मणिपूरमध्ये देशाबाहेरील शक्तिंनी हिंसाचार घडवला? संरसंघचालकांचा संशय

मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही शक्तिंनी घडवला होता असा संशय सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. हिंदुस्थानची प्रगती काहींना पाहवत नसून, स्वत:ला वोक (जागे झालेले), कल्चरल मार्क्सिस्ट म्हणवणारी मंडळी हिंदुस्थानसह जगात समाजात तेढ निर्माण करणे, समाजाची सामूहिकता तोडणे यासाठी प्रयत्न करत असल्याचे भागवत यांनी म्हटले. ही मंडळी नाव मार्क्सचे घेतात, मात्र 1920 मध्येच त्यांनी मार्क्सने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे होणार नाही हे ओळखले होते.मार्क्सच्या भविष्यवाणीप्रमाणे गोष्टी व्हाव्यात असे दाखवत ते जगाचे नियंत्रण आपल्या हाती यावे यासाठी तेव्हापासूनच उद्योग करत आहेत. ते अनिर्बंध स्वैराचाराचा पुरस्कार करतात, सगळ्या संस्थांना ते त्यासाठी आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात असे भागवत यांनी म्हटले.

मणिपूर हिंसाचाराबाबत बोलताना भागवत यांनी म्हटले की, मणिपूर आता शांत होतंय, मात्र तिथे अचानक संघर्ष का सुरू झाला हा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून मैतेई, कुकी सोबत राहतात. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ असून ,असा वाद होण्याचा फायदा कोणाला असणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला. देशाबाहेरील शक्तिंनाही याचा फायदा आहे, हे घडवणारे बाहेरचे लोकं होते का ? अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली. सरकार मजबूत आहे आणि तत्परही आहे. सगळे प्रयत्न केले तरीही हिंसाचार सुरूच राहिला. शांततेचे प्रयत्न सुरू असताना एखादी दुर्घटना घडवायची म्हणजे तेढ पुन्हा निर्माण होते. पुन्हा द्वेष वाढतो. हे कोणी करवलं ? हे होत नसून घडवलं जात आहे, असे ते म्हणाले.

तोंडावर ताबा ठेवावा

सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, भांडणाची भाषा वेगळी असते, मित्रत्वाची भाषा वेगळी असते. मित्रत्वाची भाषा म्हणजे शरणागती पत्करणे, दुर्बळता नाही. आपल्या तोंडावर ताबा ठेवावा लागेल. हा इशारा कोण्या एकाला नाही तर सगळ्यांसाठी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. या काळात शिवीगाळ होईल, प्रचार होईल. मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊन करू नये. उथळ विधानांना बळी पडून मतदान करू नये. शांतपणे विचार करून कोण चांगला आहे ते पाहून मग मतदान करावे.