रोखठोक : गणराया, तूच काय ते पहा!

3249
विलेपार्ल्याचा विघ्नहर्ता

rokhthokआर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या उसळत्या वणव्याची चिंता न करता गणपती महाराजांचे आगमन होत आहे. गणपती हे स्वातंत्र्य, विज्ञान आणि बुद्धीचे दैवत. हिंदुस्थानचे ‘चांद्रयान’ चंद्रावर उतरले. पण ‘मारक शक्ती’च्या प्रयोगास मान्यता देणारे संसदेत व आसपास दिसू लागले आहेत!

यंदाची गणपतीची स्वारी वाजतगाजत येणार की मंदीच्या रस्त्यावरून धिम्या गतीने येणार यावर चर्चा सुरू आहे. आर्थिक मंदीच्या संकटाने महाराष्ट्रात बेरोजगारीचा पहाड निर्माण झाला आहे. तरीही बेरोजगार हात मोठ्या डौलाने घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करतील. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव फिका पडला. आता गणपतीचा उत्सवही मराठीजन साधेपणाने साजरा करतील. पण त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव आणि श्रीमंतांचा दांडिया पूरग्रस्तांचे भान ठेवील काय, ही शंकाच आहे. मंदीचा फटका मराठमोळ्या सणांना बसतो तसा ‘रास दांडियां’ना बसणार नाही. त्या दांडियात मंत्री व इतर नामदारही सहभागी होताना दिसतील. विघ्नहर्ता जणू त्या नाचणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो व इतर वेळेला विनाश घडत असताना शांत राहतो.

राजकारण्यांचा उत्सव
टिळकांचा गणेशोत्सव आता राजकीय पुढाऱयांचा उत्सव बनला आहे. ‘गणेशोत्सवावर या वेळी मोदींचा प्रभाव’ अशा बातम्या मी वाचल्या. याचा नेमका अर्थ मला समजला नाही. काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढत गेली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांत या विषयावरील जनजागृतीचे देखावे बेडरपणे सजवले जात होते. आज महागाई, बेरोजगारीबाबत जागृती करणारे ‘देखावे’ एखाद्या सार्वजनिक मंडळाने उभे केले असतील तर दाखवा. मोदी सरकारने 370 कलम, ट्रिपल तलाक याबाबतीत उत्तम कामगिरी पार पाडली आहेच. त्यावरही देखावे व्हावेत, पण मोदी व शहा यांना म्हणजेच सरकारला जे लोक विघ्नहर्त्या गणपतीच्या स्वरूपात पाहतात त्यांनी महागाई, बेरोजगारीचे विघ्न कोणी दूर करावे यावरही गणेशोत्सवात जागृती करायला हवी.

chandrayan2

विज्ञानाचे मारक
गणपती हा विज्ञाननिष्ठ देव आहे. गणपती व चंद्र यांचा संबंध आहे. आता आपण चंद्रावर ‘यान’ सोडले आहे. गणपती हा सुधारणांचे प्रतीक, सरस्वती ही गणपतीची पत्नी. म्हणजे गणपती बुद्धीचेही दैवत. पण सुधारणा, विज्ञानाचा आज काही संबंध राहिला आहे काय? भारतीय जनता पक्षाच्या एक खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची वक्तव्ये विज्ञानवादी गणपती व सुधारणावादी हिंदुस्थानचे पाय खेचणारी आहेत. भोपाळमध्ये निवडणूक लढवताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक वक्तव्य केले, ‘‘माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मरण पावले.’’ आता त्याच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नवे तारे तोडले आहेत, ‘‘विरोधकांनी ‘मारक शक्ती’चा वापर म्हणजे जादूटोणा केल्यामुळेच सुषमा स्वराज व अरुण जेटली यांचा मृत्यू झाला.’’ प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी कायद्यात बसते काय? जादूटोण्यात इतकी शक्ती असती तर त्या जादूटोण्याने पाकिस्तानचा नायनाट करता येईल. त्या ‘मारक शक्ती’ने बेरोजगारी व आर्थिक मंदीचे संकट मारता येईल. त्याच ‘मारक शक्ती’ने संपूर्ण जग हिंदुस्थानला घरबसल्या जिंकता येईल. पंतप्रधान मोदी यांना जगात वणवण करावी लागते व 18-20 तास रोज काम करावे लागते. ते कष्टही जरा कमी होतील. प्रज्ञासिंह ठाकूर या ‘साध्वी’ आहेत व त्यांनी तपस्येतून मोठी शक्ती मिळवली असेल तर दिल्लीतील नेत्यांचे मृत्यू घडवणाऱया यमराजास त्यांनी ‘प्रेरक शक्ती’ने रोखायला नको होते काय? सुधारणावादी देश व विज्ञानवादी गणपतीच्या नेमके विरोधात हे सुरू आहे. श्रीगणेश ही बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता म्हणून लोकप्रिय देवता आहे. कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीभोवती कथा, आख्यायिका व प्रसंगी चमत्कारांचेसुद्धा एक वलय निर्माण होते. हे वलय अधिक प्रभावी झाल्यास कालांतराने मूळ व्यक्तिरेखाच काहीशी धूसर व गूढ वाटू लागते. तसे गणपती महाराजांचे झाले आहे. नवसाला पावणाऱया गणपतींचे ‘उगम’ त्यातूनच झाले. या नवसाच्या गणपतींनी महाराष्ट्रावरील विघ्ने दूर केली नाहीत, पण भक्तांनी चरणाशी ठेवलेल्या ‘दाना’च्या पैशांतून मोठे सामाजिक कार्य घडवले. सिद्धिविनायक, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा ‘चिंतामणी’ या गणेश मंडळांनी कोल्हापूर, सांगलीतल्या पूरग्रस्तांसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे व ते कार्य कौतुकास्पद आहे.

