रोखठोक – कायद्याचे राज्य हवे की धर्मराज्य?

>> कडकनाथ मुंबैकर

कायद्याचे राज्य आज नक्की कुठे आहे? धर्माचेच राज्य हवे अशा भांगेची नशा आज बहुसंख्यांना चढलेली दिसते. ही नशा कायद्याचे व घटनेचे राज्य नष्ट करेल. ‘तारीख पे तारीख’चे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य नाही! ते स्वतंत्र राज्य आहे.

कायद्याचे राज्य राहिले नाही असे आता सर्रास म्हटले जाते. ब्रिटिश राज्यात कायदा होता असेही उघडपणे बोलले जाते. कायद्यावर सर्वच बोलतात, पण कृतीचे काय? न्या. रमण्णा हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. जाताना त्यांनी निरोपाचे भाषण केले. देशातील तुंबलेल्या खटल्यांवर बोलले. न्यायव्यवस्थेवरील सुधारणांबाबत मतप्रदर्शन केले. ‘तारीख पे तारीख’वर मी काहीच करू शकलो नाही यावर खंत व्यक्त केली, पण त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील बेकायदा सरकारबाबत जो घटनात्मक पेच होता, घाऊक पक्षांतर, 40 आमदारांची बेइमानी, आमदारांवरील अपात्रतेबाबत निर्णय असे जे विषय होते ते सगळे तसेच ठेवून न्या. रमण्णा निघून गेले. त्याआधी त्यांनी या प्रकरणात दोन-पाच तारखा पाडल्या, पण निर्णय प्रलंबितच राहिले. राज्यातील बेकायदा सरकारबाबत आपला कायदा व घटना नक्की काय सांगते याबाबत देशाला दिशा दाखवून त्यांनी निवृत्त व्हायला हवे होते. तसे झाले नाही. न्यायव्यवस्थेतील दिरंगाईबाबत कोरडी खंत व्यक्त करून न्या. रमण्णा सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. लोकशाही व न्यायव्यवस्था अदृश्य राजकीय शक्तींच्या दबावाखाली वावरते आहे हे सारा देश पाहत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यात एक बेकायदेशीर सरकार प्रमुख राजकीय पक्षाची मर्जी आहे म्हणून अडीच महिन्यांपासून चालविले जात आहे. हे कसले कायद्याचे राज्य म्हणायचे?

रानटी युगाकडे!

आपण आता रानटी युगात वावरत नाही. त्या रानटी युगातही कायदा, रीती व परंपरा होत्या. महाभारतात एका मानवता व आदर्शावर स्थापन झालेल्या देशाचं वर्णन आहे.

न राज्यं न च राजासीत्,
न दण्डो न च दाण्डिकः।
स्वयमेव प्रजाः सर्वा,
रक्षन्ति स्म परस्परम।।

त्या देशात कोणी राजा नव्हता, शासन करायला दंड नव्हता, दंडधारी शिपाई नव्हते. तेथले लोक स्वभावतःच धर्म जपणारे होते. ते धर्मबुद्धीच्या योगे परस्परांचे रक्षण करीत. आज तसे चित्र कुठे दिसेल काय? रावणाने सीतेस पळवले, पण तिला स्पर्श केला नाही. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्या दुष्मनाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचे फर्मान काढले. रामाला 14 वर्षे वनवासाची ‘शिक्षा’ ठोठावल्यावर त्याने विरोध केला नाही की त्यावर ‘स्टे ऑर्डर’ आणली नाही. कारण तो मातृपितृधर्म मानणारा होता. रावणाने सीतेला पळवले तेव्हा तो लंकेकडे निषेध खलिते पाठवत बसला नाही किंवा ‘सीतेचे अपहरण’ झाले म्हणून कोर्टात गेला नाही. त्याने लंकेवर सरळ चाल केली. न्यायालयात गेला असता तर तेव्हाची न्यायालयेही कदाचित लंकापती रावणाच्या इच्छेनेच न्यायदान करीत असती. आज कायदा आहे, घटना आहे, पण त्यातून कुणाला काय मिळते, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. विचारवंत लाओत्से नेहमी म्हणत असे, ‘‘शास्त्र्ा वाचून माणसाला काहीही मिळत नाही’’ आणि तरीही त्याचे समकालीन त्याला म्हणत असत, ‘‘महाशय, हे आपण कसे काय बोलू शकता? तुम्ही तर कायद्याचा आणि शास्त्र्ाांचा पुष्कळ अभ्यास केला आहे. त्यात तुम्हाला काय मिळालं?’’ लाओत्से तेव्हा सांगत असे, ‘‘शास्त्र्ा ग्रंथ, कायद्याचे ग्रंथ वाचल्यानेच त्यातून काहीही मिळत नाही हा जो मला शोध लागला, तोच अत्यंत मौलिक आहे.’’ लाओत्से व आपल्या न्याययंत्रणेचे विचार मला सारखे वाटतात. देशाचे भावी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नुकतेच एक क्रांतिकारक विधान केले, ‘‘न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नाही, तर सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न सुटू शकतात.’’ याचाच अर्थ लाओत्से सांगतोय तेच खरे. शास्त्र्ा व कायद्याच्या पुस्तकाची ताकद संपली आहे.

न्यायाधीशांची शक्ती!

