रोखठोक: भय्यूजी वैकुंठी गेले, उदयसिंग साधू जाहले!

200

rokhthokभय्यूजी महाराज नामक एक आध्यात्मिक गुरू होऊन गेला, याचा विसर लोकांना आठ दिवसांत पडेल. काही काळ स्मरणात राहिली ती त्यांनी केलेली आत्महत्या. ताणतणाव, मरण रोखण्याची ताकद अध्यात्मातही नाही. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे धडेही कुचकामी ठरतात. भय्यूजींनी मरण का पत्करले?

य्यूजी महाराजांनी आत्महत्या का केली? यावर आणखी चार दिवस चर्चा होईल. पुढे सगळे शांत होईल. भावनांचे कल्लोळ हे राजकारणातील लाटेसारखे असतात. ते दीर्घकाळ थांबत नाहीत. ‘भेकडासारखे जगू नका. परिस्थितीला हिमतीने सामोरे जा. तुम्ही मेलात तर तुमच्यामागे कुटुंबाचे काय होईल ते पहा,’ असे भय्यूजी महाराज म्हणजे उदयसिंग देशमुख महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सांगत, पण शेवटी ‘महाराज’ही त्याच आत्महत्येच्या मार्गाने गेले. कौटुंबिक ताणतणावातून, आर्थिक विवंचनेतून भय्यूजींनी स्वतःवर गोळी झाडून मरण पत्करले. ‘‘माझ्या कुटुंबाची कोणीतरी काळजी घ्या हो.’’ असाच आक्रोश करीत गेले. भय्यूजी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे मरण पावले. त्यांचे अध्यात्म, त्यांचे राजकीय लागेबांधे, त्यांचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हे सर्व तिथल्या तिथेच राहिले. मरणोत्तर सर्वच मातीत मिसळतात, पण विचारवंतांच्या विचारांना दिव्य आयुष्य असते. भय्यूजी कोणता विचार मागे ठेवून गेले? भेकडांसारखे जगू नका. आत्महत्या करू नका, असे सांगणारे भय्यूजी स्वतः आत्महत्या करून मोकळे झाले.

आकर्षक व्यक्तिमत्त्व
भय्यूजींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि राजबिंडे होते. ते सिनेमात गेले असते तर चंदेरी दुनियेचे ‘शहेनशहा’ झाले असते. त्यांनी काही काळ ‘मॉडेलिंग’ केले असे म्हणतात, पण त्यांचे रसदार व्यक्तिमत्त्व व पाणीदार डोळे हेच त्यांचे आकर्षण केंद्र होते. ‘मॉडेलिंग’ करणारा, स्वच्छंद जगणारा माणूस अध्यात्म, ‘गुरू’बाजीकडे कसा वळला? असे अनेकजण वळले आहेत. चित्रपटसृष्टीत ऐनभरात असताना विनोद खन्नाने संन्यास घेतला होता व तो आचार्य रजनीश यांच्या आश्रमाचा सेवेकरी झाला होता. मात्र तो पुन्हा ‘मोह, माया, संसार’ या दुनियेत आला व राजकारणात शिरला. बुडणारा प्रत्येकजण काडीचा आधार शोधत असतो व अशा ‘काड्या’ घेऊन अनेक ‘अध्यात्म’वाले राजकीय वर्तुळात फिरत असतात, पण त्या काड्यांनी कुणी बुडत नाही आणि तरतही नाही. श्री श्री रविशंकर यांनी मागे एकदा सांगितले, ‘राममंदिर झाले नाही तर हिंदुस्थानचा ‘सीरिया’ होईल.’ म्हणजे हिंदू-मुसलमानांत दंगे होतील असेच त्यांना सुचवायचे होते. मी त्यांना विचारले, ‘मग तुमचे हिंदुत्ववादी सरकार काय कामाचे? राममंदिर बांधणे हे सरकारी कार्य आहे व तसे त्यांचे वचन आहे.’ जगभरात शांततेचा संदेश देत फिरणारे श्री श्री रविशंकर स्वतःच्या हिंदुस्थानात अराजक निर्माण होईल असे सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते.

