रोखठोक – ताश्कंद : 11 जानेवारी 1966, शास्त्रीजी झोपले; सकाळी उठलेच नाहीत!

6798
ताश्कंद कराराच्या वेळी लालबहादूर शास्त्रींजींसोबत पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष प्रे. अयुब खान आणि रशियाचे अध्यक्ष ऍलेक्सी कोसिजिन.

rokhthok
चौपन्न वर्षांनंतरही आपण लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य शोधत आहोत. यात राजकारण जास्त आहे. शास्त्रींची वामनमूर्ती ताश्कंदला पाकिस्तानचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष प्रे. अयुब यांना भारी पडली. ताश्कंद करारातील काही कलमांमुळे शास्त्री अस्वस्थ होते. त्याच तणावाखाली ते झोपायला गेले. 11 जानेवारी 1966 च्या सकाळी ते उठलेच नाहीत.

ताश्कंदच्या कडाक्याच्या थंडीत तेथील लोक रशियाप्रमाणे ‘व्होडका’ पीत नाहीत, तर कडक कॉफीचे घोट रिचवतात. रशियाच्या या ‘व्होडका’ संस्कृतीतून उझबेक बाहेर पडला आहे, पण उझबेकची नवी पिढी ‘ताश्कंद’मधील मूर्तिरूपाने उभ्या असलेल्या लाल बहादूर शास्त्रींनाही विसरली आहे काय, असा प्रश्न पडतो. ताश्कंद भेटीत मी शास्त्रींच्या स्मृतिस्थळावर गेलो. स्मृतिस्थळाची निगा उत्तम राखली आहे, पण पाकिस्तानला टक्कर देणारे वामनमूर्ती शास्त्रीजी नक्की कोण याबाबत तेथील नव्या पिढीस काहीही माहिती नाही. 54 वर्षांपूर्वी पाकिस्तानबरोबर ‘ताश्कंद करार’ झाला व त्याच रात्री शास्त्रीजींचा ताश्कंदमध्ये मृत्यू झाला. शास्त्रींच्या मृत्युमध्ये रहस्य असल्याचे बोलले गेले व आजही यावर शंका घेतल्या जातात, पण शास्त्रींचा मृत्यू नैसर्गिक होता. ‘ताश्कंद’ तेव्हाच्या रशियन महासत्तेचा भाग होता. 1965 च्या युद्धात रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष ऍलेक्सी कोसिजिन यांनी मध्यस्थी केली. पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब व हिंदुस्थानचे पंतप्रधान शास्त्री यांना ताश्कंदला बोलावले. तेथे शांती चर्चा झाल्या, पण त्यानंतर शास्त्रींचा तिरंग्यात लपटलेला मृतदेहच हिंदुस्थानात आला.

वामनमूर्तीचा विजय
1965 चे युद्ध पाकिस्तानने हिंदुस्थानवर लादले, पण ते ‘वामनमूर्ती’ लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने जिंकले. 26 सप्टेंबर 1965 रोजी रामलीला मैदानावर विजयसभा झाली. त्यात शास्त्री आत्मविश्वासाने बोलले, ‘पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब म्हणाले होते की, ते दिल्लीत सहज चालत पोहोचतील. ते इतके मोठे नेते आहेत, ताकदवान आहेत. मी विचार केला, इतक्या मोठ्या माणसाला दिल्लीत पायी चालत येण्याचा त्रास का द्यावा? आम्हीच लाहोरकडे कूच करून त्यांना सलामी द्यावी!’ शास्त्रींचा हा आत्मविश्वास म्हणजे हिंदुस्थानी नेतृत्वाचा आत्मविश्वास होता. शास्त्रींची वामनमूर्ती, त्यांच्या आवाजाची अयुब जाहीरपणे खिल्ली उडवत. अयुब लोकांची पारख त्यांच्या बाह्य स्वरूपावरून करीत असत, पण कमी उंचीच्या कृश व्यक्तीचे हृदय मात्र पोलादी असते हे त्यांना माहीत नव्हते. शास्त्रींनी त्यांना ते दाखवून दिले.

