रोखठोक – भाजपच्या रिझर्व्ह बँकेवर हल्ला! जगातील कोणत्या शक्तीचा हात?

गौतम अदानी यांचे आर्थिक साम्राज्य तकलादू पायावर उभे होते. हिंडेनबर्गच्या एका अहवालाने त्यांचे राज्य कोसळले. अदानी म्हणजे भारत हे सांगणे भारतमातेचा अपमान. अदानी व मोदी, भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भाजपचा मुख्य अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानीवर हल्ला झाला काय? अदानीवरील हल्ला हा भाजपच्या रिझर्व्ह बँकेवर हल्ला आहे.

गौतम अदानी प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे व जगात भारतीय अर्थव्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत. एखाद्दुसऱ्या उद्योगपतींच्या करंगळीवर एखाद्या महान देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा असावा हे हास्यास्पदच होते, पण गेल्या सात-आठ वर्षांत हा पोकळ डोलारा उभा राहिला. ही करंगळी श्री. अदानी यांची होती की प्रत्यक्ष आपले पंतप्रधान मोदी यांची, हाच संशोधनाचा विषय आहे.

मुळात गौतम अदानी व त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य तकलादू पायावरच उभे होते. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या एका फुंकरीने ते कोसळले. त्याचा फटका देशाला बसला. अदानी यांच्या आर्थिक साम्राज्याचा मुखवटा ओढणे हा देशावरचा हल्ला असे आता सांगितले जात आहे. अदानी म्हणजेच भारत असे आता बोलले गेले. हा भारतमातेचा अपमान. प्रश्न काय आहे? 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचे कारण एकच, अदानी व मोदी. अदानी व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतीय अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लूटमार सिद्ध होऊनही भाजप गप्प आहे. यामुळे ते सिद्धच झाले. अदानी म्हणजे भाजप याचा अर्थ स्पष्ट आहे. अदानी यांच्याकडे भाजपचा पैसा गुंतला आहे. तेच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार आहेत. भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर हल्ला झाला! अदानींवरील हल्ला हा भाजपच्या ‘रिझर्व्ह बँके’वर हल्ला आहे.

आणीबाणीच्या कालखंडात ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा देण्यात आली. सध्या ‘मोदी म्हणजेच भारत’ असे सांगितले जात असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांनी स्वतःची तुलना भारताशी केली व आपल्या फसवणुकीवर झालेला हल्ला हा भारतावरील हल्ला असल्याचा दावा केला. त्यामुळे नक्की भारत किती व भारत कोणाचा? असा प्रश्न पडला आहे. गौतम अदानी कोण? हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी व त्यांच्या उद्योग साम्राज्याची श्रीमंती वाढत गेली. अदानी हे विमानतळापासून बंदरे, सार्वजनिक उपक्रमांचे मालक बनले. उद्योगाच्या सर्वच क्षेत्रांत ते घुसले व कमी काळात शिखरावर गेले. शेवटी शेवटी त्यांनी मुंबईतील ‘धारावी’ हा पुनर्वसन प्रकल्पही स्वतःच्याच पंखाखाली घेतला. देशातील विकासाच्या प्रत्येक विटेवर व मातीच्या कणावर अदानींचेच नाव असावे याची काळजी मोदींचे सरकार घेत राहिले व अदानींची श्रीमंती वाढावी म्हणून देशाच्या सार्वजनिक बँका, विमा पंपन्या अदानींना हजारो कोटी रुपये देत राहिल्या. पण हे साम्राज्य तकलादू पायावर उभे होते व अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या एका शोधनिबंधाने अदानींचे राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा यानिमित्ताने समोर आला व विरोधकांच्या घरी पाच-दहा लाखांच्या व्यवहारासाठी ईडी, सीबीआयची पथके पाठवणारे भाजप सरकार इतक्या मोठय़ा घोटाळय़ावर गप्प आहे!