अफूच्या गोळ्या
पुरातन काळापासून आपला देश ‘बुवा’ आणि ‘महाराज’ग्रस्त झाला. धर्म ही अफूची गोळी आहे, पण बुवा आणि महाराजांचा ‘नाद’ म्हणजे चरस आणि गांजा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, आज जे आपत्तीत सापडले आहेत ते व जे चांगल्या स्थितीत राहतात ते याचप्रकारे कशाचेही देव तयार करतात, कर्मकांडात रमून जातात आणि कोणीही दाढ्यांची जंगले वाढवून साधुसंत म्हणून लोकांना भूल देतात. ज्या चित्रपट नट्यांचा वा क्रिकेटपटूंचा उदोउदो होतो ते सरकारी कर वगैरे देण्यात कसूर करतात आणि तिरुपतीला नऊ कोटी रुपयांचे दागिने अर्पण केल्याचा गाजावाजा करण्यात धन्यता मानतात. साईबाबांच्या साध्या राहणीच्या कथा सांगायच्या आणि त्याचवेळी त्यांची मूर्ती सोन्याच्या आसनावर बसवण्याचा खटाटोप करायचा, असला दांभिकपणा वाढत चालला असून तुकोबा काय की रामदास काय यांनी या वृत्तीवर चौफेर हल्ले केले होते, पण तुकोबांचे नातेवाईक व शिष्य त्यांच्या अंगी अनेक चमत्कार चिकटवितात तर रामदासांच्या शिष्यांनीही असेच चमत्कार आपल्या गुरूच्या चरित्रात घुसडून दिले. यातून सुटका करून घ्यायची तर तुकोबा व रामदास यांच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास करायला हवा.

तुकाराम महाराज इत्यादी संतांप्रमाणे रामदास हे त्यांच्या शिष्यपरंपरेने देवत्वपदी बसवून अनेक चमत्कारांनी युक्त असे त्यांचे चरित्र रंगवल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यातच चित्रपट व नाटक यातून संतांच्या चमत्कारात भरच पडत गेली. याखेरीज रामदासांना दुराभिमानी राष्ट्रवादी राजकारणाचा जितका उपद्रव सोसावा लागला तितका इतर संतांना लागला नसावा.

कोणताही महापुरुष देवत्वपदी नेऊन बसवण्याची परंपरा जुनी आहे. यातून तुकाराम महाराज सुटले नाहीत आणि रामदासही वगळले गेले नाहीत. पण संत तुकोबा व समर्थ रामदासांची सर आजच्या एकाही ‘तोतया’ संत महात्म्यास येणार नाही. सत्तेच्या वर्तुळात अनेक ‘तांत्रिक’ स्वामी बनून फिरत असतात. त्यापैकी अनेकांना पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत सगळीकडे मुक्तप्रवेश मिळतो. त्यापैकी एक चंद्रास्वामी. हेच चंद्रास्वामी पुढे फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात गेले. दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रभाव होता. महत्त्वाच्या फायलींना चंद्रास्वामींच्या इशाऱ्यावर पाय फुटत. त्याआधी धीरेंद्र ब्रम्हचारी. अलीकडच्या काळात असे अनेक बाबा व महाराज हे भाजपचे प्रचारक बनले. आसाराम बापू, राम-रहीम या बाबा मंडळींनी निवडणुकीपूर्वी श्री. मोदी यांना आशीर्वाद दिला. आज ते भ्रष्टाचार व व्यभिचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. लोकसभेत अनेक ‘भगवे’ वस्त्रधारी खासदार म्हणून बसले आहेत व त्यांचे समाज व देशासाठी नक्की योगदान काय असा प्रश्न पडतो. अशी संसद लोकांचे, देशाचे कोणते प्रश्न सोडवणार? पण हे सर्व लोक मतदारांना ‘भूल’ देऊन निवडून येतात व राजकीय पक्षांच्या आकड्यात भर टाकतात. श्री श्री रविशंकर व भय्यूजी महाराज यांनाही राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची ऑफर होती, पण पुढे काय झाले हे त्यांनाच माहीत.

