‘छोटी बहू’ जाणार बिग बॉसच्या घरात!

छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रियॅलिटी शो बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. यंदा कोणते स्पर्धक घरात सामील होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ‘छोटी बहू’ फेम अभिनेत्री रुबिना दिलाईक आता बिग बॉस 14 मध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून या सीजनमधील ती सर्वात महागडी स्पर्धक असल्याची चर्चा आहे.

बिग बॉसच्या घरात स्पर्धक कोण असणार यावरून ग्रँड प्रीमियरमध्ये पडदा हटवला जातो. यंदा पहिल्यांदाच हा नियम तोडला असून पहिल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा सलमानने केली आहे. सुप्रसिद्ध गायक पुमार शानू यांचा मुलगा जान पुमार हा पहिला स्पर्धक ठरला आहे. ‘माझा मुलगा बिग बॉसच्या घरात जाणार आहे याचा मला आनंद आहे. त्याला माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा! तुम्ही पण त्याला साथ द्या’ असे आवाहन पुमार शानू ह्यांनी इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे केले आहे.

हे आहेत संभाव्य स्पर्धक

जस्मिन भसीन, राहुल वैद्य, कविता कौशिक, निशांत मलकानी, जिया मनेक, निक्की तांबोळी, सारा गुरपाल, नैना सिंह, पवित्र पुनिया हे स्पर्धक देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. यंदा घरात सहभागी होणाऱया स्पर्धकांची कोरोना टेस्ट केली जाणार असून त्यांना बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी क्वारंटाईन केले जाईल. 3 ऑक्टोबरपासून हा शो प्रसारित होणार आहे.

घरात असणार स्पा, थिएटर आणि मॉल

नुकतीच सलमानने एक पत्रकार परिषद घेऊन बिग बॉसचे घर कसे असणार या सस्पेन्सवरून पडदा हटवला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात स्पा, थिएटर, मॉल, रेस्टॉरंट अशा सुविधा मिळणार आहेत. पहिल्यांदाच या सुविधा स्पर्धकांना देण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या