रोखठोक – दानधर्माची उलटी गंगा!

देशातील सर्वाधिक श्रीमंत व दानशूर व्यक्तींची यादी प्रसिद्ध झाली. त्यात नवीन काय? तेच श्रीमंत आणि तेच उद्योगपती. दानशूर लोकांच्या याद्या प्रसिद्ध होत नव्हत्या तेव्हाही ‘दाते’ होतेच. आज दानधर्मापेक्षा दानशूर म्हणवून घेणाऱयांची प्रसिद्धीच जास्त होत आहे.

एका हाताने दिलेले दान दुसऱया हातास कळता कामा नये असे आपले शास्त्र सांगते. आताच देशातील सर्वात श्रीमंत आणि दानशूर व्यक्तींची यादी प्रसिद्ध झाली आहे. कर्णासारखा दानशूर झाला नाही असे आजही सांगितले जाते, पण सध्याच्या युगात श्रीमंत आणि दानशुरांच्या अधिकृत याद्याच प्रसिद्ध होऊ लागल्या. देशात सर्वाधिक दान करणाऱया उद्योगपतींची यादी जाहीर झाली आहे. त्यात ‘आयटी’ क्षेत्रातील मोठे नाव शिव नाडर हे पहिल्या क्रमांकावर आहे. श्री. नाडर यांनी गेल्या वर्षात 1161 कोटी रुपयांचे दान केले. गेल्या 3 वर्षांमध्ये नाडर यांनी 3,219 कोटींचे दान केले. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे दानधर्मात दुसऱया स्थानावर घसरले. प्रेमजी यांनी गेल्या वर्षभरात 484 कोटी दान दिले. 3 वर्षांत त्यांनी 1801 कोटी रुपये दान केले. मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, नंदन निलकेणी, अनिल अग्रवाल अशा अनेक श्रीमंतांनी या काळात मोठे दान केले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे दानशुरांच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात 190 कोटी, तर 3 वर्षांत 408 कोटींचे दान केले. हे दान नक्की कोठे जाते? सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत, गरिबी निर्मूलन, साक्षरता अशा कामांत हे दान वापरले जाते, पण तरीही देशात गरिबीचे निर्मूलन झाले आहे का?

श्रीमंती वाढते आहे!

हिंदुस्थानात गरिबी वाढते आहे. कारण फक्त मूठभर लोकांच्या श्रीमंतीत वाढ होत आहे. हिंदुस्थानातील 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सुमारे 80 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी अंबानींना मागे टाकले. कारण पेंद्रातील सरकार पूर्णपणे अदानी यांच्या पाठीशी आहे. ‘पर्ह्ब्स’ने 2022 ची सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली. त्यात 100 अब्जाधीश भारतीयांच्या संपत्तीत 25 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. श्रीमंतांच्या यादीतील व्यक्तींच्या एकूण संपत्तीपैकी 30 टक्के संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्याकडे आहे, पण एक काळ या मुंबई शहरात असा होता की, येथे अंबानी-अदानी नव्हते. एकमेकांत संपत्ती आणि श्रीमंतीची स्पर्धा नव्हती. अशा अनेक व्यक्ती त्यांच्या श्रीमंतीपेक्षा दानशूरतेने प्रख्यात झाल्या. त्यात नाना शंकरशेठ यांचे नाव अग्रस्थानी होते. नानांच्या दानशूरतेने मुंबईच्या वैभवात भर घातली. सर जमशेटजी जिजीभॉय, प्रेमजी कावसजी, वाडिया, टाटा या पारशी दानशूर मंडळींचे औदार्य निःस्वार्थी होते. मुंबईतील शाळा, इस्पितळे, स्मशाने, इतकेच काय, प्राण्यांसाठी भूतदयेने निर्माण केलेली इस्पितळे त्यांच्या उदारतेची साक्ष आजही देतात. तेव्हा इंग्रजांचे राज्य होते आणि दानधर्माच्या बदल्यात या मंडळींनी सरकारकडून कोणतीच अपेक्षा केली नव्हती. हीच आहे दानाची व्याख्या. मंदिरांच्या दानपेटय़ांत सर्वसामान्य जनता ‘दान’ टाकते. त्या दानपेटय़ांवर राजकारण्यांनी नेमलेले विश्वस्त मंडळ नियंत्रण ठेवते व आपापल्या मर्जीतील लोकांना ‘दानधर्म’ करीत असते. मंदिराच्या दानपेटय़ांवर ताबा मिळवण्यासाठी मंदिरांवर ताबा ठेवण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. तिरुपतीपासून शिर्डी संस्थानपर्यंत वेगळे काहीच घडत नाही.