ते का पळाले?
विजय मल्ल्या यांना भारतीय बँकांचे चार हजार कोटींचे कर्ज फेडता आले नाही व केंद्रीय यंत्रणा मल्ल्या यांच्या मागे हात धुऊन लागल्या. तेव्हा मल्ल्या यांनी देश सोडला. मल्ल्या यांच्या चार हजार कोटींच्या बदल्यात त्यांची भारतातील साधारण 10 हजार कोटींची संपत्ती केंद्रीय यंत्रणांनी जप्त केली. तरीही मल्ल्या हे आजही गुन्हेगार आहेत. बँकांचे कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात नीरव मोदी हा लंडनच्या तुरुंगात, तर मेहुल चोक्सी परागंदा आहे. चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडीओकॉनचे वेणुगोपाळ धूत यांनाही अशाच प्रकरणात अटक केली. मुंबई व दिल्लीच्या तुरुंगात ‘ईडी व सीबीआय’ने अनेक प्रतिष्ठत उद्योगपतींना पाच-पंचवीस कोटींच्या व्यवहारासाठी डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंग, बोगस कंपन्या स्थापन करून व्यवहार केल्याचे आरोप आहेत. तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले यांना फक्त 10 लाखांच्या ‘क्राऊड फंडिंग’ प्रकरणात ईडीने अटक केली. या सर्व पार्श्वभूमीवर श्री. गौतम अदानी व त्यांच्या कंपन्यांनी केलेले व्यवहार हे धक्कादायक आहेत. मनी लाँडरिंग, शेल कंपन्यांचे व्यवहार त्यात आहेत. अदानी समूहावर भारतीय बँकांचे दोन लाख कोटींच्या वर कर्ज आहे. त्यात सर्वाधिक कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. आपल्या संपत्तीची किंमत वाढवून, चढवून अदानी समूहाने हे कर्ज मिळवले व कर्ज मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आले. एलआयसीत मध्यमवर्गीयांचा पैसा सर्वाधिक गुंतला आहे. याच एलआयसीचे 55 हजार कोटी अदानी समूहात गुंतले व आता अडकले आहेत. या पैशांचे काय होणार?

फक्त देखावा
गौतम अदानी व त्यांच्या साम्राज्याचा पाया पंतप्रधान मोदी यांनी घातला हे कोणीच नाकारणार नाही. उद्योगपती व त्यांचे साम्राज्य वाढवणे यात चूक नाही, पण ते साम्राज्य म्हणजे देश असा देखावा उभा करणे हा अपराध. टाटा, बिर्ला, बजाज, हिंदुजा यांनी स्वतःला कधीच ‘राष्ट्र’ मानले नाही. त्यांच्या उद्योगांतही चढउतार झाले तेव्हा हा राष्ट्रावर हल्ला असल्याचे सांगितले नाही. अदानी यांनी स्वतःला राष्ट्र मानले. मोदी व अदानी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या लोकांनी ठरवले. तेव्हा अदानींमुळे देशाचे सध्या जे नुकसान सुरू आहे त्याची जबाबदारी मोदींच्या सरकारनेच घ्यायला हवी. अदानी यांच्या सर्व कंपन्या गळय़ापर्यंत कर्जात बुडाल्या आहेत असे ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने पुराव्यासह समोर आणले. अदानी ग्रुप स्टॉक एक्स्चेंज शेअर मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन करून आपल्या शेअर्सचे भाव वाढवतो हा दुसरा आरोप. अदानी समूह हा एक बुडबुडा आहे. सर्वकाही नकली आहे असे या ‘रिसर्च’ कंपनीचे म्हणणे आहे. तिरंग्याआड लपून, राष्ट्रवादाच्या नावाखाली अदानी ग्रुप देशाला लुटत आहे, असे हिंडेनबर्ग म्हणतोय. हे सर्व खोटे व बनावट आहे असे सांगण्यासाठी भाजपचा एकही पोपटलाल अद्याप पुढे आला नाही याचे आश्चर्य वाटते. अदानी समूहाने स्वतःला तिरंग्यात लपेटून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण या देशातला कोणताही उद्योगपती म्हणजे भारत नाही. अदानी म्हणजे मोदी किंवा शहा, असेच फार तर म्हणता येईल. अदानी यांची संपत्ती गेल्या आठ वर्षांत अनेक पटींनी वाढली. ते श्रीमंत झाले, पण देशातील जनता गरीब आणि बेरोजगारच राहिली. त्यामुळे अदानी म्हणजे भारत हे सूत्र बरोबर नाही व असे बोलणे हा मोदींबरोबर भारतमातेचाही अपमान ठरतो.