‘‘सरळ आणि स्पष्ट विधान करणे ही न्यायाधीशांची खरीखुरी शक्ती होय’’, असे जगभरातील कायदेतज्ञांचे मत आहे. रोमन लोकांच्या दृष्टीने न्यायदेवतेची पुढील प्रतीके होती – झंझावातातही न हलणारे सिंहासन, कोणत्याही भावनेच्या आहारी न जाणारे अंतःकरण, कोणाकडेही पक्षपाताने वा दुष्ट बुद्धीने न पाहणारे बांधलेले डोळे आणि सर्वच गुन्हेगारांवर सारख्याच निश्चिततेने आणि तटस्थ सामर्थ्याने कोसळणारी तलवार. तेथील सरन्यायाधीशांच्या न्यायालयात या देवतेचा पुतळा आहे, परंतु तेथे तिचे उग्र रूप नाहीसे झाले असून तिच्या चेहऱयावर स्मित खेळते आहे आणि जेव्हा या न्यायदेवतेसमोर सामान्य माणसाविरुद्ध खोटय़ा आरोपांची उधळण केली जाते तेव्हा तिच्या मुखातून कठोर, जहाल शब्दांचा अग्निवर्षाव केला जातो. हे सत्य आहे. आमच्या ‘सत्यमेव जयते’च्या खाली आंधळी न्यायदेवता आहे, तिची नेमकी काय स्थिती आज आहे?

‘लव्ह जिहाद’चा खेळ

धर्माचे राज्य आणावे असे काही लोकांना वाटते. धर्माचे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य नाही. धर्माचे राज्य नक्की कसे असेल याची प्रचीती आज येत आहे. अमरावती येथील खासदार श्रीमती राणा यांनी तेथील पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. त्या भागातील एक तरुण मुलगी बेपत्ता झाली व तिचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न लावले. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे श्रीमती राणा यांचे म्हणणे होते. या आरोपामुळे संपूर्ण अमरावती नव्हे, तर सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील ‘धर्मप्रेमी’ वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त जोरात दाखवून तणाव वाढवायला मदत केली. महाराष्ट्राच्या धर्मप्रेमी सरकारने चौकशीचे आदेश दिले. पोलीस यंत्रणा कामास लागली. त्या रात्री ही मुलगी सातारा रेल्वे स्टेशनवर सापडली. ती एकटीच होती. मुलगी म्हणते, मी स्वतःच रागाच्या भरात घर सोडून निघून गेले. ‘लव्ह जिहाद’ वगैरे सर्व खोटे आहे! त्या मुलीचे अपहरण वगैरे झालेच नव्हते, पण धर्माच्या नावावर तणावाचा प्रयत्न झाला. सध्या हे रोजच सुरू आहे. अशाने आपण रानटी युगाच्या दिशेने जात आहोत असेच म्हणावे लागेल. कायद्याचा उगम सुव्यवस्थेसाठी झाला. कायद्यात लोकमताला महत्त्व आहे. ‘पब्लिक क्राय’ हा शब्द अनेकदा आपल्या न्यायालयांनी वापरला आहे. विश्वात पूर्वापार एक व्यवस्था आहे हे नक्की. तिलाच आपले पूर्वज ‘ऋत’ म्हणत असत व ऋताचा भंग करणाऱयास वरुण शासन करतो अशी त्यांची भावना होती. ग्रीकांनी त्या देवतेस ‘नेमेसिस’ हे नाव दिले होते. आर्य, ग्रीकांसारख्या सुसंस्कृत समाजाच्या पूर्वी असलेल्या मानवी वंशाच्या आदिकाळी व आज अस्तित्वात असलेल्या काही रानटी समाजातही व्यवस्थेचे काही ना काही नियम आणि निर्बंध असतात. कळप करून राहणाऱया पशूंनासुद्धा निसर्ग शिस्तीचे नियम पाळण्यास शिकवितो व ते नियम त्याचे प्रकृतिधर्म होतात. मानवी समाजाच्या प्रथमावस्थेत सवयीने आचार रूढ होतात. या रूढी लोकमताच्या भीतीने अमलात आणल्या जातात. हा कायद्याचा आद्यावतार. मात्र काही लोक जेव्हा या आद्य अवताराकडून रानटी पद्धतीकडे जाताना दिसतात तेव्हा भय वाटते. अनियंत्रित राजसत्ता मन मानेल ते निर्बंध घालते व हे निर्बंध जुलमी असले तरी भीतीने ते जनतेला पाळावे लागतात. कायदे निर्माण करण्याच्या व ते अमलात आणण्याच्या पद्धतीत लोकमताचे स्थान असणे हे लोकशाहीचे ध्येय आहे. राजाच्या किंवा हुकूमशहाच्या ‘हम करे सो’ कायद्यापासून आम जनतेचे रक्षण करावे लागेल. तरच आपण ‘आम लोक करे सो’ कायद्यापर्यंत पोहोचू शकू.

घटना, ‘कॉन्स्टिटय़ुशन’ हा शब्द आता विनोदी अर्थाने घेतला जातो. ‘भाषेला जसे व्याकरण तशी स्वातंत्र्याला घटना’ हे टॉमस पेनचे वाक्य लोकशाहीच्या कायद्याचे वेदवाक्य आहे. कायदा निर्माण करणाऱया वि-नायक गण-राजाने स्वतःकरिता हा घटनेचा अंकुश राखून ठेवला आहे.

धर्माचे राज्य पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लिबियात सुरू आहे. धर्मराज्याची भांग ज्यांच्या डोक्यात चढली आहे, त्यांनी या सर्व देशांतील धर्मराज्यांची वाताहत डोळे भरून पाहावी. या महान देशाला लाभलेली घटना, स्वातंत्र्य व कायद्याचे राज्य आपण बुडवायला निघालो आहोत.
कर्तव्यपथावर फक्त कायद्याचेच राज्य हवे! धर्मराज्य आपापल्या घरात!

[email protected]