
युद्धाच्या दुसऱयाच दिवशी रशियन फौजा युक्रेनची राजधानी क्यीवमध्ये धडकल्या असून, चेर्नोबिल अणुप्रकल्पासह लष्करी आणि सरकारी इमारतींवर ताबा मिळविला आहे. क्षेपणास्त्रे आणि बॉम्बहल्ल्यांमुळे अनेक घरे, अपार्टमेंट जमीनदोस्त झाली. यामुळे युक्रेनमधील जनता प्रचंड भयभीत झाली आहे. सर्वत्र अफरातफरी माजली आहे. आतापर्यंत किमान 137 नागरिकांचा मृत्यू तर 300 वर जखमी झाले आहेत. दरम्यान, बलाढय़ रशियापुढे युक्रेनचा निभाव लागणार नाही. लवकरच रशिया पूर्णपणे युक्रेनवर ताबा मिळवून सध्याचे सरकार उलथून टाकेल असा अंदाज आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनविरूद्ध युद्ध पुकारले आणि 24 तासांत राजधानी क्यीववर धडक दिली. क्यीववर हवाई हल्ले करतानाच रशियन लष्कराच्या तुकडय़ाही घुसल्या. भयंकर क्षेपणास्त्रे, बॉम्बहल्ले आणि रणगाडय़ांतून तोफांचा मारा सुरू केला. सुरूवातीला युक्रेनचा चेर्नोबिल अणुप्रकल्प ताब्यात घेतला. अनेक निवासी इमारती कोसळल्या. त्यामुळे युक्रेनचे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.
रशिया 96 तासांत पूर्ण ताबा मिळवू शकते
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की हे रशिया विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी 96 तासांचा प्लॅन तयार केल्याचे वृत्त आहे. युक्रेन आम्हाला ताब्यात घ्यायचे नाही असे पुतीन यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, युक्रेनची सध्याची सत्ता उलथून रशिया समर्थक सरकार पुतीन यांना युक्रेनमध्ये आणायचे आहे. त्यामुळे सरकारी आणि लष्करी इमारती, विमानतळे रशियन फौजांकडून ताब्यात घेतले जात आहेत.
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात रेडिएशन वाढले
रशियाने हल्ला करून चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला. मात्र, हल्ल्यांमुळे या प्रकल्पातील रेडिएशनची पातळी वाढली आहे. यामुळे प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱया हजारो नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
युक्रेन म्हणते चर्चेस तयार; रशियाने सांगितले आधी शरण या
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपण चर्चेसाठी तयार आहोत. त्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना आमंत्रण देत आहोत. मात्र, आम्हाला सुरक्षेची हमी द्यायला हवी असे म्हटले आहे. मात्र, यावर रशियाने अट ठेवली आहे. युक्रेनने आधी शरण यावे मगच चर्चा होईल असे म्हटले आहे.
मी राजधानीतच; पळून जाणार नाही – राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की
रशियन सैन्य माझ्यासाठीच येत आहे. रशियाचे नंबर वन टार्गेट मी आहे आणि नंबर दोन टार्गेट माझे कुटुंब आहे. पण मी राजधानीतच आहे. मी पळून जाणार नाही. माझे कुटुंबही युक्रेनमध्ये आहे असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युद्धाची झळ; दावे–प्रतिदावे
युक्रेन सैन्याचे 18 रणगाडे, 7 रॉकेट सिस्टम, 41 मोटार वाहने उद्धवस्त केली. युक्रेनच्या 150 सैनिकांनी शरणागती पत्करली असा दावा रशियन लष्कराने रात्री उशिरा केला आहे.
युक्रेनच्या दाव्यानुसार 137 जणांचा मृत्यू झाला. त्यात काही सैनिकही होते. 300 हून अधिक जखमी आहेत. प्रत्युत्तरात रशियाचे 800 सैनिक मारले. 30 रणगाडे 13 विमाने उद्ध्वस्त केली.