रोखठोक – नेपाळी रामाची सीता कोण?

6279

rokhthokखरी अयोध्या नेपाळमध्ये आहे, हिंदुस्थानातील अयोध्या खोटी, असा दावा नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी केला. हा दावा विनोदी आहे. नेपाळचे पंतप्रधान हे सरळसरळ चीनचे हस्तक आहेत. चीन नेपाळच्या माध्यमातून हिंदुस्थानात धार्मिक अस्वस्थता पसरवीत आहे. राम जन्मला कोठे, हा वाद नेपाळ निर्माण करतोय. रामाची सीता कोण, असे विचारण्याचाच हा प्रकार!

राम जन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयाने मिटवला. पण राम व त्याच्या जन्मभूमीचा वाद परक्या भूमीवरून उफाळून येईल असे कधीच वाटले नव्हते, मात्र नेपाळच्या भूमीवरील एका मूर्ख राजकारण्यामुळे अयोध्येचा वाद निर्माण झाला.

नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा हे काही दखलपात्र राजकारणी नाहीत. पण त्यांच्या हिंदुस्थानविरोधी वक्तव्यांमुळे ते नेपाळ आणि हिंदुस्थानात चर्चेत आले. आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘हिंदुस्थानात जी अयोध्यानगरी आहे ती नकली आहे. खरी अयोध्या नेपाळात आहे व राम हा नेपाळी आहे.’ ओली यांचे विधान फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण देशाची संस्कृती व श्रद्धा हिंदुत्वाशी निगडित आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी रामासंदर्भात असे वक्तव्य करावे याचे आश्चर्य वाटते. ओली हे हिंदू असले तरी चीनचे हस्तक आहेत. चीनची ‘रखेल’ असल्याप्रमाणेच ओली यांचे वर्तन आहे. ओली यांनीच नेपाळच्या पंतप्रधानपदी राहावे यासाठी चीन नेपाळमध्ये राजकारणी व खासदारांना प्रचंड पैसा देत आहे. खुद्द ओली यांच्या परदेशी बँक खात्यात चीनकडून 45 कोटी रुपये जमा झाल्याचे पुरावे समोर आले. अशा ओलींनी हिंदुस्थानविरोधात भूमिका घेणे स्वाभाविक पण आज त्यांनी श्रीराम हे ‘नेपाळी’ असा शोध लावून धमाल उडवली.

नकली म्हणजे काय?

ओली म्हणतात, हिंदुस्थानची अयोध्या नकली. म्हणजे काय? हिंदुस्थानातील अयोध्येच्या राजकुमाराला आम्ही सीता दिली नाही तर नेपाळमधील अयोध्येच्या राजकुमाराला दिली. बीजरंगपासून काही अंतरावर अयोध्या नावाचं गाव आहे. तीच खरी अयोध्या. हिंदुस्थानात बनवलेली अयोध्या नकली आहे, असे ओली म्हणतात. ओली यांनी जे पुराणाचे उत्खनन केले ते पाहिले तर आमच्या अयोध्येचा लढा संपवून आता नेपाळमधील अयोध्येकडे कूच करावे, असे गमतीने म्हणावे लागेल. नेपाळमधील ‘अयोध्या’ हे एक साधे गाव आहे. पण जे उत्तर प्रदेशातील अयोध्येत जाऊन आले त्यांना अयोध्या हे गाव नसून प्रभुरामाचे राज्यच होते हे पटेल. राम जन्मभूमीचा मोठा लढा तेथे झाला हे ठीक, पण दशरथ महल, हनुमान गढी, कौशल्या महल, सीता की रसोईपासून रामायणातील सर्व खुणा तेथे आज आहेत. श्री. ओली यांचा दावा असा की, हिंदुस्थानची अयोध्या खरी मानली तर तिथून राजकुमार श्रीराम लग्नासाठी जनकपूरला कसे येऊ शकतात? ओली यांनी रामायण वाचले पाहिजे. रामाने अयोध्येतून दक्षिणेतील दंडकारण्य, रामटेक (विदर्भ), नाशिकच्या पंचवटीत, रामेश्वरम् आणि रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेपर्यंत धडक मारली. तर त्यांच्यासाठी नेपाळातील जनकपूरला पोहोचणे असे काय कठीण होते? तेव्हा नेपाळच्या म्हणजे मिथिलांचल राज्याच्या सीमा बिहारपर्यंत पोहोचल्या होत्या व बिहारात जो सीतामढी नावाचा भाग आहे तेथेच भूमिकन्या सीता प्रकट झाली.

