सत्य, माणुसकी आणि विज्ञान- व्याख्या कुणाला जमेल?

सत्य आणि माणुसकीची व्याख्या रोज बदलत आहे. सिद्धांत गणोरे या मुलाने त्याच्या आईची हत्या केली व त्याचे दुःख त्याला वाटत नाही. गीता कपूर या वृद्ध अभिनेत्रीस तिचा मुलगा इस्पितळात टाकून गेला. कश्मीरातील मानवी हक्कांचे त्रांगडे न सुटणारे आहे. विज्ञानाने सर्व काही दिले, पण माणुसकीची व्याख्या करणे जमले नाही!

rokh-thokमाणुसकी आणि संवेदनेचा अंत होताना आपण सगळेच पाहत आहोत. वाकोला येथे एका तरुण मुलाने आईची हत्या केली. त्या मुलाची मानसिकता शोधण्याचा प्रयोग आता सुरू झाला आहे. सिद्धांत गणोरे या कॉलेज तरुणाने त्याच्या आईची निर्घृणपणे हत्या केली व त्या हत्येबद्दल त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नाही असे चित्र समोर आले. आईचा खून करण्यासाठी फक्त चाकू आणि बंदुकांचाच वापर होतो असे कोणी सांगितले? ‘पाकिजा’सह शंभरावर हिंदी चित्रपटांत काम केलेल्या गीता कपूर या जुन्या जमान्यातील अभिनेत्रीची कहाणी प्रसिद्ध झाली आहे. तिचा कमवता मुलगा तिला इस्पितळात बेवारस अवस्थेत सोडून गेला व ती वृद्ध माता मुलाच्या नावाने आक्रोश करीत राहिली. तिचे इस्पितळाचे लाखभर रुपयांचे बिल अशोक पंडित व रमेश तौरानी या दोघांनी भरले. आईला अशा प्रकारे बेवारस अवस्थेत सोडून जाणे हासुद्धा खून आहे, बेइमानी आहे. अशी बेइमानी समाजाच्या सर्वच स्तरांतून दिसत आहे.

माणुसकीची व्याख्या?

माणुसकी आणि मानवतेची व्याख्या कोणी कशी करावी? हत्ती व सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे मानवतेची व्याख्या आहे. कश्मीरात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची ओरड आहे. जे फुटीरतावादी हिंदुस्थानी सैनिकांच्या गोळ्यांना बळी पडत आहेत, त्यांना वाटतेय त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. लष्करावर दगडफेक करणाऱ्या कश्मिरी तरुणास मेजर गोगोईने जीपला बांधले हे काही लोकांना मानवी हक्कांचे उल्लंघन वाटते, पण सैनिकांच्या हत्या होत आहेत, त्यांना दगड मारले जात आहेत हे मानवी हक्कांचे उल्लंघन नसून त्या फुटीरतावाद्यांचा जणू तो जन्मसिद्ध हक्कच आहे.

मानवता हे प्रथम श्रेणीतील पुरुषांचे दुसरे लक्षण! स्वतःचे निरीक्षण करीत असताना प्रत्येकालाच आपले वर्तन मानवतेने परिपूर्ण वाटत असते; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती फार भिन्न असते. हिटलर म्हणतो, ‘‘सामान्य माणसाच्या हातून अगणित पापे घडत असतात याचा त्यालाच पत्ता नसतो.’’ आत्मपरीक्षण करीत असताना ‘मानवता’ या शब्दाचा अर्थ आपण आपल्या सोयीनुसार लावीत असतो व त्या अर्थानुरूप पुष्टी देणारे प्रसंगही आपल्या जीवनात घडलेले असतात. किंबहुना, आपल्या जीवनातील प्रसंग कितीही सामान्य असला तरी आपण त्याला मानवतेच्या चौकटीत बसवीत असतो.

दोन सामान्य माणसे जेव्हा त्यांच्याप्रमाणेच सामान्य गोष्टींसाठी भांडत असतात त्यावेळी भांडण्याची त्यांची तळमळ पाहता दोघांनाही आपापली बाजू सत्य वाटत असते, परंतु प्रत्यक्षात सत्य काय आहे याचे स्पष्टीकरण पुद्दुचेरीच्या अरविंदाश्रमात लिहून ठेवले आहे – ‘‘जेव्हा दोघे भांडतात तेव्हा दोघांचीही चूक असते.’’ जेव्हा कौरव-पांडवांत झगडा चालू असतो त्यावेळी सत्य पांडवांच्या बाजूने व असत्य कौरवांच्या बाजूने असते. ज्यावेळी दोन पांडवांत झगडा चालू असतो त्यावेळी दोघेही सत्य असतात व ज्यावेळी दोन कौरवांत भांडण चालू असते त्यावेळी दोघेही असत्य असतात. श्री. शिवेंद्र कंदहारी यांनी म्हटल्याप्रमाणे जगातील बरीचशी भांडणे कौरव-कौरवातच असल्याने त्यावेळी सत्य-असत्य शोधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

येशू ख्रिस्ताच्या प्रवचनास एक वेश्या आली असता श्रोते तिला दगड मारू लागतात. येशू म्हणतो, ‘‘हा काय प्रकार आहे? मला तर हे ढोंग वाटतेय. ज्याला वाटते, मी कधीच खोटे बोललेलो नाही किंवा एकदाही पाप केले नाही त्यानेच तिला दगड मारावा!’’ यावर सगळ्यांचेच हात खाली जातात व दगड गळून पडतात. कारण जगातील बहुसंख्य लोक असेच असतात. येशूचे वचन ऐकण्यापूर्वी प्रत्येक जण स्वतःला सत्य समजत असतो.

