सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदी सरकारला फटकारले

सामना ऑनलाईन,महाड

देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे म्हणूनच भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने होत आहेत. त्याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जबरदस्त फटकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोदी सरकारला लगावले.  देशातील राजकीय व्यवस्था सपशेल कमकुवत झाली असून विकासाकडे  दुर्लक्ष केले जात असल्याचे खडे बोलही त्यांनी सुनावले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८व्या पुण्यतिथीनिमित्त सरसंघचालकांनी रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केले. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या रायगडावर मी आयुष्यात पहिल्यांदा आलो आहे. त्यामुळे रायगड पहायला मिळणे हे माझे सौभाग्य आहे. संपूर्ण रायगड किल्ला हेच खरे ऐतिहासिक स्मारक असून शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणाकेंद्र आहे. छत्रपतींचा वारसा खऱया अर्थाने पुढे चालवायचा असेल तर जाती-पाती विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे जनतेचं भलं करायचं सोडून स्वतःचं भलं कसं होईल याकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे यापुढे शिवरायांचे संकल्पित कार्य पुढे नेण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.