गांधींचा हल्ला
अदानी यांची श्रीमंती बनावट आहे यावर सगळय़ात पहिला हल्ला राहुल गांधी यांनी केला. ‘दो बेचते है और दो खरीदते है!’ असे श्री. गांधी वारंवार म्हणाले. देशातील बँका, वित्तीय संस्था या एक-दोन उद्योगपतींच्या गुलाम बनल्या. सरकारी संपत्ती भाजपच्या मर्जीतील उद्योगपतींना कवडीमोल भावात विकण्यात आली. हा देश जणू अदानी, अंबानी यांच्याच मालकीचा झाला व लोकशाही उरलीच नाही. देशात सर्वत्र अदानी यांच्या मालकीचे बोर्ड दिसू लागले. हे लोकांना आवडते काय? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. लोकशाहीचे, सार्वजनिक मालमत्तेचे हे अधःपतन आपण उघडय़ा डोळय़ांनी पाहत राहिलो.

श्री. अदानी, अंबानी यांची संपत्ती वाढणे हा अपराध नाही; पण देशाच्या मालमत्ता फुकटात त्यांच्या खिशात टाकणे हा राष्ट्रद्रोह आहे. ते गेल्या सात वर्षांत झाले. अदानी हे भाजप राजवटीचे सगळय़ात मोठे लाभार्थी ठरले! अदानी यांच्याबाबतीत जे घडले ते काँग्रेस राजवटीत घडले असते तर भाजपची भूमिका काय असती? अदानी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे अर्थपुरवठादार आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करतो. त्यांचे राजकारण व्यापार व पैशावर टिकून आहे. इतर कोणत्याही पक्षाकडे राजकारणासाठी व निवडणूक लढवण्यासाठी पैसे मिळू नयेत यासाठी विरोधकांना पैसे देणारे उद्योगपती, बिल्डर्स, व्यापारी यांच्यावर तपास यंत्रणांचा हल्ला करून विरोधकांची आर्थिक रसद तोडण्याचे काम भाजपने सातत्याने केले. राजकारणात पैसे फक्त आपल्याकडेच असावेत व त्यातला मोठा वाटा फक्त अदानींकडे असावा, हेच त्यांचे धोरण होते. अदानी म्हणजे ‘रिझर्व्ह बँक ऑफ बीजेपी’ होती. त्या भाजपच्या रिझर्व्ह बँकेवरच सगळय़ात मोठा हल्ला झाला. यामागे देशातील उद्योगपती नाहीत. जगातील प्रमुख शक्तींनी भाजपच्या रिझर्व्ह बँकेवर हल्ला करून एकप्रकारे नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

अदानी प्रकरण वाटते तितके सहज नाही. ते फक्त कॉर्पोरेट युद्ध नाही.
भारतीय जनता पक्ष, त्यांचे आर्थिक व्यवहार, लोकशाहीचा गळा घोटून पैशाच्या ताकदीवर सत्ता टिकवण्याच्या प्रवृत्तीवर झालेला हा हल्ला आहे.
भविष्यात असे आणखी हल्ले होतील. त्याचे परिणाम 2024 ला दिसतील. भारतमातेच्या उदरात काय दडले आहे, याची ही एक झलक आहे!
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]