राम-कृष्णही आले गेले
भय्यूजी महाराज यांनी एका सामान्य माणसाप्रमाणे कच खाऊन आत्महत्या केली. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी वगैरे मंडळींनी हजारो कोटींचे कर्ज बुडवूनही कच खाल्ली नाही. ते जीवनापासून पळाले नाहीत तर देश सोडून पळाले! भय्यूजी जीवनापासून पळाले. तुम्ही दुसऱ्यांना जगण्याचा मंत्र देता तेव्हा आधी स्वतः जगायला शिका. ईश्वराचे अवतारही मरण पावले. राम-कृष्णही आले गेले. ‘संत’ म्हणून ज्यांना पोपने गौरवले त्या मदर तेरेसाही मरण पावल्या. गांधीजींनी मरताना ‘हे राम’ म्हटले. पण गोडसेंच्या गोळीपासून प्रभू श्रीरामाने गांधींना वाचवले नाही. उघड्या जीपमधून फिरणाऱ्या ‘पोप’चीही हत्या झाली. पोपचे संबंध गुन्हेगारी जगताशी होते. म्हणजे ही सामान्य माणसेच होती. संतपणाचे व देवत्वाचे झगे पांघरून समाजात ते वावरत असतात. माणसांना जशी दुःखे असतात तशी ती ईश्वर म्हणवून घेणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही होती. रामायण-महाभारतात सर्वत्र तोच कौटुंबिक कलह त्यामुळेच दिसतो व सूडाचे प्रवाह पानोपानी आढळतात. राम, कृष्ण, धर्मराजाचे जीवन हे सामान्य माणसाच्या संघर्षाचेच प्रतीक आहे व महाभारत, रामायणातील अनेक ‘पात्रां’नी एक तर आत्महत्या केल्या किंवा त्यांच्या हत्या झाल्या हे विसरता येणार नाही.

हे खरे संत
महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांची परंपरा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मी त्या अर्थाने ‘संत’ मानतो. आताचे ‘संत’, ‘महाराज’ शेकडो कोटींच्या इस्टेटी व ट्रस्ट निर्माण करतात व त्यातून समाजसेवा करतात. गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून हे कार्य उभे केले. भय्यूजी महाराजांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या. शाळा, कॉलेज, आश्रमशाळा काढल्या व त्या चालवण्यासाठी स्वतःची १२०० एकर जमीन विकली. तुळजापुरात छत्रपती संभाजीराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकून पदरचे २२ लाख दिले. असे कोणी करीत नाही. भय्यूजींनी भोंदूगिरी आणि बुवाबाजी केली नाही. ते बुद्धिवादी होते. त्यांनी चमत्कार केले नाहीत, पण सरकारदरबारी कामे करून घेण्यासाठी लोकांचा ‘राबता’ त्यांच्याकडे होता. मंत्रीपद मिळविण्यासाठी, आमदारकी व खासदारकीचे तिकीट मिळावे म्हणून, मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांच्या दरबारात राजकारण्यांची हजेरी असे. त्यांच्या सांगण्याने कितीजण मंत्री व मुख्यमंत्री झाले हे ‘शपथ’ घेणाऱ्यांनाच माहीत. ते साधू नव्हते. सत्पुरुषही नसावेत. ते भोंदू नव्हते, ते स्वतःला देव मानत नव्हते. तरीही ते एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिले. भय्यूजी महाराजांची संपत्ती पाहिली तर इतर महाराजांच्या मानाने किरकोळ म्हणावी लागेल.

अनेक संत व महाराजांची ‘लफडी’ असतात. भय्यूजींनी दुसरे लग्न केले. त्यातून घरात कलह निर्माण झाला व त्या ताणतणावातच ते मरण पावले. ते ‘भोंदू’ असते तर त्यांनी जिवंत समाधी वगैरे घेऊन मृत्यूस निमंत्रण दिले असते. हिमालयात तपश्चर्येस जातो म्हणून पलायन केले असते, पण त्यांनी तसे काहीच केले नाही. राष्ट्रपती राधाकृष्णन एका व्याख्यानात म्हणाले, ‘‘एक संत झाला तर शंभर भोंदू असतात.’’ (for one saint, there are hundred Frauds) भय्यूजी महाराज संत नक्कीच नव्हते, पण ते भोंदूही नक्कीच नव्हते. नाहीतर त्यांनी आत्महत्या केली नसती.

त्यांनी जीवनाचा त्याग केला. त्यागात साधुत्व असते.
मृत्यूनंतर उदयसिंग देशमुख हे साधू झाले.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या