रोखठोक- दिल्लीत यमाचा राजीनामा!

7648

rokhthokदिल्लीतील दंगलीचे चित्र विदारक आहे. मृत्यूचे अमानुष तांडव पाहून यमसुद्धा राजीनामा देईल. हिंदू-मुसलमानांची कोवळी मुले निराधार झाली. अनाथांचे नवे जग आपण निर्माण करीत आहोत. मुदस्सर खानच्या मुलाचा फोटो जगभरात प्रसिद्ध झाला. तो फोटो काळीज चिरणारा आहे!

“कहीं मंदिरों में दिया नही
कहीं मस्जिदों में दुआ नही
मेरे शहर में है खुदा बहुत
मगर आदमी का पता नही”

हे वास्तव पुन्हा एकदा दिल्लीच्या दंगलीत दिसले. जातीय आणि धार्मिक दंगली होतात तेव्हा माणुसकी दाखवणाऱ्या अनेक घटनांचे भांडवल केले जाते. ‘भाईचारा’ हा घासलेला शब्द त्यासाठी प्रचलित आहे; पण माणूसपण हरवलेले राजकारण, त्या राजकारणातून निर्माण होणारा निर्घृण धार्मिक उन्माद, त्या उन्मादाने जन्मास घातलेला नवा राष्ट्रवाद देशातला उरलासुरला माणूस मारत आहे. दिल्लीच्या दंगलीत पन्नास जण मारले गेले (खरा आकडा शंभरच्या वर असावा), पाचशेहून जास्त लोक जखमी झाले. शेकडो लोकांचे संसार, पोटापाण्याचे उद्योग बेचिराख झाले. त्या राखेत उभी राहून निराधार झालेली लहान मुले आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ शोधत आहेत. हे चित्र राजकारण्यांना दुःख देत नसेल तर त्यांनी स्वतःला यमाचे वारसदार म्हणून जाहीर करायला हवे. दिल्लीत रक्तपात, मृत्यूचे तांडव पाहून यमही अस्वस्थ झाला असता व त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असता. देशाचे हे चित्र भयानक आहे!

फक्त आकडे आले
दंगली, दुष्काळ, महापुरात किती जण मेले याचे आकडे येतात, पण त्या सगळ्यात किती मुले अनाथ, बेवारस झाली ते आकडे यायला हवेत. दिल्ली दंगलीनंतर एका निरागस मुलाचा फोटो जगभरात प्रसिद्ध झाला. बापाच्या प्रेताजवळ उभा राहून हा मुलगा आक्रोश करीत आहे. हा फोटो पाहूनही जर कोणी हिंदू-मुसलमान असाच खेळ करीत असेल तर तो माणूस म्हणून जगायला लायक नाही. ‘शाहीन बाग’ परिसरातील आंदोलन हा वादाचा विषय ठरू शकतो. कोणी तेथे भडकावू भाषणे केली, कोणी आगी लावल्या, हे सर्व कोण लोक होते ज्यांनी पन्नासावर लोकांचे प्राण घेतले? असे प्रश्न अनेक निरागस मुले, त्यांच्या आयांच्या डोळ्यांतील ओघळणारे अश्रू करीत आहेत. असेच प्रश्न अंकित शर्माची आई, राहुल सोलंकीचा पिता आणि मुदस्सर खानच्या कोवळ्या मुलाच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू करीत आहेत. रक्ताला धर्मानुसार रंग नसतो तसा अश्रूंनाही नसतो. त्या निरागस मुलाचा फोटो मला आजही अस्वस्थ करीत आहे. कोण तो मुलगा? दिल्लीच्या मुस्तफाबादचा मुदस्सर खान आता हे जग सोडून गेला आहे. त्याचा मृतदेह घरी पोहोचला तेव्हा संपूर्ण इलाखा आक्रोश करीत होता. त्याच्या ‘जनाजा’चे असे चित्र कॅमेऱ्याने टिपले की, त्यातून शेकडो प्रश्न इंगळ्या डसाव्यात तसे डसले. प्रत्येक जिवंत माणसाला मुळापासून हादरवून सोडेल असा तो फोटो होता. येथे जिवंत असणे म्हणजे काय? फक्त पापण्यांची उघडझाप होणे व श्वास चालणे, ओठांची हालचाल होणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण नाही. हृदयात माणुसकीचा दिवा पेटलेला असणे म्हणजे जिवंतपणा. ही माणुसकी म्हणजे ‘इन्सानियत’ त्या दिवसांत खत्म झाली. एक 8-10 वर्षांचा मुलगा आपल्या पित्यास निपचित पडलेला बघून रडत होता. त्याला त्याच्या बापाची ज्या वयात साथ हवी होती त्याच वयात वडिलांनी जगाचा निरोप घेतला. राजकारण्यांनी जे द्वेषाचे जहर पेरले त्यामुळे त्याचे पित्याचे छत्र उडून गेले. मुदस्सर खानच्या त्या निरागस मुलाचे अश्रू आणि आक्रोशाने दिल्लीतील दंगलीचे खरे चित्र जगासमोर आणले.

