आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 17 महिन्यांनंतर त्यांना राऊस ऍव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉण्डरिंगचा आरोप करत ईडीने जैन यांना 30 मे 2022 रोजी अटक केली होती.
सत्येंद्र जैन यांना 26 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी अंतरीम जामीन मंजूर केला होता. मात्र 10 महिन्यांनंतर 18 मार्च 2024 रोजी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आणि तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर जैन यांनी पुन्हा जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर आज राऊस ऍव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या वेळी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जैन यांना जामीन दिला. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, अशा अटी-शर्ती कोर्टाने घातल्या आहेत.
काय होते आरोप
z दिल्ली सरकारमध्ये मंत्री असताना जैन यांनी बनावट कंपन्यांच्या आधारे 2015 ते 2017 या काळात बेहिशेबी मालमत्ता खरेदी केली. यात मनी लॉण्डरिंग झाल्याचा आरोप अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केला.
z ईडीने जैन यांची चौकशी सुरू केली. 30 मे 2022 रोजी त्यांना अटक करण्यात आली. गेल्या 17 महिन्यांपासून ते तिहार तुरुंगात होते.
‘आप’च्या चार नेत्यांवर ईडीची सुडाने कारवाई
n मोदी सरकारच्या इशाऱयावर काम करणाऱया ईडीने ‘आप’च्या चार नेत्यांवर सुडाने कारवाई केली. तुरुंगात डांबले. चारही नेत्यांना जामीन मिळाला आहे.
n सत्येंद्र जैन सर्वाधिक काळ 871 दिवस तुरुंगात राहिले. त्यांना आज अखेर जामीन मिळाला.
n कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी ईडीने अटक केली होती. 510 दिवसांनंतर 9 ऑगस्ट 2024ला त्यांना जामीन मिळाला.
n खासदार संजय सिंह यांना 4 ऑक्टोबर 2023ला अटक झाली होती. 181 दिवसांनी 3 एप्रिल 2024 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली.
n माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी ईडीने अटक केली होती. 177 दिवसांनी त्यांना जामीन मिळाला.
सत्येंद्र जैन यांचा गुन्हा काय होता? त्यांच्या घरी ईडीने अनेकदा धाड टाकली. पण एक पैसाही मिळाला नाही. आरोग्य मंत्री असताना जैन यांनी मोहल्ला क्लिनिक सुरू केले. गरिबांना येथे मोफत उपचार मिळत होते. मात्र हे मोफत उपचार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जैन यांना तुरुंगात टाकले. देव आमच्याबरोबर आहे. आज त्यांची सुटका झाली.
z अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री