चला, राजकारणात ऋषी शोधूया!

373

rokh-thok

<< संजय राऊत  >>

राजकारणात गुंड आधीपासूनच होते. आता गुंडांचा स्वीकार अधिक पारदर्शकतेने होत आहे. गांधीजी चरख्यावरून गेले. नोटेवरून हटवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राजकारणात पूर्वी सल्लामसलतीसाठी ज्येष्ठ लोक होते. आज असे लोकही उरले नाहीत. ऋषीतुल्य कोण? हा प्रश्नच आहे.

राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा आहे, असे सिद्ध करण्याची चढाओढ सध्या आपल्या देशात सुरू आहे.  महात्मा गांधींची उरलीसुरली वस्त्र् (पंचा) उतरवायचा कार्यक्रम काही मंडळींनी हाती घेतला आहे. गांधींना आधी त्यांच्या चरख्यावरून हटवले. आता नोटेवरून हटविण्याचा प्रयत्न करून पाहिला. तो अंगलट आला. नोटेवर फक्त गांधीच का? इतर राष्ट्रीय पुरुष का नाहीत? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ांत नेताजी सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यांचेच योगदान आहे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको? अशा मागण्या झाल्याच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मुद्रे’ने नोटा छापल्या जाव्यात ही मागणी चुकीची नव्हती. महाराष्ट्रात सध्या ‘मराठा क्रांती मोर्चे’ निघत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे ‘नोटां’वर शिवाजी महाराजांचे चित्र हवेच अशी मागणी करायला हवी. छत्रपतींनी स्वतःचे स्वतंत्र चलन ‘होन’ निर्माण केले. स्वतःचे राज्य, स्वतःची राजमुद्रा, स्वतःचे चलन निर्माण करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको? गांधींपेक्षा मोदी हा ब्रँड मोठा असल्याचे वक्तव्य हरयाणातील भाजप मंत्र्याने केले. पण शिवाजी महाराज हा सगळ्यात मोठा ब्रँड होता. मोदी शिवाजीराजांपेक्षा मोठे होते काय? हे आता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी सांगायचे आहे!

नोटांवर फोटो

मोदी यांच्या छायाचित्रांच्या नोटा छापाव्यात असे भाजपच्या मंडळींना वाटते व त्यांनी तसे बोलून दाखवले. मोदी हे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचे चित्र छापावे. असे चित्र इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचेही छापले नव्हते. इंदिरा गांधी यांनी तर १९७१ च्या युद्धात पाकिस्तानची फाळणीच केली. मोदी यांचे चित्र आज छापले. पण उद्या दिल्लीत दुसऱया कुणाचे राज्य आले तर नवे राज्यकर्ते या मोदीछाप नोटा पुन्हा रद्द करतील व जनतेला पुढील सहा महिने रांगेत उभे करतील आणि नोटाबंदीचा निर्णय कसा चुकीचा, जनतेला छळणारा आहे, असे सांगत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तेव्हा हे असले प्रकार आता थांबायला हवेत. गांधीजी नोटांवर विसावले आहेत त्यांना तेथेच राहू द्या. श्री. मोदी यांनी खादी वस्त्र परिधान केल्यापासून खादीची विक्री वाढली आहे, हे चांगलेच झाले. पण आज देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळली आहे. खादीची विक्री वाढली असली तरी रुपया कोसळून स्मशानात गेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ‘६७’ इतका घसरला. मोदी हे मोठेच ब्रँड आहेत. घसरलेल्या रुपयांची पतही त्यांनी वाढवायला हवी. खादी वाढवा, रुपयाचे मोलही वाढवा.

हे कसले राजकारण?

सध्याचे राजकारण कमालीचे संकुचित, सूडाचे व मतलबाचेच सुरू आहे. राहुल गांधींची यथेच्छ खिल्ली उडवणारे नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. आपण कमालीचे राजकारणग्रस्त झालो आहोत याचाच हा पुरावा. गांधीजींचे परमशिष्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे, ‘राजनीती राक्षससम शास्त्र!’ म्हणजे राजनीती हे तर राक्षसांचे शास्त्र आहे. हे असले राजकारण संपल्याशिवाय दुनिया आणि देश वाचणार नाही. टॉलस्टॉयने शंभरेक वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले. त्यात म्हटले होते की, जमिनीची मालकी संपली पाहिजे. आज जमिनीची व पैशाची मालकी असलेले लोकच राजकारण करतात व या राजकारणाविरुद्ध बोलणारे देशद्रोही किंवा गुन्हेगार ठरवले जातात. जहाजातून प्रवास चालला असता किनाऱयावर असलेले प्रकाशगृह तुम्हाला मार्गदर्शन करते. जगात व समाजात असे काही मुक्त पुरुषही असले पाहिजेत, जे लोकांना चिरकालीन मूल्यांचे दर्शन घडवतील.

मनूचे राज्य!

