिश राजवटीविषयी जे सत्य सांगितले ते २०१७ सालातही कायम आहे. नुसत्या भाषणांनी पोट भरत नाही, पण लोकशाहीच्या मालकांचे मत वेगळे आहे. गरीबांना गरीबच ठेवायचे हेच ब्रिटिश धोरण आज कायम आहे. कोकरांची बिर्याणी व मेजवानी हेच राज्यसूत्र कायम आहे.

रवींद्रनाथ टागोर हे आपल्याला कवी म्हणून सगळ्यात जास्त परिचित आहेत. त्यांच्या कवितासंग्रहास साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला नसता तर कवी म्हणूनही त्यांच्या स्मृती कदाचित पुसल्या गेल्या असत्या, पण टागोर यांचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदानही प्रेरणादायी आहे. त्यांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान लिहिले. ते इतक्या वर्षांनंतरही रोमांचक, तितकेच वादग्रस्त ठरले आहे. जे ‘वंदे मातरम्’ गात नाहीत ते राष्ट्रद्रोही व जे गातात तेच केवळ राष्ट्रभक्त हे आता अधोरेखित झाले आहे. वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांना देश सोडून जावे असे बजावले जाते, पण त्याबाबतचा कायदा करायला कोणतेही सरकार तयार नाही. ‘वंदे मातरम्’ हे आता ‘धर्मा’शी जोडले गेले. ते देशाच्या भावनेशी जोडले गेले असते तर योग्य झाले असते. देशातील जनतेची मने दुबळी झाल्याचा हा परिणाम. दुबळ्या मनाच्या लोकांवर भामटे राज्य करतात. भामटे लोकशाही मार्गाने निवडून येतात व हुकूमशाही पद्धतीने देशाचे मालक होतात. इंग्रजांच्या बाबतीत नेमके तेच घडले व टागोरांनी एक विचारवंत म्हणून त्या काळात हे धोके दाखवून दिले आहेत.

माणसे बदलत राहिली
रवींद्रनाथ टागोरांचे ‘Greater India’ हे निबंधाचे पुस्तक वाचनात आले. १९०५-०६ या काळात लिहिलेले हे निबंध. ते वाचल्यावर आजही वाटते की, देशात खुर्चीवरील माणसे बदलली म्हणजे सत्तांतर झाले असे नाही. स्वराज्य मिळाले तरी स्थिती बदलतेच असे नाही. रवींद्रनाथ द्रष्टे कवी होते. प्रज्ञा व प्रतिभा यांचा दुर्लभ संगम त्यांच्या ठायी होऊन ते महाकवी बनले. या निबंधातून तीन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडल्या आहेत. स्वराज्य स्वावलंबनाने व त्यागाने मिळेल ही पहिली गोष्ट. त्यासाठी राष्ट्र व्यापक संघटना करून तिच्याद्वारे समाजसेवा व प्रचार करून जनजागृती करणे ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना प्रेमाने नांदवण्याचा महान भारतीय प्रयोग. (या तिन्ही गोष्टींची स्वराज्यात वाताहत सुरू आहे.) टागोरांनी ज्या वेळेस हे निबंध लिहिले त्या वेळेस राष्ट्रात भिक्षांदेही करणारा एक राजकीय पक्ष व दुसरा प्रखर जहाल पक्ष असे दोन पक्ष होते. टागोरांनी त्या वेळेस सांगितले की, ‘‘भिक्षांदेहि म्हणजे लाचारी त्याज्य आहे. त्याबरोबर केवळ आदळआपट करणे म्हणजेही सामर्थ्य नव्हे.’’ टागोर पुढे सांगतात ते महत्त्वाचे. ‘‘आज हिंदू-मुसलमान परस्परांचे शत्रू होऊ पाहात आहेत. हिंदूंचाच हिंदुस्थान असे कोणी म्हणत आहेत तर हिंदुस्थानात एक स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करू असे मुसलमान म्हणत आहेत.’’ टागोरांनी जे म्हटले त्यास शतक लोटले, पण आजही स्थिती तीच आणि तीच आहे.

