रोखठोक : छत्तीसगडचा वाघ, मुंगीने मेरू पर्वत गिळला!

rokhthokनिवडणुकांतील विजयासाठी नेतृत्वाचा पर्याय लागतो हा समज तीन राज्यांतील निकालांनी खोटा ठरवला. राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसकडे नेतृत्व तरी होते. छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचा पराभव केला तो बीनचेहऱ्याच्या भूपेश बघेल या झुंजार कार्यकर्त्याने. काँग्रेसच्या मुडद्यात त्याने जान आणली व कार्यकर्त्यांना मैदानात लढायला उतरवले. चेहरा, पैसे, दहशत यापेक्षा संघटना महत्त्वाची हे त्याने छत्तीसगड जिंकत असताना दाखवून दिले. भूपेश बघेल यांनी नेमके काय केले?

पाच राज्यांचे निकाल लागले आहेत. चार वर्षांत भाजप प्रथमच हताश आणि हतबल झालेला दिसत आहे. चेहऱ्यावर हसू व काहीच घडले नसल्याचा भाव असला तरी हे उसने अवसान आहे. हा पराभव सरळ सरळ पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या धोरणांचा, वागण्या-बोलण्याचा व राजकारणात नव्याने रुजू पाहणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील मतदारांनी हे सर्व मोडून काढले. राजस्थान जाईल व जाणारच होते. मध्य प्रदेशातही ‘कांटे की टक्कर’ होणारच होती. पण छत्तीसगड भाजपच्या हातून निसटेल व रमण सिंह या देशातील आदर्श मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची गादी खालसा होईल आणि तीसुद्धा कोणताही चेहरा नसलेल्या काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्याकडून अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. ज्याची साधी दखलही कालपर्यंत कोणी घेत नव्हते अशा भूपेश बघेल या बिनचेहऱ्याच्या काँग्रेस कार्यकर्त्याने कमजोर काँग्रेसला छत्तीसगडमध्ये विजयाच्या मार्गाने शिखरावर नेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ‘पर्याय कोण या भानगडीत न पडता जे नको त्यांना मतदारांनी नाकारले.’ हे महत्त्वाचे आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसकडे अशोक गेहलोत, सचिन पायलट होते. मध्य प्रदेशात कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे होते; पण छत्तीसगडमध्ये रमण सिंहांसमोर टिकणे कठीण असतानाही भूपेश बघेल हे काँग्रेसला विजयाकडे घेऊन गेले.

