भयंकर! ३० पेक्षा अधिक लोकांना खाणारं ‘नरभक्षी’ जोडपं

28

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियामध्ये एका ‘नरभक्षी’ जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. १८ वर्षात जवळपास ३० लोकांची हत्या करून त्यांना खाल्ल्याचं या जोडप्याने मान्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आठ लोकांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि त्याबाबत शोध सुरू आहे. रशियाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय दिमित्री बाकेशेवने १९९९ पासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. बाकेशेवसोबतच त्याची पेशाने वकील असलेली पत्नी नतालियाला ही अटक करण्यात आली आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, रशियन इन्वेस्टिगेशन कमिटीने म्हटले आहे की बाकेशेव आणि त्याची पत्नी मानवी मृतदेह फ्रीज आणि तळघरात साठवून ठेवत असतं. या दोघांनी मानवी मांसापासून लोणच बनवून ते साठवून ठेवलं होतं असं ही सांगण्यात येत आहे. याशिवाय पोलिसांना १९ मानवी कवट्याही सापडल्या आहेत.

आरोपी युवक आणि त्याची पत्नी मिलिटरी अॅकॅडमीत काम करत होती. क्रास्नोडारमध्ये एक मोबाईल फोन आढळला होता. हा मोबाईल बाकेशेवचा होता. या मोबाईलमध्ये बाकेशेवचे मृतदेहासोबत फोटो होते. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू करून त्याला अटक केली.

बाकेशेवची बायको नतालिया त्याच्यापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. मात्र या दोघांनी कधी लग्न केलं हे कळू शकलेलं नाही. हे कुटुंब मिलिटरी अॅकॅडमीच्या वसतिगृहात रहात होते. सध्या त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे लोक गुंगीचे औषध देऊन लोकांना बेशुद्ध करत असतं. नतालिया खूपच संतप्त स्त्री असल्याचं शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या