रिझर्व्ह बँकेसारख्या स्वतंत्र संस्थांचे अस्तित्व नामशेष झाले आहे व राज्यकर्त्यांच्या आदेशाने जुन्या नोटा स्वीकारणारे ते एक गोदाम बनले आहे. बहुमतवाल्यांचे सरकार बनते, पण मंत्रिमंडळाच्या सामुदायिक निर्णयाची परंपरा संपली आहे. लोकशाहीचे राज्य म्हणजे नेमके काय? हा संभ्रम बनला आहे. जुन्या जमान्यातील गोष्ट आहे. तेव्हाही तशी लोकशाहीच होती. प्रजा राज्यकारभार चालवीत होती. परंतु चांगले राज्य चालत नव्हते. म्हणून लोक मनूकडे गेले आणि त्यांनी मनूला विनंती केली की, आपण राजा व्हावे. मनू म्हणाला, मी तर तपस्या करीत आहे. हे सोडून राजाचे काम करीन तर आपल्याला माझे सर्व म्हणणे ऐकावे लागेल. अमुक गोष्ट आम्ही ऐकणार नाही असे कधी म्हणता कामा नये. प्रजेने हे कबूल केले तेव्हा मनू राजा झाला. अशी कहाणी आहे. मनूने उद्योगपतींचा व सावकारांचा वापर केला नाही व पैशांचा वापर करून सत्ता मिळवली नाही. मनूला राजकीय खरेदी-विक्रीचा मामला मंजूर नव्हता. सर्व लोकांची इच्छा असेल तर मी सत्तेवर बसेन, नाहीतर आपली तपस्या व चिंतन करीत बसेन. म्हणजे मला शंभर टक्के मते मिळाली पाहिजेत. केवळ बहुमताने मी राजा होऊ इच्छित नाही. आज असा विचार कोण करणार?

कुठे गेले ऋषी?

गोपाल कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे गुरू. बॅ. मोहम्मद अली जीनाही गोखले यांना मानीत. गांधी हे गोखले यांचा सल्ला घेत व पुढचे धोरण ठरवीत. नेहरू व सरदार पटेल हेसुद्धा गांधींना गुरुतुल्य मानीत. छत्रपती शिवाजी महाराजही रामदास स्वामींना मानतच होते. कधीकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांना ऋषीचा मान होता. आज आडवाणींची स्थिती शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखी झाली आहे. जयप्रकाश नारायण यांना एकेकाळी ऋषीचे स्थान मिळाले, पण सत्तेवर आलेल्यांनी त्यांनाही फेकले. आजचे ‘राजे’ कुणाचे ऐकतील याची खात्री नाही. फार प्राचीन काळी असे होते की तेव्हा राजे होते, पण त्यांना लोक निवडीत असत. ते ऋषींचा सल्ला घेत. कोणतीही मोठी गोष्ट असली, प्रश्न उपस्थित झाला की ते ऋषींजवळ जात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार राज्य चालवीत. त्यावेळी ऋषींचे राज्य होते. परंतु ऋषी गादीवर बसत नव्हता. तो आपल्या आश्रमातच राहात असे. राजा वेळोवेळी आश्रमात त्यांच्याकडे जाई. ऋषी ध्यान-चिंतन करून राजाच्या प्रश्नांचे उत्तर देई आणि राजा ते मान्य करी. राजा दशरथ वसिष्ठ ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे वागत असे. जेव्हा विश्वामित्राने दशरथाजवळ राम-लक्ष्मणाची मागणी केली तेव्हा मुले देण्याचा राजाचा धीर होईना. कारण त्यावेळी मुले लहान होती. त्याने नकार दिला. परंतु वसिष्ठ म्हणाले, “राजा, तू कसा अविचारी आहेस! विश्वामित्र तुझ्याकडे मुलांची मागणी करीत आहेत. ती मान्य करण्यातच मुलांचे व राज्याचे कल्याण आहे.’’ ऋषींची आज्ञा झाल्याबरोबर राजाने ते मान्य केले आणि मुले सोपवून दिली. ते ऋषी राष्ट्रपतींप्रमाणे निवडले जात नव्हते. ते आश्रमात बसूनच ध्यान-चिंतनाद्वारे जगाचे कल्याण करीत.

आज हे चित्र उरले नाही. अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंग यांनाच लोळवले व कायमचे राजकीय वनवासात पाठवले. भारतीय जनता पक्षातील ऋषिमुनींना कुणी विचारत नाही व काँग्रेस पक्षात असे कुणी ऋषी वगैरे उरले नाहीत. जे आहेत ते भिंतीवरील तसबिरीत लटकले आहेत. नारायणदत्त तिवारी (वय ९२) हेसुद्धा त्यांच्या पुत्रासह भाजपात दाखल झाले. राजकारणातील सर्वच प्रवाह गढूळ झाले. गुंडांचे अड्डे तेथे होतेच. पण गुंडांचा स्वीकारही अधिक पारदर्शकतेत होत आहे. उद्या याच गुंडांना राजकारणातील ऋषींचा दर्जा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या