अयुब यांचे अंदाज चुकले
प्रे. अयुब हे पाकचे अध्यक्ष व लष्करप्रमुखही होते. त्यांचे डोके लष्करशहाचे होते. चीनने हिंदुस्थानचा पराभव केला होता. त्या धक्क्याने खचलेल्या पंडित नेहरूंचे निधन झाले होते. हिंदुस्थानी सैन्याचे मनोधैर्य कमकुवत झाले होते. लढण्याची उमेद संपली होती. दिल्लीतील राजकीय नेतृत्व कमजोर झाले होते. प्रे. अयुब यांची दिल्लीभेट ठरली होती, पण नेहरूंच्या निधनानंतर त्यांनी भेट रद्द केली. आता दिल्लीत जाऊन काय फायदा? चर्चा तरी कोणाशी करायची, असे अयुबना वाटत होते. त्यात शास्त्रींनी त्यांना निरोप दिला, ‘तुम्ही कशाला येता? आम्हीच येऊ तिकडे.’ शास्त्री कैरो येथे गेले होते. येताना एक दिवसासाठी ते कराचीला थांबले. शास्त्रींना विमानतळावर सोडण्यासाठी प्रे. अयुब आले होते. तेव्हा आपल्या सहकाऱ्यांकडे इशारा करीत अयुब पुटपुटले, यांच्याबरोबर चर्चा करून काहीच फायदा नाही. हे खूपच कमजोर नेते आहेत. शास्त्रींच्या हिमतीचा अंदाज लावण्यात प्रे. अयुबनी चूक केली. कश्मीरवरील हल्ल्यानंतर हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय सीमा पार करणार नाही हा अयुब यांचा अंदाजही चुकला. ही त्यांची दुसरी चूक ठरली. शास्त्रींनी हे युद्ध प्रे. अयुबवरच उलटवले. कमजोर शास्त्रींना आपण मागे रेटून नेऊ हा अयुब यांचा अंदाज साफ चुकला. हिंदुस्थानी फौजा लाहोरपर्यंत कधी पोहोचल्या हे प्रे. अयुबना समजलेच नाही व ते महाशय हात चोळत बसले.

ताश्कंद भेट
उझबेकिस्तानशी शास्त्रींचा संबंध पाकिस्तानबरोबरच्या युद्धानंतर आला व तो मृत्युनंतरही टिकला. युद्धानंतरचा धूर कमी करण्यासाठी रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष कोसिजिन यांनी पुढाकार घेतला. दोन देशांत समझोता किंवा शांती करार व्हावा यासाठी पाकिस्तानचे प्रे. अयुब व पंतप्रधान शास्त्री यांना ताश्कंद भेटीचे आमंत्रण दिले. रशिया तेव्हा पूर्णपणे हिंदुस्थानच्या बाजूने होता. दोन देशांतील तणाव निवळावा व तटस्थ जागी चर्चा व्हावी यासाठी रशियाने ‘ताश्कंद’ची निवड केली. ताश्कंदमध्ये तेव्हा एकच मोठे हॉटेल होते ते म्हणजे, ‘‘हॉटेल उझबेकिस्तान’’. तेथेच शास्त्री आणि प्रे. अयुब हे दोन्ही नेते भेटले. आज या हॉटेलची रया साफ गेली आहे व गेल्या पाच वर्षांत ताश्कंदमध्ये 35 नवी हॉटेल्स उभी राहिली. रशियन साम्राज्यातून बाहेर पडल्याचा हा परिणाम. हॉटेल उझबेकिस्तानमध्ये ज्या दालनात प्रे. अयुब व पंतप्रधान शास्त्री भेटले त्या दालनात मी जाऊन आलो. शास्त्रीजी ज्या ‘सूट’मध्ये थांबले तेथेही गेलो. दोन नेत्यांतील शांती करारात जे ठरले त्याला रशियाचे अध्यक्ष कोसिजिन साक्षीदार होते.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान एक दुसऱ्याच्या विरोधात शक्तीचा वापर करणार नाहीत. आपसातील वाद चर्चेतून सोडवतील.
दोन्ही देश 25 जानेवारी 1966 पर्यंत आपापल्या फौजा सीमेवरून माघारी बोलावतील.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान एक दुसऱ्यांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणार नाहीत.
दोन्ही देश आपापल्या देशातून आलेल्या शरणार्थींबाबत विचार करतील व निर्णय घेतील. एक दुसऱ्यांची ‘संपत्ती’ परत करण्याबाबत विचार होईल.

