रोखठोक – अथेन्स नगरी, चौपट दिल्ली!

>> कडकनाथ मुंबैकर << 

पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, पण संभ्रम असा की, कोणते मोदी खरे? लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचार संपूर्ण मिटविण्याची गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईचे भय होते व त्या भयाने भूमिगत झालेल्या खासदार भावनाताईंचे रक्षाबंधन करून घेणारे मोदी खरे? भाजपने तरी यावर प्रकाशझोत टाकावा.

देशाच्या राजकारणात सध्या गमतीजमती सुरू आहेत. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही ही म्हण निरर्थक वाटावी असे रोज काहीतरी घडत आहे. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत आलेल्या एका छायाचित्राने सगळय़ांच्याच भुवया उंचावल्या. आपले पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन शिवसेनेच्या फुटीर खासदार भावना गवळी यांनी प्रेमाची राखी बांधली. भावना गवळी यांना अगदी गदगदून आले आहे व पंतप्रधान मोदी नव्या बहिणीच्या प्रेमाने हरखून गेले असे ते भुरळ पाडणारे छायाचित्र! भावना गवळी पंतप्रधानांच्या घरी पोहोचल्या तेव्हा बंधुराज श्री. मोदी यांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. ‘‘या या, भावनाताई.’’ असे ते म्हणाले. श्रीमती गवळी अनेक वर्षे खासदार आहेत. मागची साडेतीन वर्षे त्यांना ‘ईडी’ने पीडले. त्यांच्या घरांवर, कार्यालयांवर ईडीचे छापे पडले. त्यांच्या शिक्षण संस्थांतील व्यवहारामागे ईडी लागली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी ‘महात्मा’ किरीट सोमय्या हे गवळीताईंच्या वाशिम मतदारसंघात पोहोचले. भावनाताईंच्या लोकांनी हल्लाबोल केला. तरीही सोमय्या डगमगले नाहीत. त्यांनी वाशिमच्या भूमीवरून जाहीर केले, ‘‘भावना गवळींना भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. भावनाताई जेलमध्ये जाणारच!’’ पुढे काय झाले? भावना गवळींना ईडीचे समन्समागून समन्स येत राहिले. भावना गवळी त्यांच्या मतदारसंघातून भूमिगत झाल्या. ईडीलाही त्यांचा शोध लागेना, पण गवळीताईंच्या खास लोकांना ईडीने अटक करून भ्रष्टाचाराला दणका दिला. पुढे काय झाले? तर भावना गवळी यांनी सरळ शिवसेना सोडली व शिंदे गटाच्या बोटीत चढल्या. दिल्लीत समुद्र नसला तरी त्यांची बोट किनाऱयाला लागली. रक्षाबंधनाच्या दिवशी तर भावनाताई थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या. आपल्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. ‘‘या ताई, बसा! इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही त्रास तर झाला नाही ना?’’

भावना गवळी यांनी पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली यात आक्षेप घ्यावे असे काहीच नाही. श्री. मोदी यांनी त्या पवित्र दिवशी अनेक शाळकरी विद्यार्थिनींकडून प्रेमाने रक्षाबंधन केले. पंडित नेहरूदेखील असे रक्षाबंधन करीत होते. पंतप्रधान हा देशातील भगिनींचा रक्षणकर्ताच असतो, पण भावना गवळी संकटात असताना भाजपातील एकही ‘भाऊ’ त्यांच्या मदतीस धावला नाही. म्हणजे एक तर भावना गवळी व त्यांच्या लोकांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्यात आले व आता ‘वॉशिंग मशीन’मध्ये प्रवेश करताना त्यांची सर्व प्रकरणे स्वच्छ झाली व त्यांना पंतप्रधान भेटीचा लाभ मिळाला! हे आश्चर्यकारक आहे.

आता भावनाताई एकदम मस्त आहेत. किरीट सोमय्यांनी भावनाताई श्री. मोदींना राखी बांधत आहेत या फोटोचे लॉकेट करून आपल्या गळ्यात बांधले आहे. यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे यांच्या फोटोंची लॉकेटस् त्यांनी सोनाराकडे बनवायला दिली आहेत. प्रश्न इतकाच आहे की, नक्की कोणते मोदी खरे? भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे देशाला लाल किल्ल्यावरून वचन देणारे मोदी खरे, की भावनाताईंकडून आदरपूर्वक राखी बांधून ‘संरक्षणा’ची हमी देणारे मोदी खरे?

भाजपवाल्यांनो, काही तरी गडबड आहे!

फौजा कशावर चालतात?

