नवे वर्ष ‘रांग’मुक्त ठरो!

82

काय मावळले? काय उगवले?

संजय राऊत

[email protected]

देशाला संभ्रमात टाकणारे व जनतेला ५० दिवस रस्त्यावर आणणारे वर्ष म्हणून २०१६ इतिहासात लक्षात राहील. देशाची अर्थव्यवस्था मावळत्या वर्षात मरण पावली. त्या मरणाचा शोक उगवत्या वर्षातही सुरूच राहील. आर्थिक अराजकामुळे लोकांच्या जगण्याची आशा मावळली असेल तर नवे वर्ष उजाडून तरी काय प्रकाश पडणार? पण तरीही निराशा झटकून नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि नवीन वर्षात कश्मीरात आमचे जवान शहीद होणार नाहीत इतकी तरी अपेक्षा करूया! देशाला संभ्रमात टाकणारे वर्ष म्हणून २०१६ हे वर्ष दीर्घकाळ लक्षात राहील. जगाच्या बाबतीतही जवळजवळ तेच घडले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांची निवड तेथील जनतेने केली. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला जी वचने दिली, त्यामुळे तेथील जनता हुरळून गेली व त्यांनी जुन्याजाणत्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला; पण श्रीमान ट्रम्प हे जनतेला दिलेले एकही वचन पूर्ण करू शकणार नाहीत व हिंदुस्थानात ‘नोटाबंदी’सारखे प्रकरण झाले तसे एखादे प्रकरण घडवून अमेरिकेतील जनतेचे महत्त्वाच्या प्रश्‍नावरील लक्ष विचलित केले जाईल. हिंदुस्थानात मावळत्या वर्षात जे घडले त्याचे पडसाद २०१७ सालात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधान मोदी यांना लोकसभेत प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे केंद्रात राजकीय अस्थिरतेचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, पण अस्वस्थता आणि अशांतता यांनी भरलेले २०१६ हे वर्ष फार वेगाने संपले आणि गतवर्षाने काही चांगले पेरून न ठेवल्यामुळे २०१७ हे वर्ष अधिक अशांततेचे आणि देशाला व जगाला अधिक दुरवस्थेकडे नेईल असे दिसते.

फसलेले अर्थकारण

२०१६ हे वर्ष फसलेली नोटाबंदी व आर्थिक अराजकतेचे वर्ष म्हणून इतिहासात नोंदले जाईल. ‘नोटाबंदी’चा निर्णय घेताना पंतप्रधानांनी संसदेला आणि स्वत:च्या सरकारलाही विश्‍वासात घेतले नाही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी जे कमावले ते सध्याच्या पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी गमावले. विकासाच्या बाबतीत देश ३० वर्षे मागे गेला, असे सर्वच अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ‘नोटाबंदी’नंतर देशात महागाई कमी होईल असे सांगितले ते खरे ठरले नाही. लोकांच्या नोकर्‍या रोज जात असल्यामुळे देशात भूकबळी वाढून सोमालिया किंवा इथियोपियासारखी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? जानेवारीच्या अखेरीस नव्या घटना सुरू होतील. त्यानंतरच्या चार महिन्यांत देशात उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्ष नव्या घोषणांची उधळपट्टी करेल आणि हे सारे कशासाठी? यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसांचे भवितव्य कसे सुधारणार? असा चेहरा करून सामान्य माणूस ‘महागाईचे ओझे’ खांद्यावर घेऊन आपली वाटचाल कशीबशी चालू ठेवील. राजकारणावरील उरलासुरला विश्‍वासही २०१६ सालात नष्ट केला. कुणाचीही बाजू घेणे अशक्य व्हावे या स्थितीत नेते मंडळी गेली आहेत आणीबाणीनंतरच्या संघर्षात जयप्रकाश नारायण यांच्यासारख्यांचे नेतृत्व लाभले तेव्हा देश नव्या क्रांतिमार्गाने जाईल, अशा अपेक्षेत जनता होती. तो कालखंडही निरुपयोगी ठरला. घराणेशाहीच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या देशातील बहुतेक वृत्तपत्रांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाशी लढाई दिली. परंतु जनता पक्षाचे मोरारजी सरकार २२ महिने जेमतेम टिकले. विश्‍वनाथ प्रतापसिंगांचे सरकार ११ महिन्यांत उधळले गेले. पण भ्रष्टाचार, काळे धन यांचे दोन क्रूस तेवढे आम्हा हिंदुस्थानींच्या खांद्यावर राहिले. जणू काही ज्याने त्याने आपल्यासाठी आवश्यक वाटेल तेव्हा उपयोगात आणावे.

