रोखठोक : सिंगापूरकडून काही शिका! नेते, राजकीय पक्ष श्रीमंत; देश श्रीमंत कधी होणार?

rokhthok

सिंगापूरसारख्या लहान देशाकडून आपल्याकडील राजकारण्यांनी प्रशिक्षण घ्यायला हवे. एखाद्या उद्योगास फायदा होतो तेव्हा कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. सिंगापूर सरकारने ‘बजेट सरप्लस’ झाले म्हणून नागरिकांना बोनस जाहीर केला. याला म्हणतात श्रीमंती. आपण 70 वर्षांनंतरही कलम 370, कश्मीर, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि पाकिस्तान आदी प्रश्नांचे दळण दळत आहोत. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेला श्रीमंत करण्याची घोषणा केली. त्यांचे अभिनंदन!

देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक मूळ मुद्द्यापासून भरकटली आहे. मुद्दे भरकटून जावेत याच तंत्राने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. देशावर एखादे संकट आले तर ऐक्याचे मजबूत दर्शन घडवणाऱ्या देशाला राष्ट्रवाद म्हणजे काय, याचे डोस निवडणुकीच्या निमित्ताने पचवावे लागत आहेत. काँग्रेसचा राष्ट्रवाद वेगळा व भाजपचा राष्ट्रवाद वेगळा हे फक्त आपल्याच देशात घडू शकते. ‘राष्ट्रवाद’ हा प्रचाराचा मुद्दा अमेरिका, युरोप, सिंगापूर, मलेशिया, चीन, फ्रान्स राष्ट्रांत कधीच झाला नाही. नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य, लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनांतील यश-अपयश हाच प्रचाराचा तेथे मुद्दा ठरतो व त्यावरच तेथील सरकारे बनतात किंवा पडतात. गेल्या अनेक निवडणुका आपल्याकडील मुद्द्यांपैकी कोणत्याही मुद्द्याला धरून तेथे झाल्या नाहीत. आपल्याकडे निवडणुका म्हणजे मुष्टीयुद्ध बनले आहे. महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे राजकारण संपविण्याची घोषणा केली व त्यासाठी ते पवारांच्या बारामतीत चार दिवस तळ ठोकून बसणार आहेत. पाटील यांनी हे तत्काळ केले पाहिजे. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या मंडळींच्या राजकारणास पूर्णविराम दिला गेला. शरद पवारांच्या बाबतीत ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली असेल तर त्यांचे स्वागत आहे. निवडणुका व राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र असे की, येथे कोणीच कधी संपत नाही. चार वर्षांपूर्वी रामदास आठवले यांच्या तुलनेत प्रकाश आंबेडकर कोणीच नव्हते. आज आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीभोवती महाराष्ट्राचे राजकारण एकवटले आहे. चकाकते ते सगळेच सोने नसते व अडगळीत पडलेले सगळे भंगार नसते. राजकारणातले हे महत्त्वाचे सूत्र आहे.

यांना प्रशिक्षण द्या
हिंदुस्थानातील राजकीय पक्ष व त्यांच्या प्रमुखांचे प्रशिक्षण ‘युनो’ने घ्यायला हवे किंवा जगातील सर्वच निवडणुकांसाठी एक जागतिक आचारसंहिता निर्माण व्हायला हवी. लोकांचे मुद्दे जे छापील जाहीरनाम्यात दिसतात ते प्रचारात आणि अंमलबजावणीत दिसत नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी जळगावात केलेले एक वक्तव्य मला महत्त्वाचे वाटते. ‘प्रत्येक व्यक्तीस श्रीमंत करू’ असे ते म्हणाले. पाटील सांगतात, ‘शासनाला जीएसटी आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. 2022 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर या निधीतून शासन देशातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्यासाठी पैसा खर्च करील.’ श्री. पाटील महाराष्ट्राचे मंत्री आहेत. पण देशाच्या प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्याची भूमिका ते घेतात. केंद्रीय मंत्रिमंडळात पाटील यांना घेतले पाहिजे व ‘गरिबी हटाव’ मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायला हवी. पाटील यांची भूमिका चांगली आहे. सरकारच्या तिजोरीत जी.एस.टी. आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा जमा होत आहे त्यातून देशातील जनतेची श्रीमंती वाढत जाणार असेल तर चांगलेच आहे. जगभरातील अर्थतज्ञांनी गंभीरपणे विचार करावा, अशी योजना महाराष्ट्राच्या महसूलमंत्र्यांनी मांडली.

