भायखळा जेलमध्ये माणुसकीचा मृत्युलेख!

22

rokhthok

मंजुळा शेट्ये या महिला कैद्याची भायखळा तुरुंगात सरळ हत्या झाली. हत्येमागची खरी कारणे चौकशीत बाहेर येतील, पण देशातील तुरुंग म्हणजे नरक व यातनागृह बनले आहेत व तिथे कायद्याचे राज्य नाही हे यानिमित्ताने समोर आले.

भायखळ्याच्या महिला जेलमध्ये मंजुळा शेट्ये हिचा संशयास्पद मृत्यू झाला. मंजुळाची सरळ सरळ हत्या झाली व ही हत्या तुरुंगातील महिला अधिकाऱ्यांनीच केली हे आता उघड झाले. पोलिसांच्या लॉकअपमध्ये व न्यायालयीन कस्टडीत असताना अनेक कैद्यांचे मृत्यू आतापर्यंत झाले आहेत. त्यातील अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. मुंबई पेलिसांनी स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले. यापैकी अनेक चकमकी बनावट होत्या. अनेक गुंडांचा काटा पोलीस लॉकअपमध्ये काढला व त्याबद्दल पोलिसांना गुन्हेगार ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्या. पण चार दिवसांपूर्वी मुंबईच्या भायखळा जेलमध्ये मंजुळा शेटय़ेचे जे प्रकरण घडले ते या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे, धक्कादायक आहे आणि माणुसकीला काळिमा फासणारे आहे. मंजुळा शेट्येस तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी बेदम मारले. तुरुंगातील खाण्या-पिण्यातील भ्रष्टाचारावरून या स्त्रीचा बळी गेला व मंजुळावरील अत्याचाराविरोधात भायखळा तुरुंगातील सर्व महिला कैद्यांनी प्रशासनाविरोधात बंड केले. राज्यात याआधी शेतकरी संपावर गेला व आता महिला कैद्यांचे बंड झाले. हे धक्कादायक आहे.

समजून घ्या
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे ज्यांना वाटते त्यांनी मंजुळा शेट्येचे प्रकरण समजून घेतले तर राज्यातील सर्वच तुरुंगांत कायद्याचे राज्य नाही याबाबत त्यांची खात्री पटेल. बहुसंख्य तुरुंगांत जेल प्रशासनाचे व बड्या गुन्हेगारांचेच राज्य चालते हे आता लपून राहिलेले नाही. तुरुंग हा गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असतो की जास्त बिघडवण्यासाठी, यावर आता मंथन व्हायला हवे. सर्वाधिक गुन्हेगारी कारवाया आता तुरुंगाच्या भिंतीआडून चालतात. अनेक बड्या गुन्हेगारांनी त्यांची साम्राज्ये तुरुंगातच निर्माण केली आहेत. गुन्हेगार आता शिक्षा भोगण्यासाठी जातो व तो मोठा गुन्हेगार बनून बाहेर पडतो. हे आपल्या समाजव्यवस्थेचे व यंत्रणेचे दुर्दैव आहे. आपले देवही तुरुंगात होते. शिवाजी राजांसारखे योद्धे नजरकैदेत होते. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींपासून नेहरूंपर्यंत अनेक योद्धे तुरुंगात होते. त्या कैद्यांपासून देशाने नेहमीच प्रेरणा घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकमान्य टिळकांना तुरुंगात किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या ते आजच्या पिढीस सांगूनही खरे वाटत नाही. कारण देशासाठी कोणताही त्याग न करणाऱ्या व तुरुंग न पाहिलेल्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत व राजकीय विरोधकांना बंदिवान बनविण्यासाठी तुरुंगाचा वापर होतो. आज तुरुंग म्हणजे ‘नरक’ बनले आहेत व माणसाला आवश्यक असलेल्या किमान सुविधांपासूनही आमचे तुरुंग लांब आहेत. हे माणुसकीच्या विरुद्ध आहे.

तुरुंग म्हणजे कोंडवाडे
मंजुळा शेट्येची हत्या हे राज्यातील हजारो सामान्य कैद्यांसाठी झालेले बलिदान आहे. तिच्या मृत्यूने तुरुंगातील अमानुषता व गैरव्यवहारावर प्रकाशझोत पडला आहे. महाराष्ट्रातील तुरुंग म्हणजे सरळ सरळ कोंडवाडे बनले आहेत. १६ तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा दीडशे टक्क्यांहून अधिक कैदी कोंबले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ८०४ कैद्यांची क्षमता असताना तेथे ३०००च्या आसपास कैदी कोंबले आहेत. हे सर्व खतरनाक गुन्हेगार नसतात व यापैकी अनेक जण न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असतात. ज्या मंजुळा शेट्येची हत्या भायखळा तुरुंगात झाली तीसुद्धा कायदा, पोलीस व न्यायव्यवस्थेच्या चक्रमपणाची बळी होती. तिच्या वहिनीने आत्महत्या केली व मृत्यूपूर्वी जबानीत तिने सासू व नणंद हिच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. पण हे सर्व खोटे होते व मंजुळाने असे काहीच केले नसल्याचे शेजारी व नातेवाईकांचे ठाम मत होते. पण शिक्षक असलेल्या मंजुळेस व तिच्या आईस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अशा असंख्य ‘मंजुळा’ न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असतील तर तुरुंगात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना मिळायला हवा. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासारखे अनेकजण आज न्यायाच्या प्रतीक्षेत तुरुंगात आहेत. राष्ट्राची सेवा करणे हाच त्यांचा अपराध ठरला आहे. साध्वी प्रज्ञा आता मालेगाव स्फोटांतून सुटली, पण तुरुंगात तिच्यावर भयंकर अत्याचार झाले. अशी प्रकरणे आता नेहमीच घडत आहेत.

