रेस्टॉरंट काढलय की विद्यापीठ चालवताय?, आदित्य ठाकरेंचा पुणे विद्यापीठाला सवाल

सामना ऑनलाईन । मुंबई

‘रेस्टॉरंट काढलय की विद्यापीठ चालवताय? कोणी काय खावं, हे कोणी का ठरवावं? शाकाहारी आणि सुवर्ण पदक याचा काय संबंध? असले फर्मान काढणारे कोण आहेत, त्यांनाच सुवर्ण पदक देऊन पदमुक्त करा.’ अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे विद्यापीठाला जाब विचारला आहे.

शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थ्यालाच पुणे विद्यापीठाचे ‘योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही अजब अट घालण्यात आली आहे. या अटीवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला जळजळीत सवाल केला आहे.

विद्यापीठाने आपले फर्मान मागे घ्यावे. अभ्यास, पटपडताळणी या कामात लक्ष घालावे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कोणी काय खावं ह्या पेक्षा, त्यांना अभ्यासानंतर नोकरी, रोजी रोटी कशी मिळेल, ह्यात लक्ष द्या, असेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

tweets

आपली प्रतिक्रिया द्या