रोखठोक – महाराष्ट्राचा नवस हा असा, तोतयांचे व्यापारी हिंदुत्व संपवा!

>> कडकनाथ मुंबैकर

श्री गणेशाचा सार्वजनिक उत्सव ही महाराष्ट्राची परंपरा. टिळकांनी गणपतीस ‘राष्ट्रीय’ नेतृत्व दिले. तेव्हा स्वातंत्र्याचा नवस होता. आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा खतम करून मुंबई लुटण्याचे नवस लागले आहेत. श्री गणेशाला हे सर्व संपवावे लागेल.

हिंदुस्थान देश उत्सवप्रिय आणि सुट्टीप्रिय आहे. त्याही पेक्षा म्हणजे चमचेगिरीप्रिय आहे. सध्या महाराष्ट्रात घरोघरी श्री गणेशाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक गणेश उत्सवही जोरदार पद्धतीने साजरे होत आहेत. त्या उत्सवातही नवसाचे गणपती वेगळे. देव एकच. भले तेहतीस कोटी देव असतील, पण श्री गणेशाचे रूप एकच. मग त्यातही नवसाला पावणारे गणपती वेगळे व त्या गणपतीच्या मांडवात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कारण या गणपती दर्शनास गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष श्री. नड्डा, अमिताभ बच्चन, जे कोणी मुख्यमंत्री असतील ते, अंबानी, अदानी वगैरे ‘श्रीमंत’ उत्सवी मंडळी जात असतात. त्यांच्यासाठी वेगळे रस्ते, वेगळ्या सुविधा, वेगळ्या प्रार्थना; पण हे नवसाचे देव नक्की कोणाला पावतात? श्री. अदानी हे आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. कालपर्यंत हे स्थान मुकेश अंबानींचे होते. त्यावर आता अदानी आरूढ झालेत. एक भारतीय व्यक्ती जागतिक श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचली याचा आनंद आहे. पण एक व्यक्ती श्रीमंत झाल्याने देश आणि 130 कोटी जनता श्रीमंत होईल काय? श्रीमंतांच्या स्पर्धेत श्री. अदानी पुढे गेले. त्यांना कोणता देव नवसाला पावला तो पावला, पण मुंबई-पुण्यात नवसाच्या गणरायासमोर गोरगरीब, पीडितांच्या रांगाच रांगा वर्षानुवर्षे आहेत. त्या रांगा कमी करण्याचे कार्य अदानी, अंबानींसारख्या पन्नास श्रीमंतांनी केले तरी श्री गणेश उत्सवाचे कार्य मार्गी लागेल.

श्रेय ठाकऱ्यांचेच!

महाराष्ट्रात आज निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा होत आहे. याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळायला हवे. गेल्या दोन वर्षांत जे कोरोनाशी लढले, दोन वर्षे त्यांनी कठोर निर्बंध अमलात आणले, लोकांत जागृती आणली म्हणून आजचा निर्बंधमुक्त, मोकळा उत्सव साजरा होत आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार ‘टपकले’ म्हणून हे घडले नाही. एक वर्ष तर सार्वजनिक गणेशोत्सव ‘साजरे’ झालेच नाही. तरीही लोक श्री गणेशाची आराधना करीतच राहिले. लोकमान्य टिळकांनी ‘घरातला’ म्हणजे वाड्यातला गणपती रस्त्यावरील मंडपात आणला. त्यामागे एक राष्ट्रीय प्रेरणा होती. आज राजकीय गटातटाची प्रेरणा दिसते. सार्वजनिक गणेश उत्सवांवर शिवसेनेचे वर्चस्व काल होते, आजही आहे. लोकमान्यांचेच कार्य शिवसेनेने पुढे नेले. पण हे वर्चस्व मोडून काढण्याची विकृत स्पर्धा आता सुरू झाली. मुंबईवरचे ‘मराठी’ वर्चस्व संपवायचे असेल तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ताब्यात घ्या किंवा विकत घ्या. या धोरणामध्ये टिळक-ठाकऱ्यांचा राष्ट्रीय-महाराष्ट्रीय विचार मागे पडला व वेगळ्या झेंड्याची व नेत्यांची स्पर्धा सुरू झाली हे चित्र महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारे आहे. महाराष्ट्र हा तुमचा-आमचा महाराष्ट्र राहील काय? या शंकेच्या पांढऱ्या पताका (शरणागतीच्या) आज फडकू लागल्या आहेत. श्री गणरायांसमोर मोठे आव्हान आहे, भ्रमित झालेल्यांना सुबुद्धी देण्याचे!