कठीण काळ
कालपर्यंत हा माणूस देशात कुणालाच माहीत नव्हता. मात्र आता चर्चा भूपेश बघेल यांची सुरू आहे. बी.बी.सी.ने त्यांच्या कामाची दखल घेतली. भूपेश बघेल काळ्या रंगाच्या एसयूव्ही गाडीतून फिरत होते. या गाडीचा माइलोमीटर सांगतोय की ही गाडी आतापर्यंत 1 लाख 90 हजार किलोमीटर चालली आहे. त्यांचा ‘सारथी’ सांगतो ही गाडी त्यांच्याकडे 2015 पासून आहे. छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी दोन गाडय़ांचा वापर केला. या दोन गाडय़ांची बेरीज केली तर आतापर्यंत त्यांनी 2 लाख 75 हजार किलोमीटरचा प्रवास केला. छत्तीसगड काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर त्यांनी या छोटय़ा प्रदेशात मोठय़ा यात्रा केल्या. या यात्रा फक्त वाहनाने केल्या नाहीत. गेल्या चार वर्षांत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी जवळजवळ एक हजार किलोमीटरची पदयात्राही केली. शेतकऱ्यांपासून आदिवासींच्या वनाधिकार मुद्दय़ापर्यंत, जल, जंगल, जमिनीपासून नोटाबंदीपर्यंत त्यांनी आदिवासींत चेतना निर्माण केली. अत्यंत कठीण परिस्थितीत बघेल यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. छत्तीसगडमधील विद्याचरण शुक्लांसह पहिल्या फळीतील अनेक नेत्यांची हत्या नक्षलवाद्यांनी केली. झिरम घाटातील या हत्याकांडाने देश हादरला. संपूर्ण नेतृत्वच रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडले. सर्वत्र अंधकार असताना ‘पर्याय’ नाही म्हणून 2013 साली हायकमांडने त्यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी सोपवली. त्या वेळी राज्यातील काँग्रेस पक्ष हताश, निराश आणि आत्मविश्वास गमावलेल्या पंगू अवस्थेत होता. लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या. ती निवडणूक मोदी लाटेत वाहून गेली. कार्यकर्ते हताश झाले, पण भूपेश बघेल यांनी काँग्रेसची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा चंग बांधला. आता हार मानायची नाही ही जिद्द त्यांनी मनाशी बांधली. छत्तीसगडमधील असंख्य लोकांची रेशन कार्डे अचानक कापली गेली. शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीपासून बोनसपर्यंत, नसबंदी केंद्रापासून स्थानिक चिटफंड कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीवर त्यांनी रान उठवले. काँग्रेसला त्यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवले. काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यास विसरले होते. ‘संघर्ष’ शब्दाशी त्यांचा संबंध संपला होता. भूपेश बघेल यांनी संपूर्ण प्रदेश काँग्रेसला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवले. स्वतः त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. रमण सिंह यांना हे जबरदस्त आव्हान होते व त्यांच्या खिजगणतीत नसलेल्या एका फाटक्या नेत्याने हे आव्हान दिले होते. त्रिपुरातील ‘माणिक सरकार’ यांचे राज्य ज्या पद्धतीने भाजपने घालवले त्याच पद्धतीने रमण सिंह यांचे राज्य भूपेश बघेल यांनी घालवले. माणिक सरकार यांची प्रतिमा स्वच्छ, प्रामाणिक होती. त्यावर भाजपने हल्ला केला. रमण सिंह यांच्या बाबतीत भूपेश बघेल यांनी तेच केले. भूपेश बघेल ‘बलदंड’ रमण सिंह यांचा मुखवटा फाडत राहिले. त्यामुळे जमिनी स्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढत राहिले. भूपेश बघेल यांना भाजपकडून आमिषे आली. त्यांनी ती ठोकरून लावली. भूपेशने ज्याप्रकारे रमण सिंह आणि त्यांच्या कुटुंबकबिल्याच्या कथित मॅटरचा एकामागे एक पर्दाफाश केला, ज्याप्रकारे त्यांनी बलाढय़ नोकरशहांना खुले आव्हान दिले त्यामुळे राज्यात काँग्रेसची प्रतिमाच बदलून गेली. अंतागढ पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या खरेदी प्रकरणात त्यांनी आपल्याच पक्षाचे ताकदवान नेते अजित जोगी व त्यांचा मुलगा अमित जोगी यांना घेरले. त्यांना पक्षातून बडतर्फ करायला लावले. त्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेची अशी धारणा झाली की भूपेश बघेल हाच हिंमतवान ‘56 इंच’ छातीचा नेता आहे. त्यानंतर बघेल जाईल तिथे युवा कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ‘देखो देखो कौन आया, छत्तीसगड का शेर आया.’

हिंमतबाज
काँग्रेससह विरोधी पक्षांचे अनेक नेते, मुख्यमंत्री रमण सिंहांचे मित्र बनून चाटुगिरी करीत असताना, सत्तेची सर्व सुखे भोगून मजा मारत असताना भूपेश बघेल व त्यांचे कार्यकर्ते काट्यांवरून प्रवास करीत होते. रमण सिंह सरकारने भूपेश बघेल यांना अडकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने भूपेश बघेल यांच्या विरोधातच नव्हे तर त्यांची वृद्ध आई आणि पत्नीच्या विरोधात गुन्हे दाखल केले. भूपेश घाबरले नाहीत. आपल्या आजारी आई आणि पत्नीला घेऊन ते अटक करून घेण्यासाठी एसीबी कार्यालयात पोहोचले. पोलिसांचे धाबेच दणाणले. राज्य सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. अत्यंत बेडरपणे ते लढत राहिले. एक मंत्री राजेश मुणत यांच्या अश्लील सीडीचे एक प्रकरण गाजले. पत्रकार विनोद वर्मा यांस गाझियाबाद येथे अटक करताच भूपेश बघेलने रायपूर येथे एक मोठी पत्रकार परिषद घेतली. हातात एक सीडी फडकवत ते गरजले, ‘जर सीडी बाळगणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अटक होणार असेल तर माझ्या हातातही सीडी आहे. सरकारने मलासुद्धा अटक करावी. करा मला अटक.’ रमण सरकारने त्यांना अटक केली नाही. पण त्यांच्या विरोधात अश्लील सीडी वाटल्याचा गुन्हा दाखल केला. घाईघाईने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. सीबीआयने गुन्हा दाखल केला. भूपेशला अटक झाली. त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला व ते सरळ तुरुंगात गेले. रमण सिंह सरकारची छीः थू झाली.

