रोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले? ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण!

8238

rokhthokमहाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने दिवसाढवळय़ा शपथ घेतली. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही व पवारांचे राजकारण संपले, अशी बालिश विधाने श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. ती त्यांच्यावरच उलटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पवारांनी त्यांच्या मनात होते ते करून दाखवले. ही चांगल्याची सुरुवात आहे.

हाराष्ट्र दिल्लीच्या झुंडशाहीपुढे झुकला नाही. महाराष्ट्राचे पाणीच वेगळे आहे. हे गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून दिवसाढवळ्या शपथ घेतली. लाखो जनसागरास साक्ष ठेवून घेतलेली ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल. ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल. शरद पवार यांचे ‘पर्व’ संपले आहे,’ अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले. ‘मी पुन्हा येईन’ असे ते सांगत होते; पण पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली व फक्त 80 तासांचे त्यांचे सरकार भारतीय जनता पक्षाला घेऊन बुडाले. दिल्लीच्या भरवशावर व फाजील आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले. पडद्यामागे अनेक घडमोडी घडल्या. ‘सिंहासन’ चित्रपटातील नवी पटकथा जणू महाराष्ट्रात लिहिली गेली. सत्तेचे राजकारण व खुर्चीचा खेळ महाराष्ट्राने पाहिला, तो रोमांचक होता.

पवारांची दंतकथा
महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाटय़मय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी आणि बेचव आहे व शरद पवार यांनी मनात आणले तर कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी एका दंतकथेचा कायमचा नायनाट झाला. शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता तरी कायमचा पडदा पडावा. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. राज्यात सत्तांतर झाले यावर आजही विश्वास ठेवायला लोकं तयार नाहीत. त्याहीपेक्षा मोदी-शहा यांचे बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आला हे महत्त्वाचे.

राज्य कसे आले?
भारतीय जनता पक्षाचे राज्य महाराष्ट्रात कसे आले नाही? यापेक्षा तीन पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा आला ते समजून घेतले पाहिजे. 24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या काळात एक 80 तासांचे सरकार आले व गेले. त्या औटघटकेच्या सरकारचे पुसटसे स्मरणही कुणाला नाही. या सर्व खेळात राजभवनाची भूमिका ‘खलनायकी’ ठरली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी व्यक्तिशः चांगले ओळखतो. ते एक सज्जन गृहस्थ आहेत. राजभवनात जाऊन त्यांना भेटलो. श्री. कोश्यारी यांनी तेव्हा स्पष्ट सांगितले, ‘‘मी घटनेला बांधील आहे. घटनेची चौकट मोडून मी काही करणार नाही. राजभवनातून बदनाम होऊन मी जाणार नाही,’’ असे सांगणाऱ्या राज्यपालांनी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना घाईघाईत शपथ दिली व अजित पवार यांनी दिलेल्या आमदारांच्या सह्या मान्य करून त्यांनी पुढचे सर्व प्रकरण घडवले. त्यात राजभवनापेक्षा ‘वरचा आदेश’ महत्त्वाचा ठरला. गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप झाला हे मान्य करावे लागेल. श्री. अजित पवार यांचे राजकारण अवसानघातकी व धोक्याचे असे ज्यांना वाटते त्यांनी एक समजून घेतले पाहिजे अजित पवार फडणवीसांना जाऊन मिळाले म्हणून तीन पक्षांची आघाडी अधिक घट्ट झाली. अजित पवारांमुळे फडणवीसांचे फोडाफोडीचे भ्रष्ट राजकारण लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरले. एक दबाव आमदारांवर निर्माण झाला व सर्वच आमदार शेवटी शरद पवारांकडे परतले व शेवटी एकाकी राहिलेल्या अजित पवारांनाही मागे फिरावे लागले. सिंहासनाचा खेळ महाराष्ट्रात एक महिना चालला. या काळात अनेकांचे मुखवटे गळून पडले, तर अनेकांचे वेगळे रंग दिसले. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. ते आता विरोधी पक्षात बसले, पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद द्यायला तयार झाले नाहीत.