अजिंक्य गणेश

श्री गणेश बुद्धीची, सत्य व न्यायाची देवता आहे. तरीही या तीन प्रमुख गोष्टींचा दुष्काळ येथे का पडावा? देवांच्या काशीत याच उत्सवात असा महाप्रलय आला की देव आणि मंदिरे पाण्याखाली गेली. म्हणजे देव असले तरी दुःख आणि आनंदाचे चक्र अव्याहतपणे चालू राहणार आहे. लोकमान्य टिळकांनी श्री गणरायांची निवड राष्ट्रीय कार्यासाठी केली. पुराणातील सर्व देव-देवतांचा कुठे ना कुठे, कधी ना कधी पराभव झालेला आहे. परंतु गणपती कायमच अजिंक्य, अपराजित राहिले आहेत. सर्व ज्ञात-अज्ञात युद्धात श्री गणेशांचा विजयच झालेला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी श्री गणेशांची नियुक्ती सेनापती म्हणून केली. गणपतीला त्यांनी आवाहन केले. ‘‘घरांतून, वाड्यांतून रस्त्यावर उतर आणि राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व कर.’’ टिळकांनी चांदीच्या मखरातल्या गणपतीस झावळ्यांच्या मांडवात आणले. त्याच मांडवातून पुढे चापेकर बंधूंसारखे अनेक वीर आणि क्रांतिकारक निर्माण झाले. टिळकांनी श्री गणेशाला बहुजनांचाच नेता केला. 1893 पासून कसब्याच्या गणपतीपासून सुरुवात करून टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. या उत्सवासंबंधी टिळक ‘केसरी’त लिहितात, ‘‘हा गणेशोत्सव साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार, कुंभार, सोनार, वाणी वगैरे सर्वांनी एकोप्याने साजरा केला.’’ हे टिळक महाराज आग्रहाने सांगतात. टिळक ब्राह्मण, पण त्यांनी बहुजन समाजाचे, तेल्या-तांबोळ्यांचे पुढारीपण केले. त्यासाठी त्यांनी श्री गणेशाची सार्वजनिक प्रतिष्ठापना केली. त्या उत्सवाचे एकच ध्येय होते ‘राष्ट्र आणि महाराष्ट्र.’ आज तसे ध्येय कोठे दिसते काय? महाराष्ट्राचे असे काही उरलेच नाही. त्यामुळे राष्ट्राचे काय होणार?

हे कसले संत?

ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्या महाराष्ट्राचे सार्वजनिक महत्त्व संपवले जात आहे. महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी. वीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पहिले सरसंघचालक येथेच निर्माण झाले. त्या महाराष्ट्रात तोतयांचे हिंदुत्व मखरात बसवून पालखीत मिरवले जात आहे. पालखीचे भोई कोण हे काय श्री गणेशाला माहीत नाही. रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला व त्याने जाहीर केले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे हेच हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत!’’ बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे. भाजप एखादा नाट्यप्रवेश रचतो व त्यानुसार पात्रे रंगमंचावर येतात व डायलॉग बोलून जातात. उद्या हे तोतया बाबा कश्मीरात जाऊन गुलाम नबी आझादांना भेटतील व जाहीर करतील, ‘‘तुम्हीच खरे राष्ट्रपुरुष व गांधी नेहरूंचे वारसदार!’’ राहुल गांधी सत्तेवर येत आहेत अशी चाहूल या बाबा लोकांना झाली तर ते सोनिया गांधींना राष्ट्रमाता व राहुलना नवे पंडित नेहरू म्हणून घोषित करतील. श्री गणेशाच्या उत्सवात हे असे चमचेगिरीचे ‘मेळे’ महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कधीतरी याच बाबाने ‘मातोश्री’वर येऊन श्री. उद्धव ठाकरे यांनाही हिंदुत्वाचे खरे तारणहार असे प्रमाणपत्र बहाल केले होते. पण हेच बाबा दिल्लीतील एका आंदोलनात मध्यरात्री ‘साडी-चोळी’ घालून मुलींच्या पंजाबी वेशभूषेत पळून गेले होते. हे भगोडे महाराष्ट्रात येऊन पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करतात हा महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रातील या बाबागिरीचा जादुटोणा या गणेशोत्सवात नष्ट व्हावा. श्री गणेश हा लढणाऱ्यांचा सेनापती. न्याय देणाऱ्यांचे दैवत. श्री गणेशाच्या कृपेने महाराष्ट्र लढत राहील, न्यायाचे रक्षण करील.

श्री गणेशचरणी महाराष्ट्राचा हाच नवस आहे!