हवा आणि कार्यशाळा
भूपेश बघेल यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसची हवा निर्माण केली, पण हवा आणि वावटळी निर्माण करून निवडणुका जिंकता येणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. भाजपा बूथ स्तरांवर आणि ‘पन्ना प्रभारी’ मतदार यादीच्या पानानुसार जबाबदारी वाटण्याचे काम करीत होती. तेव्हा काँग्रेसचे संघटन ‘ब्लॉक’ स्तरावरही दिसत नव्हते. ही कमजोरी भूपेश भाईंनी ओळखली. बूथ स्तरावरची बांधणी सुरू केली. ते आवश्यक होते. भूपेश बघेल यांनी बी.बी.सी.ला दिलेली मुलाखत मी पाहिली. ते स्पष्ट म्हणतात, ‘मी आज जो काही आहे तो संघटनेमुळे आहे. माझ्यामुळे संघटना नाही. म्हणूनच राज्यात संघटना मजबूत करण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरलो.’ 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला बूथ स्तरावर नेण्याची प्रक्रिया सुरू केली. सुरुवात केली प्रशिक्षण कार्यशाळेपासून. चार सत्रांत सात तास चालणाऱ्या या ‘वर्कशॉप’ने कार्यकर्त्यांना बूथ स्तरापर्यंत पोहोचवले. भाजप, संघ परिवाराच्या विचारधारेशी कसे लढायचे, भ्रम निर्माण करणाऱ्यांशी कसे भिडायचे ते शिकवले. कार्यकर्त्यांना सोशल मीडियातील युद्ध लढण्यासाठीही तयार केले. प्रथमच राज्यात 24 हजार बूथवरील 95 टक्के बूथवर समित्या बनवून त्यांना सक्रिय केले. या ‘वर्कशॉप’विषयी राहुल गांधींना समजले तेव्हा ते बस्तरला स्वतः आले. दोन दिवस त्यांनी पाच तास या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. भूपेश बघेल यांच्याच प्रयत्नाने देशात पहिल्यांदा काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे मत विचारले. बहुसंख्य ठिकाणी बूथ कमिटय़ांनी सुचवलेल्या उमेदवारांनाच तिकिटे दिली. भूपेश बघेल यांनी छत्तीसगडच्या जंगली, पहाडी, आदिवासी प्रदेशात हे असे भक्कम काम केले. त्याचे परिणाम देश पाहत आहे. त्रिपुरात कम्युनिस्ट सरकारचा पराभव करून प्रसिद्ध झालेले सुनील देवधर हे पुढे तेलंगणात गेले. तेलंगणात भाजपच्या हाती काही लागले नाही. छत्तीसगडमध्ये काम करणे जास्त अवघड होते. भूपेश बघेल यांनी ते करून दाखविले.

संघाला आव्हान
वनवासी भागात संघाचे काम चालते. राष्ट्रीय स्तरांवर आर.एस.एस.शी खुली लढाई लढताना फक्त राहुल गांधी दिसतात, तर ‘वनवासी’ छत्तीसगडमध्ये हे युद्ध एकटय़ा भूपेश बघेल यांनी केले.

भूपेश बघेल यांनी फेसबुकवर खुले पत्र लिहून सांगितले, ‘आर.एस.एस. देशातील ढोंगी संघटना आहे.’ त्यांनी संघाला प्रश्न विचारला, ‘छत्तीसगडमध्ये सरकार दारूचे ठेके विकत आहे. संघ गप्प का आहे? यामुळे हिंदुस्थानी संस्कृती धोक्यात येत नाही काय?

छत्तीसगडमध्ये सरकारी मदतीने चालणाऱ्या गोशाळेत शेकडो गाई मेल्यानंतर समजले की तिथे गाईंची चामडी व हाडांचा व्यापार होत असे. बघेल यांनी संघाला आव्हान दिले, ‘देशभरात गोरक्षेच्या नावाने राजकारण करणारा संघ व त्यांचे नेते छत्तीसगडमध्ये गप्प का आहेत?’

भूपेश बघेल यांनी शून्यातून संघटन उभे केले. गाळातील काँग्रेस शिखरावर नेली. रमण सिंह यांना नामोहरम केले. हत्तीच्या कानात मुंगी शिरली व मुंगीने हत्तीला मारले. भूपेश बघेल हा रमण सिंह यांना पर्याय होईल असे कधीच कुणाला वाटत नव्हते. पण भूपेश लोकांत गेले. लोकांना लढायला प्रेरणा दिली. मुंगीने मेरू पर्वत गिळला हे छत्तीसगडमध्ये दिसले. भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होतील काय ते मला माहीत नाही, पण एक सामान्य कार्यकर्ता पैसा, सत्ता, दहशतीची पर्वा न करता हिमतीने उभा राहतो. अशा असंख्य कार्यकर्त्यांसाठी भूपेश बघेल हे दीपस्तंभ आहेत. मुंगीने खरंच मेरू पर्वत गिळला हो!

TWITTER : @rautsanjay61
GMAIL : rautsanjay61@gmail.com