रुपयाच्या पुन्हा गटांगळ्या! ऐतिहासिक घसरणीस पोहोचला 81.09 वर, वाचा काय आहे कारण

दिवसाचा कारभार सुरू होत असतानाच आज रुपयात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 62 पैशांनी घसरून 81.09 वर आला. या घसरणीसह रुपयाने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल बँकेनं व्याजदर वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानं आणि कठोर भूमिका कायम ठेवल्यानं गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे.

गुरुवारी रुपया 90 पैशांनी घसरून 80.86 प्रति डॉलर (तात्पुरत्या) या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला होता. फेडरल बँकेनं दर वाढवल्यामुळे आणि युक्रेनमधील राजकीय तणाव वाढल्यानं गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचं विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितलं. त्याचबरोबर विदेशी बाजारात अमेरिकी चलनाची मजबूती, देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याचाही परिणाम रुपयावर होत आहे.

दिवसाच्या व्यवहारादरम्यान आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 80.27 वर उघडला, तो पुढे 80.95 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. शेवटी, तो 80.86 वर स्थिरावला, जो मागील दिवसाच्या किंमतीच्या तुलनेत 90 पैशांची घसरण दर्शवत आहे. फेडरल बँकेने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत.

आता सर्व लक्ष बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरणावर असेल, असे फॉरेक्स ट्रेडर्सचे म्हणणे आहे. सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.38 टक्क्यांनी वाढून 110.06 वर पोहोचला.