देशभरात मंदिरांची संख्या 30 लाखांवर आहे. लहानमोठी मंदिरे मिळून ती 1 कोटीपर्यंत जाईल. मंदिरांना येणारी रोजची देणगी कोटींच्या घरात आहे. मंदिरे ही श्रद्धास्थाने असली तरी अपवाद वगळता एकसूत्रपणा, योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने मंदिरे व त्यांच्या संपत्तीचा पुरेसा वापर समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा होत नाही. यासाठी विद्यापीठांनी टेंपल मॅनेजमेंट अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडलेली नवी पिढी या कार्यात उतरली तर हीच 30 लाख मंदिरे देशात क्रांतिकारी बदल घडवू शकतील, असे मत डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केले ते महत्त्वाचे आहे. डॉ. हावरे हे साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते व त्या काळात त्यांनी उत्तम काम केले. मंदिराच्या दानपेटय़ा जनतेच्या, समाजाच्या व देशाच्या असतात हे विश्वस्तांनी विसरू नये. तिरुपती, साई संस्थान, शिर्डीच्या विश्वस्त बोर्डावर येण्यासाठी राजकारणी, उद्योगपती व प्रशासकीय लॉबीचे जोरदार लॉबिंग चालते. ते कशासाठी?

शिंदे गटाचे दान

महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्हय़ांत परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. शेतकऱयांची घरे, पशुधन उभ्या पिकासह वाहून गेले. त्यात दिवाळी आली. शहरांत दिवाळीच्या खरेदीची झुंबड सुरू असताना खेडय़ांतील घरांत एक दिवा पेटण्याची मारामार होती. गावोगावच्या लहान मुलांचा आक्रोश समाजमाध्यमांवर व्यक्त झाला, तेव्हा अनेकांचे मन हेलावले. सरकारने ‘आनंदाचा शिधा’ हा शंभर रुपयांचा उपक्रम सुरू केला. तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यावर प्रसिद्धीमाध्यमांत टीका सुरू होताच सरकारच्या मंत्र्यांमधील ‘दाता’ जागा झाला. त्याचे एक उदाहरण मराठवाडय़ातील सिल्लोडचे. आनंदाचा शिधा मोफत देण्याचे जाहीर केले. पण त्या आनंदाच्या शिध्यांवर ठळकपणे छापले- ‘आम्ही एकनाथ शिंदे गटाचे!’ यास कसले दातृत्व म्हणायचे? हा तर दातृत्वाचा काळाबाजार! जे दान प्रसिद्धीशिवाय होते तेच खरे दान. आज समाजसेवा आणि दान करणाऱयांचे पह्टोसेशन म्हणजे आजाराची लाटच आहे. रुपयाचे दान आणि हजार रुपयांची प्रसिद्धी. दुसरे असे की, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी श्रीमंत लोक खूप मोठी देणगी देत असतील, असा आपला समज असतो; पण ते तितकेसे खरे नाही. त्या उलट मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकच सढळ हाताने मदत करतात, असे सुधा मूर्ती यांनी एके ठिकाणी म्हटले ते खरे आहे.

