प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची आता खैर नाही,आरटीओ धाड टाकून कारवाई करणार

20

सामना ऑनलाईन,मुंबई

सणासुदीला होणारी प्रवाशांची गर्दी पाहून अवाच्यासवा भाडे वाढविणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन कार्यालयाकडून राज्यातील सर्व आरटीओंना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. आरटीओची पथके अशा खासगी वाहनांवर  अचानकपणे धाड टाकून कारवाई करणार आहेत.

गर्दी पाहून प्रवाशांना लुटण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारले जाते. रेल्वे आणि एसटीच्या गाडय़ा फुल्ल झाल्यानेदेखील प्रवाशांना नाइलाजाने जादा पैसे भरून खासगी बसेसमधून प्रवास करावा लागत असतो. त्यामुळे परिवहन विभागाने खासगी बसचालकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एप्रिल 2018 मध्ये खासगी प्रवासी वाहनांचेदेखील भाडेदर निश्चित केले आहेत. खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. त्यापेक्षा अधिक आकारल्यास प्रवासी परिवहन विभागाकडे तक्रार करू शकतात. असा निर्णय झाल्यानंतर पाच महिन्यांत 76 तक्रारी परिवहन खात्याकडे आल्या व यात दोन प्रकरणांत दंडदेखील आकारण्यात आला आहे.

परिवहन विभागाची हेल्पलाइन व संकेतस्थळ

दिवाळीत पुन्हा खासगी प्रवासी बसचालकांकडून अवाजवी भाडे आकारण्यात आले. त्यामुळे परिवहन विभागाने जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन विभागाने प्रवाशांसाठी 022-62426666 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केला आहे. शिवाय आपल्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही यासंबंधी तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या