sadhvi-pragya-singh-thakur

मेळ्यांतील असंतोष
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार गणेशोत्सवातील मेळ्यांतून होत असे. अशा अनेक मेळ्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक हजेरी लावत. सरकारचा विरोध न जुमानता अशा मेळ्यांत पदे व कवने म्हटली जात. सामाजिक जीवनातल्या अनेक घटनांचे नेमके विडंबन या मेळ्यांत होत असे. टिळकभक्त व गांधीभक्त यांचे वाद झडू लागले तेव्हा एका कवीने-

टिळक भक्त हो, गांधी भक्त हो,
एकच सांगणे दोघांना।
एकच आहे ध्येय आपुले
मूठमाती द्या वादांना।।

असे आवाहन केले होते. मेळ्यांमध्ये पदे होती, संवाद होते, नाटय़ होते, मनोरंजन होते. त्यातून स्वातंत्र्याचा संदेश दिला जात होता. ‘कीचकवध’ नाटकाची ब्रिटिश राज्यकर्त्यांनी धास्तीच घेतली होती. ‘कीचकवध’ नाटक सार्वजनिक गणेशोत्सवात सादर होत असे. त्यातील-

“रावणी राज्य सैतानी ।
तशी कर्झनची सुलतानी’’

हे पद लोकांच्या असंतोषावर काडी फेकणारे होते. मेळ्यांतूनच ‘स्वातंत्र्याची सोनेरी पाने’ लिहिली गेली. वीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू क्रांतिवीर बाबाराव सावरकरांवर ‘राजद्रोह’ पसरविणाऱया कविता छापल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. दिनांक 8 जून 1909 या दिवशी न्यायालयाने त्यांना जन्मठेप, काळ्या पाण्याची आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा ठोठावली! महाराष्ट्रात आणि दुष्मनांच्या गोटातही म्हणजे लंडनमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. गणेशोत्सवातील एका मेळय़ातल्या पदांमुळे या क्रांतीची ठिणगी पडली. ज्या पदांवर आक्षेप घेतला त्यातील ही काही कडवी पहा-

आर्यांचा हा परिसुनि धावा
गहिवरला गणराया रे।
शिवरूपे मग घेऊनि मारि
त्या परदास्या ठार रे।
– तर हे आणखी एक कडवे पहा.
स्वस्थ बैसला ना?
सारी काळजी सरली ना?
देशामध्ये कहर माजला,
खुशाल बघता ना?
शक्ती नाही ना?
तुम्हा मानही नाही ना?
परक्यांच्या बुळग्यांनो।
लाथा खुशाल खाता ना?

हे आजच्या परिस्थितीतही चपखल बसते. 1902 च्या मेळ्यात ज्यांनी ‘हे घनःश्याम श्रीराम’ हे पद म्हटले त्या कवी गोविंदांचा हा ‘फटका’ लोकप्रिय झाला. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना हे मेळे धोकादायक वाटले म्हणून त्यांनी मुस्कटदाबी सुरू केली. मेळ्यांवर बंदी आणि बोलण्यावर बंदी आली, पण स्वातंत्र्याचा हुंकार याच सार्वजनिक गणेशोत्सवांतून बाहेर पडला. त्या अर्थाने गणपती स्वातंत्र्याचे दैवत आहे. विज्ञान, स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचे दैवत म्हणून गणपतीकडे पाहायला हवं. पण आज ‘मारक शक्ती’चे पुरस्कर्ते संसदेत आणि सभोवती दिसू लागले. स्वातंत्र्य धोक्यात आल्याची ओरड सुरूच आहे. विज्ञानाचा दुरुपयोग सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. ही विघ्ने गणपती कशी दूर करणार? गणराया, तूच काय ते पहा रे देवा!!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या