
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक भूमिका घेत युक्रेनची थेट फाळणीच केली आहे. युक्रेनच्या पूर्व भागातील डॉनेत्सक आणि लुहान्सक या दोन बंडखोर प्रांतांची स्वतंत्र देश म्हणून घोषणा करताना पुतीन यांनी करारावर स्वाक्षरी केली. रशियाच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली असून, त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. कच्च्या तेलाच्या पिंमती शंभर डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेल्या आहेत. नैसर्गिक वायूचेही दर भडकले आहेत. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून, कोणत्याही क्षणी रशियाकडून हल्ला होईल, अशी शक्यता आहे. हे युद्ध टाळावे यासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांनी प्रयत्न सुरू केले. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी अनेकांनी चर्चा केली. अमेरिकेने दबावतंत्र अवलंबिले. मात्र, या दबावाला बळी न पडता राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी धक्कादायक पाऊल उचलले. उच्चपदस्थ अधिकारी आणि बंडखोरांबरोबर चर्चा केली आणि युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देताना करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर हिंदुस्थानी वेळेप्रमाणे सोमवारी मध्यरात्री राष्ट्रपती पुतीन यांनी रशियन जनतेला संबोधित केले. पुतीन यांनी एक तास भाषण केले.
तेल 100 डॉलर्सजवळ
रशिया-युक्रेनमधील तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रतिबॅरल 95 ते 99 डॉलर्स झाले असून, लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार हे निश्चित.
ब्रिटनकडून पाच रशियन बँकांवर निर्बंध
जगभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाच रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. तसेच रशियाच्या तीन अब्जाधीशांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी केली आहे. हे अब्जाधीश राष्ट्रपती पुतीन यांचे निकटवर्तीय आहे.
जर्मनीनेही कठोर पाऊले उचलत रशियाबरोबरची नॉर्ड स्ट्रीम-2 ही पाईपलाईन योजना रद्द केल्याची घोषणा केली. दरम्यान, अमेरिकेनेही रशियाला शिक्षा केली जाईल, असा इशारा दिला आहे.
रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देतानाच पंतप्रधान जॉन्सन यांनी ब्रिटनच्या नागरिकांनी युद्धासाठी सज्ज राहावे, असे सांगितले.
जगभर शेअरबाजार कोसळला
मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची पडझड 1300 अंकांनी सुरू झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 382 अंकांनी कोसळून 57300 वर स्थिरावला. निफ्टीचाही अंक 114ने कोसळून 17092 वर बंद झाला.
अमेरिका, जर्मनी, रशियातही शेअर बाजारात पडझड झाली. आशियामध्ये टोकियो, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, शांघाय शेअर बाजारात सेन्सेक्स कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदार हादरले आहेत.
हिंदुस्थानने व्यक्त केली चिंता
रशिया-युक्रेन सीमेवर वाढणारा तणाव ही आमच्यासाठी चिंतेची बाब असून, या घडामोडींमुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा बिघडू शकते, अशी भूमिका हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडली आहे. संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी ट़ी एस. तिरुमूर्ती म्हणाले, सीमेवर लष्कर वाढविणे हे योग्य नाही. ही परिस्थिती संयमाने आणि संवादातून हाताळली पाहिजे. 20 हजारांवर हिंदुस्थानी विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये आहेत. त्यांना तेथे सुरक्षित ठेवणे आणि तेथून बाहेर काढणे याला आमचे प्राधान्य आहे.