धर्म मेला तर…
ब्रिटिशांच्या राजवटीची आठवण यावी असे काही आपल्या सभोवती आता घडत आहे काय? असा प्रश्न टागोरांचे निबंध वाचताना आला. टागोरांनी वेदांतील काही वचने दिली आहेत. वेदांतील ऋषी म्हणतो,
‘‘केवलाघो भवति केवलादी’’
जो एकटा खातो तो केवळ पापी होय. (आज आपण काय पाहात आहोत?)’’
‘‘धर्म एवं हतो हन्ति’’
धर्म जेथे मेलेला असेल तेथे लोक तरी कोठून जिवंत राहणार? तुम्ही धर्माला मारलेत की तोही तुम्हाला मारतो. धर्म एकटा मरत नाही. मारणाऱ्यास बरोबर घेऊन तो मरतो. ब्रिटिश लोक साम्राज्यामुळे आज वैभवशाली झाले आहेत (म्हणजे सत्तेमुळे). परंतु येथील जनतेला मान म्हणून वर करू द्यायची नाही असेच धोरण जर दुर्दैवाने ब्रिटिश चालवतील तर त्यांचाही मोठेपणा मातीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. देश दुबळा करणे, देशातील लोकांत सदैव दुही ठेवणे, देशातील लोकांच्या नैसर्गिक शक्तींच्या विकासास अवकाश न देता, त्यांची वाढ होऊ न देता, त्या मारून टाकणे आणि अशा शेकडो प्रकारांनी तो देश मुर्दाड, मृतवत व पंगू करून ठेवणे, परावलंबी करणे ही इंग्लंडची आजची राज्यपद्धती आहे. (नोटाबंदी व जीएसटीने देशात आज वेगळे काय सुरू आहे?) श्री. टागोर यांनी पुढे जे सांगितले त्या स्थितीशी आजची तुलना केली तर आजही आपण ‘इंग्रज’ युगातच वावरत आहोत असा भास झाल्याशिवाय राहणार नाही. टागोर सांगतात, इंग्लंडच्या हृदयात दुसऱ्याच्या दुःखाने कारुण्याचे झरे आज फुटत नाहीत. पददलित व अभागी लोकांसाठी त्यांच्या हृदयात सहानुभूतीचा लवलेश नाही. दुसऱ्यावर सत्ता गाजवणे हीच आज त्यांची मोठेपणाची कल्पना आहे. दुसऱ्याला गुलाम करण्यात त्यांना पुरुषार्थ वाटत आहे. साहसाच्या गोष्टी दूर राहून स्वार्थाच्या व लुटालुटीच्या गोष्टीतच त्यांचे सारे शौर्य, धैर्य काम करून राहिले आहे. धर्मास त्यांनी हद्दपार केले आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थाला देशभक्ती हे बडे नाव त्यांनी दिले आहे.

लोकशाही हीच हुकूमशाही
देशात हुकूमशाही सुरू आहे असे मला वाटत नाही. लोकशाहीतही एक ‘छुपी’ हुकूमशाही वळवळत असते. अशी हुकूमशाही पंडित नेहरूंचीही होती व इंदिरा गांधी, सोनिया गांधींची होती. आता ती मोदी व शहांची आहे, पण लोकांनी त्यांच्या पक्षाला निवडून दिल्याने त्यांची हुकूमशाही आली आहे, पण सर्व पोलीस व कायद्याच्या यंत्रणांचे ‘मातम’ निर्माण झाल्याने जे चुकीचे घडत आहे त्यावरही कुणी बोलायला तयार नाही. तोंडास कुलूप लावून बसण्यातच शहाणपण आहे असे प्रत्येकाने ठरवले आहे. सीबीआय पोलीस व ईडी नामक भस्मासुर हे राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठीच जणू निर्माण घातले आहेत. हे वर्षानुवर्षांचे प्रताप आहेत. एका गावातील खेडूत कोळय़ांची गोष्ट टागोर सांगतात. एका खेडय़ातील कोळय़ांना पोलिसांनी फार त्रास दिला. मी कोळ्यांना सांगितले, ‘‘घाबरू नका, कलकत्त्यातील चांगलासा वकील तुम्हाला देतो. तुम्ही हक्कासाठी भांडा.’’ परंतु त्या कोळ्यांचा पुढारी हात जोडून म्हणाला, ‘‘महाराज, आम्ही हा खटला समजा जिंकला तरी काय? पोलिसांची आणि आमची रोजचीच गाठ आहे. ते दुसरी कुरापत काढतील व आणखीन अधिकच त्रास देतील. सूड घेतील.’’ मी मनात विचार केला व म्हटले, ‘‘खरे आहे. दुबळ्या लोकांना हक्क मिळणे म्हणजे फारच मोठे कठीण काम आहे.’’ रोगी फारच दुबळा असेल तर शस्त्रक्रिया नीट पार पडूनही रोगी शेवटी दगावायचाच!’’

टागोरांनी आणखी एक गोष्ट त्या काळात सांगितली.
एकदा एक कोकरू ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले, ‘प्रभो, मी काय करू? सारे मला खातात. असे का बरे?’’
ब्रह्म म्हणाला, ‘‘मी तरी काय करू? तुला पाहून खाऊन टाकावे असा मलाही मोह होत आहे.’’
दुबळ्या व नालायक लोकांस न्याय मिळवून देणे देवांनाही कठीण होते. मग सरकारे व न्यायव्यवस्था आपणास न्याय देतील अशी आशा करण्यात काय अर्थ? आपण जसे दीनदुबळे आहोत, तसेच जगाच्या अंतापर्यंत आपण राहावे असेच राज्यकर्त्यांना वाटत असते. कोकरू जर का जरा बलवान झाले तर पुढे त्याला मटकावताना ते तितके लुसलुशीत लागणार नाही, जरा टणक लागेल, अशी त्यांना भीती वाटते.
‘‘देवो दुर्बल घातकः’’ हे चिरंतन, सनातन सत्य आहे.
ब्रिटिश गेले तरी तेच सत्य मागील पानावरून पुढे फडफडत येत आहे!
टागोर असते तर आजही त्यांनी हेच सत्य पुन्हा मांडले असते!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या