निरपध्यांचे मरण
तेलगी प्रकरणात अनेक निरपराध पोलीस तुरुंगात गेले. त्यातील काहीजण तुरुंगातच मरण पावले. नवी मुंबईत लखन भैया या गुंडाचे एन्काऊंटर प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली झाले. ही चकमक खोटी असल्याची तक्रार लखनच्या भावाने उच्च न्यायालयात केली व शेवटी प्रदीप शर्मांसह ११ पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला. यापैकी कित्येक पोलीस या कारवाईत सक्रिय नसतानाही त्यांना न्यायालयाने जन्मठेपेपासून ७-८ वर्षांच्या शिक्षा ठोठावल्या. प्रदीप शर्मा हे या प्रकरणातून सुटले, पण ११ पोलीस न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत तुरुंगात सडत आहेत. त्यांनाही तुरुंगात माणूस म्हणून जागण्याचा हक्क आहे हे कुणी समजून घ्यायला तयार नाही. कश्मीरमधील अतिरेक्यांच्या मानवी हक्कांसाठी लढणारे तुरुंगातील सामान्य कैदी व कच्चे कैदी यांच्या मानवी हक्कांवर बोलत नाहीत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. भुजबळ यांना तुरुंगात उत्तम सुविधा मिळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली व तडीस नेली. पण त्याच तुरुंगात महिला कैदी व इतर सामान्य कैद्यांना किमान सुविधाही मिळत नाहीत व ते सर्व लोक नरकात आहेत यावरही श्रीमती अंजली दमानिया यांनी कधी आवाज उठवला तर तो माणुसकीचा धर्म ठरेल.

हे आमचे तुरुंग!
हिंदुस्थानातील अनेक तुरुंग म्हणजे खेळ बनला आहे. नागपूरचा तुरुंग फोडून चार खतरनाक गुन्हेगार सहज पळून गेले. तुरुंगात आरामात बसून बाहेर खंडणीचे राज्य आजही चालवले जाते. तुरुंग भरले म्हणून बाहेरची गुन्हेगारी संपली असे कधीच होत नाही. उलट आमच्या देशातील तुरुंग हे गुन्हेगारांचे ट्रेनिंग सेंटर व ‘स्किल डेव्हलपमेंट’ म्हणजे कौशल्य विकास केंद्र बनले आहे. बिस्कीट किंग म्हणून प्रख्यात असलेला राजन पिल्लई हा फसवणुकीच्या गुन्ह्यांखाली दिल्लीतील तिहार तुरुंगात गेला व पुढच्या चोवीस तासांत तुरुंगातून त्याचा मृतदेह बाहेर आला. तुरुंगात त्याचा खून झाला. गोव्याच्या आग्वाद तुरुंगातून स्मगलर सुकुर नारायण बाखिया सदेह मुंबईस पळून गेल्याची रंजक कथा आजही लोकप्रिय आहे. तिहारच्या तुरुंगातून चार्ल्स शोभराज पळाला तो तुरुंग अधिकारी व सुरक्षा रक्षकांना मिठाईत गुंगीचे औषध कालवून.

कायदा तोकडाच
पोलिसांमध्ये अमानुषता आणि निर्घृणता का वाढते आहे? ते शोधावे लागेल. कल्याणच्या नेवाळी येथे शेतकरी त्यांच्या हक्काच्या जमिनीसाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी त्यांच्यावर सरळ बंदुका रोखल्या व गोळ्या चालवल्या. चारशे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. ही कायद्याची दहशत इतर वेळी शेपट्या घालून बसते. अनेक निरपराध्यांना न्याय देण्यासाठी हा कायदा तोकडा पडतो व मंजुळा शेट्येसारख्यांना नाहक गुन्हेगारीचा शिक्का घेऊन अकाली मरण पत्करावे लागते. या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी व मंजुळाच्या अपराध्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता शिवसेनेच्या वतीने आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. त्या स्वतः भायखळय़ाच्या तुरुंगात गेल्या व माहिती घेतली. हे सर्व काम पूर्वी पत्रकार मंडळी करीत होती. “People’s right to know” म्हणजे काय घडते आहे हे लोकांना समजण्याचा अधिकार लोकशाहीत असतो व ते सांगण्याचे काम पत्रकार करतात. त्यांच्यामुळेच वृत्तपत्र स्वातंत्र्य व माणुसकी जिवंत आहे. मंजुळा शेट्येसारखी प्रकरणे म्हणजे माणुसकी, स्वातंत्र्य व मानवी अधिकाराचा मृत्युलेख आहे. भायखळ्याच्या महिला तुरुंगात हा मृत्युलेख लिहिला गेला. कायद्याचे राज्य पोलीस व जेलर यांनी मिळून तुरुंगातच संपवले. मंजुळा शेट्येने या सगळ्यांसाठी बलिदान दिले आहे.

@rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या