हे कशामुळे?

माणूस नातेसंबंध का तोडतो आहे? पांडव म्हणवून घेणारेच आपापसात का भांडत आहेत? विज्ञानाने गरजा वाढवून ठेवल्या. नातेसंबंधांतही त्यामुळे ग्राहक आणि उपभोक्ता निर्माण झाला. ख्रिस्त एकदा रस्त्याने जात होता. एका घरात त्याला खूप जल्लोष आणि आनंदी आनंद चालल्याचे दिसले. तो त्या घरात गेला. एका आसनावर एक माणूस दारू पिऊन बेहोश झालेला दिसला. ख्रिस्ताने त्याला उठवले आणि विचारले, ‘‘अशी दारू पिऊन तू आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश का करतोस?’’ तो माणूस म्हणाला, ‘‘मी महारोगी होतो, तेव्हा तू मला स्पर्श करून माझा रोग बरा केलास. आता मला काही उद्योग नाही म्हणून मी दारू पितो.’’

ख्रिस्त पुढे गेला. त्याला एक तरुण वेश्येच्या मागे लागलेला दिसला. ख्रिस्ताने त्याला विचारले, ‘‘या स्त्रीकडे तू वासनेच्या नजरेने का पाहतोस?’’ तो तरुण म्हणाला, ‘‘पूर्वी मी आंधळा होतो तेव्हा तू मला दृष्टी दिलीस. आता मी या डोळ्यांचा दुसरा काय उपयोग करू?’’ तेव्हा ख्रिस्ताने त्या वेश्येलाच विचारले, ‘‘बाई गं, पण तू तरी या पापाच्या मार्गाने का जातेस?’’ यावर ती बया म्हणाली, ‘‘मलादेखील याच जीवनात आनंद वाटतोय आणि कितीही पाप केले तरी तू त्यातून माझा उद्धार करतोस! मग चिंता कसली? आणि मी दुसरे काय करू?’’ ख्रिस्त मग गावाबाहेर गेला. तिथे त्याला एक म्हातारा माणूस रडत बसलेला दिसला. ख्रिस्ताने त्याला विचारले, ‘‘का रे रडतोस?’’ म्हातारा म्हणाला, ‘‘मी रस्त्यावर मरून पडलो होतो. तुम्ही मला जिवंत केलेत. मग आता रडण्याखेरीज काय करू?’’ चमत्कार आणि विज्ञानाने हे असे करून ठेवले आहे. नात्यांचा सत्यानाश आणि सत्य, संवेदनांची हत्या हेच त्याचे दुर्दैवाने मिळालेले फळ आहे काय?

अंत्ययात्रांचे उत्सव

राजकारण व न्यायालये म्हणजे नाती व माणुसकीचे कत्तलखाने झाले आहेत. स्वार्थ न्यायदेवतेच्या दरबारात आणि राज्यकर्त्यांच्या मनात आहे. ताईमहाराज प्रकरणाच्या विळख्यात अडकलेल्या लोकमान्यांकडे एका स्वार्थी माणसाने कायदेविषयक सल्ला मागितला आणि त्याही परिस्थितीत टिळकांनी त्यास योग्य सल्ला दिला. तेथे उपस्थित असलेल्या एका सज्जनाने टिळकांना प्रश्न केला. ‘‘आपल्या अशा परिस्थितीतही लोक आपणास त्रास कसे देऊ शकतात?’ लोकमान्य शांतपणे म्हणाले, ‘‘चालायचंच! दुसऱ्याच्या चितेवर आपली विडी पेटविणारे लोक या जगात असतातच.’’

‘श्री ४२०’ या चित्रपटात पैशासाठी हपापलेल्या आणि मानवता गुंडाळून टाकलेल्या नीच लोकांकडे पाहात राज कपूर म्हणतो, ‘‘सुना था इन्सान पहले बंदर था, मगर पैसो के लालचने उसे कुत्ता बना दिया!’’ आता असे बोलणेही कुत्र्यांची बदनामी ठरू शकेल, इतकी मानवतेची अवहेलना सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. जागोजागी उभे राहणारे वृद्धाश्रम, अनाथाश्रम आपण पाहिले की, ज्यांचे मन अस्वस्थ होत नाही ते मानवतेचे शत्रूच आहेत. कश्मीरात अतिरेकी व फुटीरतावाद्यांच्या देवासारख्या मिरवणुका काढल्या जातात व अतिरेक्यांच्या शरीरास स्पर्श करता यावा म्हणून तरुणवर्गाची रेटारेटी होते.

दहशतवाद्यांच्या म्होरक्यास अल्लाच्या बंद्याचा मान ज्या समाजात मिळाला तो समाज कोणत्याही जातीचा आणि धर्माचा असो, त्याचा धिक्कार व्हायलाच हवा. आज आपण अशा समाजात वावरत आहोत जेथे वियोगाचे दुःख नाही, मृत्यू अस्वस्थ करीत नाही व अंत्ययात्रांचे उत्सवी स्वरूप झाले आहे. माणसे कश्मीरातही मारली जात आहेत व मुंबईसारख्या शहरात मुलगा सरळ आईचा खून करतो तरी त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा नाही. माणुसकीचे दुकान कधीच बंद झाले आहे! विज्ञान युगात माणुसकीला ग्राहक उरला नाही!

Twitter: @rautsanjay61

email ID: rautsanjay61@gmail.com