असे झाले स्वयंवर

सीता ही जनकराजाची कन्या. सीता लग्नाच्या वयाची झाली तेव्हा जनकराजा तिच्यासाठी वरसंशोधन करायला लागला. पण मनासारखा वर मिळाला नाही तेव्हा त्याने सीतेचे स्वयंवर जाहीर केले. जो कोणी मंडपातले वजनदार शिवधनुष्य उचलील, वाकवील व धनुष्याला बाण लावील त्याला सीता वरमाला घालेल. या स्वयंवरात लंकेचा राजा रावण आला व शिवधनुष्याला बाण लावताना उताणा पडला. रामाने स्वयंवराचा पण जिंकला. या लग्नासाठी अध्योध्येतून दशरथ राजा व परिवार नेपाळला पोहोचले. राम-सीता यांचा विवाहसोहळा सुरू होता तेव्हा वशिष्ठांनी सीतेची लहान बहीण उर्मिला पाहिली व लक्ष्मणाचा तिच्याशी विवाह लावला. नंतर जनकाचा भाऊ कुशध्वज याची कन्या मांडवी हिचा विवाह भरताशी आणि दुसरी कन्या श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्नशी लावून दिला. अशाप्रकारे एकाच मांडवात चार विवाह झाले. ही चारही जोडपी नंतर खऱया अयोध्येत पोहोचली. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. सीतेची पाऊले अयोध्येतील अनेक वास्तूंत उमटली. त्या श्रद्धा येथे आजही कायम आहेत. नेपाळमधून सीता अयोध्येत आली व ज्या महालात वरात उतरली तो सीता महल आजही अयोध्येत आहे. चीनचे हस्तक असलेले ओली या श्रद्धेच्या खुणा कशा पुसणार?

वाल्मीकी आश्रम

रामायण वाल्मीकीने लिहिले. राम हा आजही ईश्वरी अंश मानला जातो. पण जगभरात आज 300 हून जास्त रामायण ग्रंथ लिहिले व प्रत्येक ग्रंथात वेगवेगळ्या कथा व मान्यता आहेत. वेद रामायण आणि पुराणात अयोध्येचा स्पष्ट संदर्भ आहे. त्यानुसार जेथे शरयू आहे तेथेच अयोध्या आहे. संपूर्ण

भू-मंडलावर राजे असायचे आणि सर्वांचे चक्रवती सम्राट हिंदुस्थानच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येचे महाराज असायचे, असे रामदास ट्रस्टचे प्रमुख रामदास महाराज यांनी सांगितले. हे ओली यांना माहीत नसावे. अयोध्या नावाचे एक गाव नेपाळात आहे हे खरे, पण श्रीराम दोन नाहीत. ते एकच. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीजरंगजवळ ठोरी नावाचे गाव आहे. तेथे एक वाल्मीकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तिथलेच असे ओली म्हणतात. ते खरे मानले तर नेपाळ म्हणजे मिथिला राज्य पूर्वी हिंदुस्थानचाच एक भाग होता. बिहारपर्यंत हे राज्य होते. वाल्मीकीनगर ठिकाण आता बिहारच्या पश्चिमेला चंपारण जिल्हय़ात आहे. त्याचा काही भाग नेपाळशी जोडला आहे. नेपाळ व हिंदुस्थानचे भौगोलिक, धार्मिक व सांस्कृतिक नाते आहे व ते अतूट आहे. चीनलाही तोडता येणार नाही. अयोध्येतील राम जन्मभूमी लढ्यात हिंदुस्थानातील अनेक गुरखा व नेपाळी बांधवही सहभागी झाले होते व अयोध्या पंचक्रोशीतले अनेक साधूमहंत हे नेपाळशी संबंधित आहेत.

तोफेच्या तोंडी

राम व राममंदिर हा हिंदुस्थानसाठी भावनेचा तितकाच श्रद्धेचा विषय आहे. एखादा भावनात्मक विषय राजकारणासाठी घेतला जातो तेव्हा त्याच्या प्रचारात अतिशयोक्ती कशी जास्त शिरते, याचा राम जन्मभूमी हा विषय म्हणजे उत्तम नमुना आहे. आधी अयोध्येत राम जन्मलाच नाही असा दावा झाला व आता जेथे राम जन्मला ती ही अयोध्याच नाही, असे सांगितले गेले. या दोन्हीमागे पाकिस्तान व चीनसारखी राष्ट्रे आहेत. राम अयोध्येत जन्मला ही श्रद्धा खरी आहे. त्याचे पुरावे कोणी मागू नयेत. गेल्या दोनशे वर्षांतील मान्यवर ठरलेल्या व्यक्तीचे जन्म कुठे झाले हे सांगता येत नाहीत तेथे रामाचा जन्म येथेच झाला व ते गाव नेपाळमध्येच आहे असा दावा एका राष्ट्राचे पंतप्रधान कसा करू शकतात? 1528 मध्ये बाबराचा एक सेनापती मीरबांकी याने दशरथ महाल व अयोध्येतील मंदिरे तोफा लावून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही तोफांना वात लावून चीनचे एजंट ओली यांना धक्का द्यावा लागेल.

सीतामाईचे माहेर नेपाळात आहे. रामाची पाऊले त्या भूमीवर उमटली म्हणून ते पहिले हिंदुराष्ट्र ठरले. पण जेथे राम जन्मला ती अयोध्या व हिंदुस्थान मात्र धर्मनिरपेक्ष बनले. आज नेपाळवरही चीनच्या लालभाईने झडप मारली व ते हिंदुराष्ट्र संपवले. ओलीसारखे लोक तेथे असल्यावर दुसरे काय व्हायचे!

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या