आता बुलेट विकत घेण्याची गरज नाही, रॉयल एनफिल्डच्या बाईक नाममात्र दरात भाड्यावर मिळणार

बुलेट या दुचाकीची निर्मिती करणाऱ्या रॉयल एनफिल्डचे जगभरात खूप चाहते आहेत. खासकरून हिंदुस्थानात या कंपनीचे आणि बुलेटचे बरेच चाहते आहेत. किंमत जास्त असूनही अनेकांनी बुलेट खरेदी केल्या आहेत. ही बाईक चालवणारी व्यक्ती आकर्षक आणि रुबाबदार दिसते असा समज आहे. त्यामुळे या बाईकचा खप जास्त आहे. बुलेटची किंमत जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ही बाईक घेऊ शकत नाही. अशा ग्राहकांसाठी रॉयल एनफिल्डने भाड्याने बाईक देण्यास सुरूवात केली आहे.

Royal Enfield Rental Program नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रॉयल एनफिल्ड कंपनी त्यांच्या दुचाकी भाड्याने देते. मात्र यासाठी काही अटीशर्ती आहेत. सगळ्यात पहिली बाब ही आहे की ही योजना निवडक शहरांपुरताच लागू आहे. सध्या देशातील 25 शहरांमध्ये ही योजना सुरू झाली असून यामध्ये दिल्ली, जयपूर, जैसलमेर, हरिद्वार, चेन्नई, देहरादून, मनाली, धर्मशाला आणि लेह यासारख्या शहरांचा समावेश आहे. येणाऱ्या काळात अन्य शहरांतही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सघ्या सुरू आहेत. या योजनेअंतर्गत 300 दुचाकी या भाड्याने देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण दिवसासाठी तुम्ही या बाईक भाड्याने घेऊ शकता.

रॉयल एनफिल्डच्या बाईक घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला शहर, पिकअप आणि ड्रॉपची तारीख वेळ टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला उपलब्ध बाईक, मॉडेल आणि त्याचे भाडे कळू शकेल. हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम्ही बाईक भाड्याने देणाऱ्या ऑपरेटरला काही अनामत रक्कम भरावी लागेल जी तुम्हाला कालांतराने परत मिळू शकेल. प्रत्येक शहरानुसार भाड्याचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये बुलेटचे भाडं 1200 रुपये आहे तर हिमालयन नावाच्या बाईकसाठी हा दर 1533 इतका दाखवण्यात आला आहे.