सोनिया व पवार
शरद पवार व काँग्रेस एकत्र होतेच, त्यात शिवसेनाही सामील झाली. शरद पवार यांनी पुढाकार घेतला नसता तर महाराष्ट्रात आजचे परिवर्तन झाले नसते. अशा प्रकारचे एखादे सरकार निर्माण होऊ शकते यावर सुरुवातीला शरद पवारही विश्वास ठेवायला तयार नव्हते. शरद पवार प्रथम सोनिया गांधी यांना भेटले तेव्हा सोनिया गांधी यांनीही हा प्रस्ताव मान्य केला नाही. शिवसेनेबरोबर कसे जायचे? हा त्यांचा पहिला प्रश्न व अल्पसंख्याक तसेच हिंदी भाषिक पट्टय़ात काय प्रतिक्रिया होईल? ही शंका त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांनी सोनियांना सांगितले, बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधी यांचे संबंध सलोख्याचे होते. आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी या राष्ट्रपतीपदाच्या ‘काँग्रेजी’ उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून आपण स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. मुंबईतला हिंदी भाषिक शिवसेनेला मतदान करतो म्हणून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येत राहिली अशी माहिती श्री. पवार यांनी सोनियांना दिली. काँग्रेस पक्ष आजही ‘राज्यकर्त्या’ वतनदारांच्या भूमिकेत आहे. ‘राष्ट्रीय’ राजकारणावर काय परिणाम होईल? या चिंतेत काँग्रेसने एक महिना घालवला, पण महाराष्ट्रासारखे राज्य भाजपच्या हाती राहू नये यावर शेवटी पक्षातच एकमत झाले व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. या सर्व घडामोडींवर ‘शरद पवार’ नक्की काय करणार, यावर शंका घेणारे जसे काँग्रेसचे मोजके लोक होते तसे शिवसेनेचेही होते. शरद पवारांच्या कार्यपद्धती तसेच वैचारिक भूमिकेविषयी शून्य माहिती असणाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत पवारांविषयी अनेकदा अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. अजित पवार एके सकाळी राजभवनात फडणवीसांबरोबर शपथ घेताना पाहिले तेव्हा शिवसेना व काँग्रेसला दगा देण्याचे हे पवारांचे कारस्थान आधीच ठरले होते असा जाहीर डंका पिटणारे आता शरद पवारांच्या पायास हात लावताना दिसतात तेव्हा गंमत वाटते. शरद पवार यांनी फसवाफसवीचे राजकारण केले असे ज्यांना वाटते त्यांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो, पवारांचे असे कोणते राजकारण तुम्ही पाहिले? ते समोर आणा. पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग केला. वसंतदादांचे सरकार गडगडले ती महाराष्ट्राची गरज होती. काँगेसचे नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत वसंतदादांचा रोज अपमान करीत होते. हे चित्र पवारांना तेव्हा आवडले नाही व पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग केला. त्यास टेकू लावण्याचे काम तेव्हा ‘संघ’ परिवाराने केले. हे आजचे संघवादी विसरले.

अजित पवारांचे राजकारण
महाराष्ट्राचे सरकार पाच वर्षे टिकेल असे भाकीत आता खुद्द अजित पवार यांनीच केले आहे. तरीही अजित पवार असे का वागले? अशी शंका आहेच. शरद पवार यांच्या मेहनतीने आणि करिश्म्याने निवडून आलेले आमदार अजित पवार फोडतात हे धक्कादायक होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवार यांचा एकखांबी तंबू आहे. जिल्हा स्तरावरचे मोठे नेते त्या पक्षात आहेत. संघटन चांगले आहे व अजित पवारांची छाप या सगळ्यांवर आहे. ‘‘आमच्यासाठी अजित पवार हेच शरद पवार आहेत. शरद पवारांपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही,’’ असे काही आमदार म्हणाले. एका व्यक्तीच्या करिश्म्यावर उभ्या राहिलेल्या संघटनेत हे घडते व कुटुंब पक्ष चालवतात तेव्हा कुटुंबकलहात राजकारणाची ठिणगी पडते. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे दूर गेले. पवारांपासून अजित पवार दूर गेले. बाळासाहेबांपासून राज ठाकरे लांब गेले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे कंगोरे समजून घेतले पाहिजेत, पण पवार व ठाकरे यांच्या पुतण्यांचे राजकारण फार वेगाने पुढे गेले. अजित पवार यांनाही शेवटी माघार घ्यावी लागली; कारण शरद पवार या सह्याद्रीची सावली सोडून नवे काही घडवता येणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही शरद पवार यांचेच नाणे वाजते. देशाच्या राजकारणातही ते वाजले. शरद पवार यांनी काय केले? असा प्रश्न अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन विचारला. पवारांचे ‘पर्व’ संपले, असे सांगणाऱ्या फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ दिले नाही, हे काय कमी झाले?

उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात जे घडले तेच देशाला मान्य आहे.
हे सरकार पाच वर्षे टिको! ते टिकेल. नक्की टिकेल.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या