सुधा मूर्तींचे दान

नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांच्या इन्पहसिस फाऊंडेशनने विविध क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात दान दिले. पण दान देताना श्री. मूर्ती प्रसिद्धीमाध्यमांसमोर दिसले नाहीत. सुधा मूर्ती यांनी दानशूरतेची महती व संस्कृती त्यांच्या भाषणांतून व लेखनातून सांगितली. सुधा मूर्ती एका खेडेगावात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांचे आजोबा शाळा शिक्षक होते. दानधर्माचे महत्त्व जे त्यांच्या आजोबांनी मनावर बिंबवले ते खरे. आजोबांनी सुधा मूर्तींना सांगितले, ‘‘बाळ, हे बघ… आपल्याला जर दुसऱयाला काही द्यायचंच असेल तर नेहमी आपल्याकडे जे चांगल्यात चांगले असेल ते द्यावे. निकृष्ट दर्जाचं कधी देऊ नये. हा धडा मी जीवनाकडून शिकलो. देव हा काही मंदिरात, मशिदीत पिंवा चर्चमध्ये नसतो. तो असतो लोकांच्या ठायी. आपल्याकडे जे काही असेल ते देऊन आपण जर लोकांची सेवा केली, तर ती खऱया अर्थाने ईश्वराचीच सेवा होते.’’ सुधा मूर्ती सांगतात, ‘‘माझ्या आजोबांनी या प्रश्नाचं उत्तर जरा वेगळय़ा पद्धतीने दिलं, ‘पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी वेदांमधून आपल्याला अत्यंत साधीसोपी तत्त्वं शिकवली आहेत.

– दानधर्म करताना कनवाळू शब्दांचा वापर करा.
– दानधर्म आनंदाने करा.
– दानधर्म मनापासून तळमळीने करा.
– केवळ गरजू व्यक्तींनाच दान द्या.
– दानधर्म करताना मनात कोणतीही अपेक्षा बाळगू नका. कारण दानधर्म ही देणगी नसून ते आपलं कर्तव्य आहे.
– दानधर्म करताना आपल्या पत्नीची संमती घ्या.
– दानधर्म करताना एका गोष्टीचा विचार करा. दान स्वीकारणाऱया लोकांना परावलंबी आणि असहाय बनवू नका.
– दानधर्म करताना जाती-धर्माचा विचार मनातही आणू नका.
– दानधर्म करताना मनात अशी इच्छा बाळगा की, आपल्याकडून ते दान स्वीकारणाऱयाची भरभराट होवो.

असे दान आज कितीजण करतात? स्वातंत्र्यलढय़ात गांधींच्या राजकीय व धार्मिक कार्यात अनेक धनिकांनी सढळहस्ते मदत केली. बिर्ला, बजाज असे उद्योगपती त्यांत होते. देणगीदार व दानशूर लोकांच्या याद्या तेव्हा प्रसिद्ध होत नव्हत्या. तरीही लोक दान करीत होते. टिळक स्वराज्य फंडात सामान्य लोकांनी दान टाकले. महाराष्ट्रात पन्नास आमदार विकत घेण्यासाठी प्रत्येकी पन्नास-पन्नास ‘खोक्यां’चे ‘दान’ टाकले गेले. दानातला हा फरक समजून घेतला पाहिजे.

पितामह भीष्म म्हणतात,
‘दरिद्रान् भर कातेय मा
प्रयच्छेश्वरं धनम् ।

अर्थात गरीबाला पैसा द्या. श्रीमंताला देऊ नका. पण आज दानाची गंगा उलटय़ाच दिशेने वाहत आहे. देशात, महाराष्ट्रात गरिबी, कुपोषणाचे बळी जात आहेत. आदिवासी स्त्रिया रस्त्यात झोळीत बाळंत होत आहेत. आदिवासी पाडय़ांवर उपचाराची सोय नाही! मग हे अब्ज अब्ज रुपयांचे दान कोठे जाते? कोणी त्यावर प्रकाश टाकेल काय?

[email protected]