वैभवशाली हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने कर्तव्याचे पालन करावे – मोहन भागवत

359

हिंदुस्थानच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला राजा बनवले आहे. या राजाकडे अधिकार आहेत. मात्र, वैभवशाली हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य, शिस्त आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरस्वती शिशु मंदिराच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भागवत सहभागी झाले होते. त्यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

देशासाठी बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतीकारकांना अपेक्षित असलेल्या हिंदुस्थानची निर्मिती करणे आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी वैभवशाली हिंदुस्थानचे निर्माण करण्याची गरज आहे. हा हिंदुस्थान मानवता आणि जागतिक विकासासाठी कार्य करेल आणि जगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समर्थ, सक्षम, वैभवशाली आणि परोपकारी हिंदुस्थानच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत आपले कर्तव्य बजावल्यास हे लक्ष्य साध्य करता येईल आणि देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करेल असे ते म्हणाले. समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ याच दिशेने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. रावण ज्ञानवंत होता. मात्र, त्याची विचारधारा चुकीची असल्याने त्याचा नाश झाला. त्यामुळे ज्ञानाचा उपयोग विकासासाठी आणि शक्तीचा उपयोग दुर्बलांच्या संरक्षणासाठी तसेच धनाचा उपयोग गरीबांसाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले. हिंदुस्थान ‘वसुधैव कुटुंबकम्’ या ध्येयानुसार आदिकालापासून वाटचाल करत आहे. त्यामुळे वैभवाशाली आणि परोपकारी हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही भागवत यांनी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या