रोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण! साक्षीच्या लग्नाची गोष्ट

1618

rokhthokउत्तर प्रदेशातील एका लग्नाची गोष्ट सध्या गाजते आहे. साक्षी व अजितेश यांच्या लग्नात जातीची भिंत आडवी आली. अनारकलीस मोगल राजाने भिंतीत चिणून मारले. तसे आता साक्षी-अजितेशचे होईल अशी भीती वाटते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मधून भाष्य करावे, देशाला संदेश द्यावा असे हे प्रकरण आहे.

रेंद्र मोदी यांना 2019 या निवडणुकीत सर्वच जातीधर्माच्या लोकांनी मतदान केले; पण प्रत्यक्षात वैयक्तिक आयुष्यातून जात गेली नाही. एका लग्नाने हे जात प्रकरण पुन्हा उफाळून आले. उत्तर प्रदेशातील बरेलीचे भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी. तिने अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले. त्यामुळे दलित विरुद्ध सवर्ण असा नवा संघर्ष उत्तर प्रदेशच्या भूमीवर उभा राहिला. अलाहाबाद उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हस्तक्षेप करेपर्यंत हे प्रकरण टोकास गेले. संपूर्ण उत्तर प्रदेशचे वातावरण त्यामुळे ढवळून निघाले. आमदार मिश्र यांची कन्या साक्षी व तिच्या नवऱ्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला व आपल्या वडिलांपासून जिवाला धोका असल्याचे सांगितले. साक्षी आणि अजितेश अलाहाबादच्या न्यायालयात पोहोचले. न्यायालयाच्या बाहेर अजितेश याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. न्यायालयाने या दोघांना संरक्षण दिले. पण ‘आम्हाला शांतपणे जगू द्या’ असा आक्रोश साक्षी मिश्राने केला. आपला देश आजही कोणत्या युगात वावरत आहे? एका बाजूला आमचे शास्त्रज्ञ ‘चांद्रयान’ चंद्रावर सोडत आहेत. सारे जग हिंदुस्थानचा प्रयोग अचंब्याने पाहत आहे. त्याच देशात दोन सुशिक्षित प्रौढ, सज्ञान तरुण-तरुणींनी एकमेकांच्या संमतीने लग्न करणे हा सामाजिक अपराध ठरतो आहे.
डॉ. आंबेडकर व कलम 15
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक संविधान दिले. त्या संविधानातील ‘कलम 15’ जातीच्या भिंती व कल्पना तोडण्यासंदर्भात आहे. अनुभव सिन्हा या दिग्दर्शकाने ‘आर्टिकल 15’ हा वास्तववादी चित्रपट उत्तर प्रदेश, बिहारातील जातीप्रथेवर बनवला. आपल्याकडे समानता ही वरवरची आहे. जात प्रत्येकाच्या मनात आहे आणि ती जाणार नाही अशीच एकंदर परिस्थिती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरा विवाह ब्राह्मण असलेल्या सविता कबीर (माईसाहेब) यांच्याशी केला. त्यास मान्यता मिळाली. मात्र त्याआधी जातीयवाद्यांनी खळखळ केली. पण डॉ. आंबेडकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते, आता अजितेशने ब्राह्मण मुलीशी लग्न केले हा अपराध ठरला. घटनेचे कलम 15 हे धर्म, जात, जन्म ठिकाण, लिंग याबाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास मनाई करते असे आपली घटना सांगते. तरीही जातीपातीच्या आणि खोटय़ा सामाजिक प्रतिष्ठेच्या भिंती आजही तेवढय़ाच भक्कम आहेत. कोणा त्या तोडण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे नातेच त्यांच्या जिवावर उठते. उत्तर प्रदेश, बिहार व हरयाणात अशा प्रकारे अनेक हत्या व खून झाले आहेत. ‘ऑनर किलिंग’ हे आता समाजात प्रतिष्ठेचे लक्षण ठरले आहे व अनेक प्रतिष्ठत, तालेवार घराण्यात असे ऑनर किलिंग घडले आहेत. साक्षी व अजितेशलाही वाटते की, त्यांची हत्या होईल व पंतप्रधान मोदी यांना हे आव्हान आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या ‘मन की बात’मधून अनेक सामान्य व्यक्ती व सामान्य घटनांचा उल्लेख करतात. त्यातून एक संदेश मिळतो. साक्षी व अजितेश लग्नावरही त्यांनी ‘मन की बात’मधून भाष्य केले पाहिजे. हे त्या दोघांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. कोणत्याही जातीची भिंत त्यांना अडवू शकत नाही.
‘गें’चे लग्न चालते