जगाचा विनाश
हिंदुत्व, निधर्मीपणा, हिंदू-मुसलमान, ख्रिश्चन-मुसलमान वादाने जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. धार्मिक संहारात माणसं मारली जात आहेत. ‘‘वाचवा! वाचवा’’ असा आक्रोश देवा-धर्माच्या नावाने केला जातो. मदतीला ना ईश्वर धावतो, ना अल्ला धावतो, ना येशू धावतो. माणसाला स्वतःच्या हिमतीवर जगायचे आहे. ‘सरकार’ नावाचा मायबापही अशा संकटाच्या वेळी दरवाजे, खिडक्या बंद करून बसतो. दंगल संपल्यावर आता आकडे निघत आहेत. किती हिंदू आणि किती मुसलमान मेले? मुदस्सर खानच्या मुलाचा फोटो जसा रडायला लावतो तसा आणखी एक फोटो प्रसिद्ध झाला. एक शाळकरी मुलगा त्याच्या बेचिराख झालेल्या घराच्या राखेतून शाळेची जळकी पुस्तके बाहेर काढीत आहे. ही पुस्तके उर्दू नसून हिंदी आहेत. त्या राखेत तरी हिंदू-मुसलमान शोधू नका, पण तसे शोधणे सुरूच आहे. ही राख म्हणजेच राजकारण्यांची रोजीरोटी बनली आहे.

जग का उजळले?
थॉमस अल्वा एडिसनने धर्म मानला नाही. अल्ला, ईश्वर, गॉड त्याच्या खिजगणतीतही नव्हते. जगात अनेक धर्म आहेत. तितक्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत. त्या प्रत्येकाचे घर एडिसनने उजळून टाकले. लोकांची घरे, जीवनातून अंधार दूर केला. म्हणूनच ईश्वर, खुदा, गॉडच्या शक्तीपेक्षा जग आज ‘इलेक्ट्रिसिटी’वर विश्वास ठेवते. आपण मात्र देशाच्या राजधानीत ‘हिंदू-मुसलमान’ खेळ करीत बसलो आहोत. धर्म माणसाला अन्न देत नाही. ते कष्टाने मिळवावे लागते. चीन ही एक महाशक्ती. तेथे ‘कोरोना’ व्हायरसने हैदोस घातला. चीन आज भीतीने लटपटत आहे. त्यांच्या श्रद्धा आणि देवही त्यांना वाचवू शकत नाहीत. जगात असंख्य रोग आहेत, दुर्धर आजार आहेत. हे सर्व लोक अल्ला, ईश्वर, गॉडचा जप करीत असतात; पण शेवटी त्यांना फ्लेमिंगने शोध लावलेली ‘ऑण्टिबायोटिक’ औषधे घेऊन बरे व्हावे लागते. परंतु आपण धर्माच्या नावावर एकमेकांच्या हत्या करीत आहोत. मुदस्सर खानला ना अल्लाने वाचवले, अंकित शर्माला ना ईश्वराने वाचवले. मंदिर, मशीद, चर्चच्या धुंदीतून बाहेर पडा आणि शाळा, कॉलेजच्या दिशेने पुढे जा, असे सांगणारा प्रेषित येथे जन्माला आलाच नाही. दिल्लीत दंगलीने पोरांना अनाथ केले तसे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, कर्जाच्या ओझ्याने ‘बाप’ आत्महत्या करतो व पोरेबाळे अनाथ होतात. मुदस्सर खान दंगलीत मेला तसा पाथर्डीच्या प्रशांत बटुळे या तिसरीत शिकणाऱ्या मुलाने आपला बाप गमावला. शेतकरीपणाचे दुःख, कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मल्हारी बाबासाहेब बटुळे याने जीवन संपवले. त्याच्या दोन तास आधी त्यांचा मुलगा प्रशांत याने शाळेत एक कविता सादर केली, ‘अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!’ ज्या बापासाठी ही कविता सादर केली त्या बापानेच दोन तासांत आत्महत्या केली. मुदस्सर खान आणि पाथर्डीचे मल्हारी बाबासाहेब बटुळे हे दोन्ही ‘खून’ आहेत. त्यांच्या खुनाने त्यांच्या निरागस मुलांच्या भविष्याचीही हत्या झाली. दोघांनाही अनाथ होण्यापासून सरकार वाचवू शकले नाही. जगभरात हेच घडत आहे. अनाथांचे नवे जग आपणच निर्माण करीत आहोत. सीरिया, इराक, अफगाणिस्तान अशा अनेक राष्ट्रांतील युद्धज्वरात बॉम्बहल्ले सुरूच आहेत. त्यात कोवळी मुले निराधार होतात. अशा निराधार मुलांचा फोटो पाहून आपण हळहळतो. ते तर लांबचे, पण आमच्या उंबरठय़ावर मुदस्सर खानचा आणि मल्हारी बाबासाहेब बटुळेचा मुलगा निराधार झाला त्याचे दुःख कोणी करेल काय?

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या