साधारण ‘ताश्कंद’ करारात हे मुद्दे होते. शास्त्रींना अस्वस्थ वाटत होते ते दोन मुद्द्यांमुळे. त्यापैकी एक होती संपत्ती परत करण्याची अट. ज्यात आपल्या सैन्याने जिंकलेल्या ‘पीर पंजाब’ भागाचाही समावेश होता. शास्त्रींना हे मान्य नव्हते, पण रशियाच्या अध्यक्षांसमोर ते फार वाद करू शकले नाहीत. त्याच तणावात ते शेवटपर्यंत राहिले.

नैसर्गिक मृत्यू
शास्त्रीच्या मृत्यूवर काहीजणांनी रहस्य आणि संशयाचे सावट निर्माण केले. ‘ताश्कंद डायरी’ हा हिंदी चित्रपट मध्यंतरी त्यावर येऊन गेला. शास्त्रीच्या मृत्यूला गांधी परिवाराचा अदृश्य हात असल्याचे दाखविण्याचा आटापिटा त्यात होता, पण शास्त्रीचा मृत्यू नैसर्गिक होता. एका तणावातून हृदयविकाराचा झटका आला व त्यात ते जग सोडून गेले. ‘ताश्कंद’ समझोत्यात पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश सोडण्याचा दबाव त्यांच्यावर होता, हे मी वर सांगितलेच आहे. त्याच तणावात त्यांनी ‘शांती’ समझोता करारावर सही केली. त्यानंतर त्याच तणावात ते रात्री झोपायला गेले, पण 11 जानेवारी 1966 रोजी सकाळी झोपेतून उठलेच नाहीत. शास्त्रीजींनी ताश्कंदमध्येच अखेरचा श्वास घेतला. ताश्कंदमध्ये शास्त्रीचे पोस्टमॉर्टम झाले. त्यातही त्यांचा मृत्यू नैसर्गिक व हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले.

दोघांना भारी पडले
शास्त्रींचे निधन होऊन 54 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला. इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांच्या निधनाचे रहस्य शोधत बसलो आहोत. ज्या ताश्कंदमध्ये त्यांचे निधन झाले तिथे तीन पिढ्या बदलल्या. रशियाची राजवट नष्ट झाली, पण उझबेक जनतेने शास्त्रींच्या स्मृती जतन केल्या. उझबेकमध्ये बहुसंख्य मुसलमान, पण पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष प्रे. अयुब यांचे नामोनिशाण ताश्कंदमध्ये कुठेही नाही. ताश्कंद कराराच्या वेळी हजर असलेल्या प्रे. ऍलेक्सी कोसिजिनही तेथे नावाला उरलेले नाहीत. तिथे उभे आहेत फक्त लाल बहादूर शास्त्री. पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश पुन्हा द्यावा लागेल या तणावातून त्यांची प्रकृती झोपेतच बिघडली. एका बाजूला रशियाचे अध्यक्ष प्रे. कोसिजिन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे अध्यक्ष प्रे. अयुब नावाचे लष्करशहा. ताश्कंदमध्ये वामनमूर्ती शास्त्री या दोघांना भारी पडले, तरीही ते अस्वस्थ होते. ताश्कंदच्या चौकातील शास्त्री स्ट्रीटवरील त्यांचा पुतळा मात्र हसरा आहे. ताश्कंदशी सांस्कृतिक नाते जोडा असे ते हसऱ्या चेहऱ्याने हिंदुस्थानवासीयांना सुचवत आहेत.

बर्फात झाकलेले उझबेकिस्तान. ताश्कंद हे त्या बर्फावर उगवलेले मोरपीस पर्यटकांना खुणावत आहे. स्वागताला शास्त्रीजी आहेतच!

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या