संघाचं ‘बौद्धिक’ आता वेब चॅनेलवर

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वेब चॅनेलचं वाढतं महत्व लक्षात घेऊन आपले विचार तरुणांसमोर मांडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता स्वत: वेब चॅनेल आणण्याचा निर्णय घेत्याचे समजते. सोशल मीडियावर सक्रीय होण्यावरून संघात दोन मतप्रवाह होते. मात्र आता ‘जुने जाऊद्या मरणा लागूनी’ म्हणत नव्याचा स्वीकार करण्याचं संघातील नेत्यांनी ठरवल्याचं कळतं.

डाव्या विचारधारेतील लोक सोशल मीडियाचा वापर करून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. तेव्हा आपलाही विचार मागे राहू नये, सोशल मीडियातून तो विचार तरुणांसमोर पोहोचावा या मतावर संघातील नेत्यांचं एकमत झाल्याचं कळतं. त्यामुळेच एक वेब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. संघाची मीडिया विंगने ‘इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्र’ या नावाने हे वेब चॅनेल सुरू केलं असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सुनील अंबेकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. अभाविप संदर्भातील प्रश्नांची उत्तर यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे चॅनेल आरएसएसचे पहिले दृकश्राव्य डिजीटल व्यासपीठ आहे.

विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणे या वेब चॅनेलचे नाव असणारा माईकही तयार केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या माईकवर IVSK (इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्र) नाव असेल अशी माहिती मिळते. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत, प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता या वेब चॅनेलचा वापरकरण्यात येईल असं ही बोललं जात आहे. संघाच्या कार्यक्रमही या वेब चॅनेलवरून दाखवण्यात येणार असल्याचं कळतं. त्यामुळे तरुणांशी आपली नाळ जोडण्यासाठी संघ सोशल मीडियावर ‘दक्ष’ झाल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या