‘अफवाखोरां’ना आवरा

141

>>नरेंद्र केशव कदम<<

परळ रेल्वे स्टेशन पुलावरून प्रामाणिक मुंबईकर रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणेच धक्के खात, फेरीवाल्यांना सावरत गाडी पकडण्यासाठी जात असताना अचानक ‘अफवाखोरां’नी आपली कामगिरी चोख बजावली आणि निष्पाप २५ हून अधिक प्रवाशांचा बळी घेतला. अगोदरच या पुलावर रेल्वेच्या अनागोंदी व ढिसाळ वृत्तीने रेल्वे प्रवासी पुलावरून जाताना-येताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जात होते. हे अफवाखोर म्हणजेच चालते बोलते यमदूतच असतात. आपले शासन, पोलीस अशा अफवाखोरांना पकडण्याच्या भानगडीत कधीच पडत नसतात. लोकांनी तरी या पुढे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. म्हणजे अशा दुर्दैवी घटना कमी होतील. मुंबईत जवळ जवळ सर्वच रेल्वे स्टेशन पुलांवर रेल्वे आणि आर.पी.एफ पोलिसांच्या अर्थपूर्ण सहकार्याने फेरीवाले मोकाट बस्तान बसवून कर्णकर्कश आवाजात ओरडत असतात. पादचाऱ्याना यांच्यापासून स्वतःला सावरीत जावे लागते. कधी कोणी यांना हटकले तर पादचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत यांची मजल जाते. दादर पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या मोठय़ा पुलावर मोबाईल सिमकार्ड, घडय़ाळे, बॅगा विकणारे फेरीवाले पुलाच्या मधोमध पाथारी पसरून मोठमोठय़ाने ओरडत असतात. त्यांच्या बाजूलाच बाकडय़ांवर आर.पी.एफ. पोलीस हातात बंदुका घेऊन शांतपणे हे सर्व पाहात असतात. असे चित्र मुंबईत सर्वच रेल्वे स्टेशनांवर पाहवयास मिळते. आर. पी. एफ. आणि फेरीवाले यांच्या संगनमताने असे चाललेले असते. कोणताच रेल्वेमंत्री किंवा रेल्वे अधिकारी यांना रोखू शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कुठल्याही रेल्वेच्या जागेत फेरीवाले दिसल्यास आपण त्वरित संबंधित रेल्वे मास्तर कार्यालयात तक्रार बुकात लेखी तक्रार करून त्याची एक प्रत स्वतःजवळ घ्या. अर्थात निर्ढावलेले रेल्वेचे बाबू प्रवाशांना तक्रार करण्यापासून रोखतात. कारण एकदा अधिकृत तक्रार केली की रेल्वेला लेखी उत्तर देणे बंधनकारक असते. आता परळ पुलावरील घटनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कडक भूमिका घेऊन अशा अफवाखोरांवर कठोर कारवाई करावी आणि गेली रेंगाळलेला पुलाचा प्रश्न जलद गतीने सोडवावा.

आपली प्रतिक्रिया द्या