खडसेंच्या पोस्टरवरून ‘कमळ’ गायब! उद्या राष्ट्रवादीत प्रवेश?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. खडसे समर्थकांनी भाजपचे कमळ ही निशाणी  हटवत ‘भाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण आणि धोरण’ अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यास जळगावात सुरुवात केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेच्या मुहूर्ताची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असे म्हणत खडसे यांनी तूर्तास तरी राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. मात्र खडसे समर्थकांनी त्या आधीच कमळ हे भाजपचे चिन्ह बॅनरवरून हटवत जळगावमध्ये जोरदार बॅनरबाजी सुरू केली आहे.

मुंबईत गुरुवारी होणार राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी खडसे हे मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसे निरोपही खडसे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले असून मुंबईला जाण्यासाठी वाहनेही तयार ठेवण्यात आली आहेत. ‘भाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण, भाऊ आम्ही सदैव आपल्या सोबत’ असे बॅनर त्यावर लावण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या