Video – उड्या मारायचा किल्ला फुटून 25 फूट हवेत उडाला, 2 मुली गंभीररित्या जखमी

रशियामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लहान मुलांसाठी उड्या मारायच्या किल्ल्याचा स्फोट झाला आणि हा किल्ला 25 फूट हवेत उडाला. या अपघातात 2 लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रशियातील बरनॉल शहरात लहान मुलांना उड्या मारण्यासाठीचा एक किल्ला होता. त्यात लहान मुलं उड्या मारत खेळत होती. पण अचानक या किल्याचा स्फोट झाला आणि हा किल्ला 25 फूट हवेत उडाला. या किल्ल्यात दोन लहान मुली खेळत होत्या आणि त्याही हवेत उडाल्या होत्या. यातील एक मुलगी लोखंडी गजावर तर दुसरी मुलगी ट्राम रेल्वेच्या रुळावर आदळल्याने गंभीररित्या जखमी झाली आहे. ऍना आणि विका अशी दोघींची नावे आहेत. ऍना तीन वर्षाची असून तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसरी मुलगी विका चार वर्षाची असून स्फोटामुळे ती 15 फूट दूरवर फेकली गेली. तिच्या डोक्याला आणि पोटाला जबर  मार लागला आहे. दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघींची प्रकृती गंभीर आहे.

हा स्फोट झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्या किल्ल्याकडे धाव घेतली. या किल्ल्यात कोणी लहान मुले अडकली नाही ना, याची खातरजमा या नागरिकांनी केली. सुदैवाने यात कुठलेही लहान मूल अडकले नव्हते. या भागात वेगाने वारे वाहत असल्याने हा स्फोट झाला असे सुरूवातील सांगितले जात होते. पण प्रत्यक्षदर्शींनी ही बाब खरी नसल्याचे म्हटले आहे. या किल्ल्यामध्ये प्रमाणापेक्षा हवा भरण्यात आली होती, त्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर हा किल्ला लोखंडी गजाला बांधण्यात आला होता. या बाबत कुठलीच सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या असाही आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या किल्ल्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या