रशियाच्या लसीवर अमेरिकेला संशय, हिंदुस्थानासह इतर देशांचाही सावध पवित्रा

883

कोरोना विषाणूवर मात करणारी पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी केला आहे. मात्र अमेरिकेसह अन्य काही देशांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानातील तज्ज्ञांनीही या लसीची चाचणी आणि त्याचे परिणाम-दुष्परिणाम तपासणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी या लसीबाबत बोलताना म्हटले की या लसीच्या सुरक्षिततेसोबत त्याच्या दुष्परिणामांबाबतही तपासणी करणं गरजेचं आहेय या लसीच्या उपयुक्ततेबाबत जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि जर्मनीने आधीच संशय व्यक्त केला आहे. रशियाने या लसीसंदर्भातील माहिती अजूनही सार्वजनिक केलेली नाही. अनेक देश कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लस तयार करण्याचा प्रयत्न करून हिंदुस्थानातही त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानात लसीची चाचणी मानवावर प्रयोग करण्याच्या पायरीपर्यंत पोहोचलेली आहे.

russian-vaccine

कोरोनाचे जगभरात आतापर्यंत 2 कोटी रुग्ण सापडले असून साडेसात लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. रशियाने तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी 20 देशांनी उत्सुकता दाखवली असून यामध्ये हिंदुस्थानचाही समावेश आहे. रशिया या लसीचे 20 कोटी डोस बनवण्याच्या तयारीत असून यातले 3 कोटी डोस हे रशियातील लोकांसाठी असतील असं सांगण्यात आलं आहे.

trial-on-man-russian-vaccin

रशियाने केलेल्या घोषणेनंतर अमेरिकेतील साथरोग आजाराचे तज्ज्ञ अँथनी फाऊची यांनी ही लस कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी ठरेल, याबाबत त्यांना शंका असल्याचं म्हटलं आहे. लस बनविणे आणि ती सुरक्षित तसेच प्रभावी असल्याचे सिद्ध करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे ते म्हणाले. रशियाने कोरोना वरील लसीसंदर्भातील नियामकांकडून मंजुरी मिळवल्याचं सांगितलं आहे. त्यानंतरच ही घोषणा केल्याचंही त्यांनी सांगितलंय. राष्ट्रपती पुतिन यांनी लसीबाबत बोलताना सांगितले की ही लस प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली होती आणि या लसीमुळे कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी शरिरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. पुतिन यांच्या घोषणेनंतर फाऊची यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

corona-virus-new-2-aug-2020

पुतिन यांनी ज्या लसीची घोषणा केली आहे, त्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाहीये. ज्यामुळेच जगभरातील तज्ज्ञांनी या लसीबाबत साशंकता व्यक्त केली असल्याचं फाऊची यांनी म्हटलं आहे. फाऊची यांनी म्हटलंय की या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरची लस सापडेल. असं असलं तरी सुरक्षित आणि प्रभावी लसीची हमी कधीही दिली जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले. अन्न आणि औषध विभागाचे माजी आयुक्त स्कॉट गॉटलिब यांनीही फाऊची यांचे समर्थन करताना म्हटले आहे की रशियाने या महामारीच्या काळामध्ये अनेक भ्रामक गोष्टी पसरवल्या आहेत. गॉटलिब यांनी म्हटलंय की रशियाने पहिल्या टप्प्यातील माहिती आधारावरच या लसीला मंजुरी देऊन टाकली आहे. हे सगळं अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या