पवारांचे सत्य

हिंदुस्थानची आर्थिक स्थिती आज साफ खालावलेली आहे व गेल्या पन्नास दिवसांत आमची अर्थव्यवस्था दगावली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. आशिया खंडात आमची अर्थव्यवस्था त्यातल्या त्यात बरी चालली होती. त्याचेही मातेरे आता झाले. आता साधा प्रश्‍न असा आहे की, एकटे पंतप्रधान मोदी मृत अर्थव्यवस्थेत जान कशी फुंकणार? जाहीर सभांतून धमक्या देऊन व श्रीमंतांना धडा शिकविण्याची भाषा करून ती सुधारणार नाही. ‘नोटाबंदी’ व जबर आर्थिक निर्बंधांमुळे उद्योग संकटात येईल व लाखो लोक रोजगार गमावतील. तो दिवस हिंदुस्थानला कायमचा खड्ड्यात टाकणारा ठरेल. विरोधकांविरुद्ध सरकारी यंत्रणा वापरणे ही हुकूमशाहीची शेवटची पायरी आहे व त्या शेवटच्या पायरीवर देश उभा असेल तर येणारा काळ कठीण आहे.

निवडणुका महत्त्वाच्या

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका नवीन वर्षात होतील. त्या श्री. मोदी यांना जिंकता आल्या तर ‘नोटाबंदी’चा कौल जनतेने स्वीकारला असे त्यांना जोरदारपणे म्हणता येईल. पण विचार आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका आता लढवल्या जात नाहीत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी पूर्णपणे फुटली आहे. अखिलेश यादव यांची प्रतिमा उत्तम आहे, पण पक्षातले मतभेद रस्त्यावर आले. बसपाला बदनाम करण्यासाठी व आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्रातील लोक कामाला लागले आहेत. काँग्रेस तेथे अस्तित्वहीन आहे. या सगळ्याचा फायदा ‘भाजप’ला झाला तर तो ‘नोटाबंदी’चा कौल असे मानता येणार नाही. नवीन वर्षात देशाला नवे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती मिळतील आणि ते संपूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले असतील.

पंतप्रधानांचे दर्शन

पंतप्रधान मोदी हेच वृत्तवाहिन्यांवर सतत दिसत आहेत. पंतप्रधानांचे दर्शन हीच जणू काही एकमेव बातमी. ती चार-पाचदा दिली जाते. मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना काम उरलेले नाही. तरीही मंत्री भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल, विमान प्रवासावर किती खर्च करीत आहेत हे लक्षात येते; पण सरकार चुकते आहे, असे सांगणारे राष्ट्रीय नेतृत्व देशात उरलेले नाही. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातही ते दिसत नाही. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी आग्रा येथे कार्यक्रम झाला. आग्र्याचे महापौर भाजपचे. या महापौरांनी श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना जिवंतपणीच दिवंगत ठरवून श्रद्धांजली अर्पण केली! वाजपेयी, आडवाणी यांच्या नेतृत्वाचा विसर पडला व ते जिवंतपणीच विस्मृतीत गेले. सोनिया गांधीही अलीकडे कुठेच सक्रिय दिसत नाहीत. मुलायम, लालू यादवांचे बरे चाललेले नाही. चंद्राबाबू, ममता बॅनर्जी यांना मर्यादा आहेत. राष्ट्रीय राजकारणात विरोधी आवाज दडपला गेला तर हिंदुस्थानातील राजकीय स्थिती नाजूक होईल व लोक एकमेकांचे लचके तोडू लागतील. विरोधकांवर टीका करणे व बदनाम करणे ही राजकीय विचारसरणी असू शकत नाही. भाजपची विचारसरणी हिंदुत्वाची असेल तर त्यांनी राम मंदिर, समान नागरी कायदा व ३७० कलमावर आता घूमजाव करता कामा नये. केवळ युद्ध आणि दहशतवादामुळेच राष्ट्र उद्ध्वस्त होत नाही तर राजकीय विचारसरणीचा डोलारा कोसळून पडतो तेव्हा माणसांचे पशू होतात. ते एकमेकांचे लचके तोडू लागतात. महाभारतावर ती वेळ राज्यकर्त्यांंनी आणू नये. सामान्य लोकांना चोर, बेइमान ठरवून ५० दिवस रांगेत उभे करून वर्ष मावळले आहे, पण आर्थिक अराजकामुळे लोकांच्या जगण्याची आशा मावळली असेल तर नवे वर्ष उजाडून तरी काय प्रकाश पडणार? पण तरीही निराशा झटकून नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि नवीन वर्षात कश्मीरच्या सीमेवर आमचे जवान शहीद होणार नाहीत इतकी तरी अपेक्षा करूया. नवीन वर्षात ‘रोकड्या’चा व्यवहार संपेल. निदान पंतप्रधानांचे एक स्वप्न साकार होईल. त्या स्वप्नपूर्तीसाठी किती गरीबांच्या नोकर्‍या जातील व किती भूकबळी होतील तेवढेच आता पाहू. मावळत्या वर्षाने सोसलेले दु:ख मोठे आहे. ते नवीन वर्षात थोडे तरी कमी होवो!

आपली प्रतिक्रिया द्या