सिंगापूरचा धडा
जनतेला श्रीमंत करणे म्हणजे काय, ते सिंगापूरसारख्या देशाकडून आमच्या राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. मार्च महिन्यात जगभरातील वृत्तपत्रांनी एक बातमी छापली.
‘Singapore to pay bonus to all citizens after surplus budget.’
सिंगापूरमधील 21 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकास तेथील सरकार बोनस देणार आहे. नागरिकांच्या करपात्र उत्पन्नानुसार हा बोनस दिला जाईल. सिंगापूरच्या अर्थमंत्र्यांनी ‘सरप्लस बजेट’मुळे जनतेसाठी ही घोषणा केली.
एखादा उद्योग, व्यवसाय फायद्यात आला की कर्मचाऱयांना त्या फायद्यातील ठरावीक रक्कम ‘बोनस’ म्हणून दिली जाते. सिंगापूरचे सरकार फायद्यात चालत आहे व देश मजबूत करणाऱ्या नागरिकांना श्रीमंत करावे, असे सरकारला वाटले.
सिंगापूर हा तुलनेने छोटा देश. पण जात, धर्म, फालतू राजकारणाचा चिखल न तुडवता या देशाने प्रगतीची झेप घेतली. राजकारणी व नेत्यांनी फक्त देशाचा विचार केला व सिंगापुरी जनतेने देश घडविण्यासाठी सतत श्रम केले. त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था (सिंगापूर डॉलर्स) कायम मजबूत राहिली. आमच्या रुपयासारखी त्याने सदैव लोळण घेतली नाही. सिंगापूर हा फायद्यात चालणारा देश आहे. या फायद्याची फळे जनतेला मिळावीत असे सरकारचे मत आहे. 700 दशलक्ष सिंगापुरी डॉलर्स इतकी रक्कम सरकारला बोनस म्हणून द्यावी लागेल व किमान 27 लाख सिंगापुरी नागरिकांना या बोनसचा लाभ मिळेल. सिंगापूरच्या अर्थसंकल्पात (2017) 9.61 अब्ज डॉलर्सचा फायदा (Surplus) दाखवत आहे. मुद्रांक शुल्क व इतर कररूपाने मिळालेली ही रक्कम अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जनतेला श्रीमंत करून म्हणजे बोनस देऊनही जो पैसा राहील त्यातले पाच अब्ज सिंगापुरी डॉलर्स सिंगापूरमधील नव्या प्रकल्पांवर खर्च होतील. त्यात रेल्वे प्रकल्पांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. दोन अब्ज डॉलर्स अनुदानांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांवर आणि अपंगांवर खर्च होतील. उत्तम राज्यव्यवस्था व राजकारणाचा आदर्श नमुना म्हणजे सिंगापूर. जनतेला श्रीमंत करण्यासाठी देशाला श्रीमंत करावे लागते. त्यासाठी राज्य चालवणाऱयांकडे विचारांची श्रीमंती असावी लागते. आमच्या देशात श्रीमंती फक्त निवडणुकीत दिसते. कोटय़वधी रुपयांचा खजिना या काळात बाहेर पडतो. हे कसलं लक्षण?

दळण तेच!
हिंदुस्थानच्या निवडणुकांत चर्चा सुरू आहे ती कश्मीर आणि पाकिस्तानची (जी 70 वर्षांपासून सुरू आहे.), राममंदिराची आणि राष्ट्रवादाची, कश्मीरातील 370 कलम हटवण्याची (ही चर्चासुद्धा 70 वर्षांपासून सुरूच आहे). दळणाच्या चक्कीवर सगळेच उभे आहेत व त्याच त्याच विषयांचे पीठ काढत आहेत. अशाने देश श्रीमंत कसा होणार व जनता श्रीमंत कशी होणार? ‘गरिबी हटाव’च्या घोषणा सगळेच करीत आले, पण सिंगापूरप्रमाणे जनतेला ‘बोनस’ देऊन श्रीमंत कधी करणार?

महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेला श्रीमंत करण्याची घोषणा केली. त्यांचे स्वागत करूया!

Twitter- rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या