नेपोलियन म्हणत असे, सैन्य पोटावर चालते. आता आमदार-खासदारांच्या फौजा खोक्यांवर चालतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत खोकेवाल्या आमदारांच्या नावाने शिमगा झाला. तेव्हा त्या निर्लज्ज लोकांच्या माना क्षणभर खालीच गेल्या असतील! राजकारणात सज्जन कोणाला म्हणावे, हा प्रश्नच आहे. महाभारत काळातही धर्मराजाला एक सज्जन माणूस शोधून आणायला सांगितले. दिवसभर वणवण करूनही धर्मराजांना एक सज्जन माणूस मिळू शकला नाही. इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात डायोजिनीस नावाचा एक ग्रीक तत्त्ववेत्ता होऊन गेला. एकदा दिवसाढवळय़ा ऐन उन्हात तो हातात दिवा घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचा चेहरा निरखून पाहू लागला. वृद्ध डायोजिनीस त्याच्या विक्षिप्तपणाबद्दल अथेन्स शहरात मशहूर होता. त्यामुळे भरदुपारच्या उन्हात दिव्याच्या प्रकाशात रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाचा चेहरा डायोजिनीस न्याहाळीत असलेला पाहून अथेन्समधल्या नागरिकांना नवल वाटले नाही. मात्र प्रत्येक माणसाचा चेहरा निरखून पाहिल्यानंतर तो मान हलवून निराशा दर्शवीत असलेला पाहून अनेकांनी कुतूहलापोटी त्याला विचारले, ‘‘आपण भरदुपारी काय शोधीत आहात एवढे? काही हरवलं आहे का आपलं?’’

‘‘होय बाबा. अथेन्समध्ये एक तरी प्रामाणिक माणूस राहतोय का ते मी केव्हापासून शोधतोय, पण एकही प्रामाणिक माणूस मला दिसलेला नाही. तुम्ही तरी पाहिलाय का एखादा?’’ त्यावर काहीही उत्तर न देता मान खाली घालून अथेन्सचे नागरिक निमूटपणे निघून जात असत.

हिंदुस्थानची आजची परिस्थिती अथेन्स नगरीप्रमाणेच झालेली दिसत नाही काय?

डागी कोण?

बिहारात नितीश कुमारांनी भाजपास दूर करून राष्ट्रीय जनता दलाबरोबर सरकार स्थापन केले. त्याबरोबर भाजपमधील सत्य व प्रामाणिकपणाचा अंश जागा झाला व नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात कसे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत यावर ते प्रकाशझोत सोडू लागले. भारतीय जनता पक्षाचे 152 खासदार या ना त्या गुन्हय़ांमुळे ‘डागी’ आहेत हे ते विसरले. बिहारच्या कायदामंत्र्यावर ‘वॉरंट’ आहे म्हणून धोपटाधोपटी सुरू आहे. या कायदामंत्र्यांनी पलटी मारून भाजपच्या मनगटास राखी बांधली तर त्या ‘वॉरंट’च्या कागदाचे गुलाबी प्रेमपत्रात रूपांतर होईल. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे अत्यंत सचोटीचे गृहस्थ आहेत. त्यांना मंत्री केले नाही, पण आता महाराष्ट्राचे अध्यक्ष केले. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे हे ऊर्जामंत्री असतानाही त्यांचे तिकीट कापले गेले होते! यावर कोणी प्रकाशझोत टाकेल काय? आजचे कर्तबगार, मेहनती, निष्ठावान बावनकुळेंना तेव्हा तडकाफडकी दूर का लोटले, हेसुद्धा भावनाताईंच्या रक्षाबंधनाप्रमाणे मोठेच गौडबंगाल आहे. अशी अनेक गौडबंगाले व रक्षाबंधने नजीकच्या काळात होत राहतील, पण सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न कायम राहील. कोणते मोदी खरे? लाल किल्ल्यावर तिरंगा फेटा घालून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, की ‘या भावनाताई’ अशा बंधुप्रेमाची साद घालणारे? पंतप्रधान मोदी यांची कोणीतरी फसवणूक करतेय.

करेक्ट कार्यक्रम

महाराष्ट्रातील खोकेबाज आमदारांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात आहे. खरे तर महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता व निकाल लागताच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दलबदलूंच्या राजकीय भ्रष्टाचारावर प्रहार करायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारण व समाजजीवनात स्वच्छ राजकारणी म्हणून, एक श्रेष्ठ पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा इतिहासात टिकावी असे वाटते, पण राजकीय विरोधकांवर पेंद्रीय तपास यंत्रणेचा झाडू आणि भावनाताई, यशवंत दादांच्या तोंडी शुद्ध तुपातला लाडू असा एपंदरीत करेक्ट कार्यक्रम सुरू आहे. बिहारचे सरकार घेरण्याची रणनीतीदेखील स्पष्ट दिसतेय.

तेथले ताई-भाऊ दिल्लीच्या किनाऱयावर कधी लागतात ते पाहू.

प्रामाणिकपणाची लाट या देशात कधीच आली नव्हती, पण वादळात काही आशेचे दिवे लुकलुकत होते.

तेही विझताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींकडून 2014 पासून अपेक्षा होत्या. आजही आशेचे कमळ कोमेजलेले नाही हे कृतीने दिसू द्या.