आपल्या समाजाचे एक आश्चर्य वाटते. समाजाने व कायद्याने समलैंगिक संबंधांना मान्यता दिली. आता दोन समलिंगी व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात; पण तोच समाज सुजाण स्त्री-पुरुषांना आपल्या इच्छेनुसार लग्न करू देत नाही. साक्षी-अजितेश यांच्या जिवालाही उद्या धोका पोहोचू शकतो; त्यांना नवरा-बायको म्हणून नांदू दिले जाणार नाही. कोणत्या प्रतिष्ठेच्या भुरटय़ा संकल्पनेत आपण गुरफटलो आहोत? हिंदू संस्कृतीत लग्नपद्धतीत व्यभिचारास स्थान नाही. जगात हिंदू लग्नपद्धती आदर्श आहे. एखाद्याच्या विवाहित पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱया पुरुषाला घटनेतील कलम 497 नुसार गुन्हेगार मानले जाते व अनैतिक संबंधांचा गुन्हा सिद्ध झाल्यास किमान सहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक दिवस ‘व्यभिचार’ रोखणारे व हिंदू लग्नपद्धतीस कवच देणारे कलम 497 रद्द केले. जणू प्रतिष्ठित मंडळींची सोयच न्यायालयाने केली, असे मत एका निवृत्त न्यायाधीशाने यावर व्यक्त केले. या कलमाची गरज असताना ते उडवून लावले गेले व ‘कलम 15’ आता कुचकामी ठरले. समाज, संस्था व संस्कारांना घटनेने दिलेले संरक्षण आमची न्यायालयेच उडवून लावत आहेत. ‘गे’ म्हणजे समलैंगिक संबंधांना जगात मान्यता आहे; पण म्हणून हिंदुस्थानही ‘गे’ लोकांची भूमी होऊ नये. जगात भोगवादी संस्कृती वाढली, लग्नसंस्कारांचे महत्त्व उरले नाही. म्हणून हिंदुस्थानी घटनेतील 377 कलमातून समलैंगिकतेला उडवण्याची न्यायालयाला आवश्यकता होती का, असा प्रश्न गेल्या वर्षी न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला तेव्हा अनेकांना पडला होता, पण ठीक आहे, न्यायालयाने ते केले. देशाच्या पंतप्रधानांनी व्यभिचाराचे कलम हटवले तेव्हाही मतप्रदर्शन केले नाही व आता साक्षी-अजितेशवरही भाष्य केले नाही. त्यांनी ते करावे ही देशाची इच्छा आहे.
हा लव्ह जिहाद?
हिंदू मुलीने मुसलमान तरुणाशी लग्न करताच त्यास ‘लव्ह जिहाद’चे नाव देऊन दंगली भडकवल्या जातात. अशा ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा वापर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांकडून केला जातो. कैराना व मुझफ्फरनगर दंगलीमागे अशीच प्रकरणे होती; पण साक्षी-अजितेश यांचे लग्न कोणत्या लव्ह जिहादचा भाग आहे? मायावती यांच्या मंत्रिमंडळात सवर्ण किंवा उच्चवर्णीय काम करीत. तेथे जातीची बंधने नसतात. सत्ता आणि पैशाला ना जातीचा रंग, ना धर्माचा वास असतो. मात्र लग्नासारख्या पवित्र बंधनाला तो हमखास असतो. हा भेद आणि विषमता जातीची तर आहेच, पण गरीब-श्रीमंतीचीदेखील आहे. संस्कार, संस्कृती हा विषय तर आहेच. साक्षी-अजितेशच्या लग्नाने समाजाचे खरे स्वरूप समोर आले. हिंदुस्थानच्या चेहऱ्यावर एकतेचा व समानतेचा फक्त मुखवटा आहे. मूळ चेहरा विद्रूप आणि फाटलेला आहे. ‘आर्टिकल 15’ चित्रपटात ‘सिवरेज’ टाक्यांत उतरून सफाई करणाऱयांचे चित्रण विदारक आहे. हे काम आजही दलितांना करावे लागते. सीमेवर जितके जवान हौतात्म्य पत्करत नाहीत त्यापेक्षा जास्त लोक ‘सिवरेज टँक’ साफ करताना गुदमरून मरतात. मोदींचे सरकार ‘टॉयलेट’, ‘शौचालये’ बांधत आहे; पण हे सिवरेजचे बळी प्रकरण कधी थांबवणार, हा प्रश्न आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाप्रमाणे ‘सिवरेज : एक भयकथा’ आहे व साक्षी-अजितेशची लग्नकथा हा ‘हॉरर’ चित्रपट आहे.
नितीन कटरा प्रकरण
जे उत्तर प्रदेश आणि बिहारात घडताना दिसते, त्यास मान्यता देणारे देशाचे शत्रू ठरवायला हवेत. आपल्या देशातील श्रीमंत लोक घरातील कुत्र्यांची लग्ने थाटात करतात. कुत्र्यांच्या लग्नाचे निमित्त करून ‘पार्ट्या’ देतात. त्या समाजास साक्षी-अजितेशचे लग्न मान्य नाही. उत्तर प्रदेशचे एक बाहुबली नेते डी. पी. यादव यांच्या मुलीने जातीबाहेरच्या नितीन कटरा या सुशिक्षित तरुणाशी प्रेम केले म्हणून डी. पी. यादवांच्या मुलाने नितीन कटराची हत्या केली. नितीनच्या आईने हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढवले व न्यायालयाने यादवांच्या मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज साक्षी मिश्राला भीती वाटते, तिचा पती अजितेश यालाही वडिलांचे गुंड ठार करतील. समाज जात-धर्माच्या खोट्या प्रतिष्ठेच्या गुंत्यातून बाहेर पडायला तयार नाही व राज्यकर्ते जातव्यवस्था मोडायला तयार नाहीत. कारण जे आहे ते त्यांच्या सोयीचे आहे. दोनशे वर्षांपूर्वी नव्हते त्यापेक्षा आज जातींना जास्त महत्त्व आले. देशाचे संपूर्ण राजकारणच जातीभोवती फिरत आहे. मायावती यांनी लखनौला महात्मा फुले व शाहूंचा भव्य पुतळा उभारला आहे; पण त्याच प्रदेशात साक्षी-अजितेशच्या लग्नावरून जातीय संघर्ष निर्माण झाला.
370 कलम हटवण्याइतकेच जात हटवणे महत्त्वाचे ठरले आहे. लग्नसंस्थेतील व्यभिचार नाकारणारे 497 कलम पुन्हा प्रस्थापित व्हावे व ‘जात’ पंचायतीला लगाम घालणे हेच आधुनिक हिंदुस्थानचे स्वप्न आहे.

मोदींचा नवा भारत तरच वेगाने पुढे जाईल, पण त्यास संस्कार व संस्कृतीची चाके नसतील तर दलदल होईल.

Twitter- @rautsanjay61
Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या