रोबोट शिक्षिकेकडून अभ्यासाचे धडे; एआय शिक्षिका आयरिसने जिंकली विद्यार्थ्यांची मने

आसामचे प्रसिद्ध वस्त्र मेखला चादर साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने परिधान केलेल्या आयरिस या एआय शिक्षिकेने सध्या ईशान्येकडील शालेय विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत. आसाममधील रॉयल ग्लोबल स्कूलमध्ये आयरिसचा वर्ग भरला होता. या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयरिसने विविध उदाहरणे आणि संदर्भ देऊन उत्तरे दिली.

हिमोग्लोबिन म्हणजे काय, असा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांमधून आला. हा प्रश्न ऐकल्यावर आयरिसने त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण माहितीसह उत्तर दिले. रॉयल ग्लोबल स्कूलच्या प्रवक्त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न अभ्यासक्रमातील असोत किंवा अभ्यासक्रमाच्या बाहेरील, आयरिस प्रत्येक प्रश्नाला तत्पर उत्तरे देत होती. शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील रोबोटच्या विविध उपक्रमांमध्ये उत्सुकतेने सहभाग घेतला. रोबोटसोबत हात मिळविण्यासाठी विद्यार्थी पुढे सरसावत होते. हातवारे करतानाचा एआय रोबोट पाहून विद्यार्थी खूपच आनंदी झाले. यामुळे वर्गातील शिकण्याची प्रक्रिया मजेदार
आणि आकर्षक बनल्याचे शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

n ‘आयरिस’मध्ये आवाज नियंत्रित सहाय्यक बसविण्यात आले आहे. याद्वारे आयरिस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आणि तपशीलवार स्पष्टीकरण देऊ शकते.

n आयरिस हा एआर रोबोट एनआयटीआय आयोगाने सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) प्रकल्पांतर्गत मार्पेट लॅब एज्यु-टेकच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

n ‘आयरिस’ लाँच करणे हा शिकण्याचा अनुभव उंचाविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलीला पूरक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.