डोनाल्ड ट्रम्प प्रतिभासंपन्न, जो बायडन यांच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत – व्लादिमीर पुतीन

रशियाचे राष्ट्रपती व्हादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून आपल्याला फारशा अपेक्षा नसल्याचे सांगितले. पुतीन यांनी ट्रम्प यांचे कौतुक करत बायडन यांच्यावर उपरोधिक टीका केल्याने याची चर्चा होत आहे.

एका मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे असाधारण व्यक्ती असून ते प्रतिभासंपन्न आहेत, असे पुतीन म्हणाले. आपल्या कौशल्याच्या बळावरच ते अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचले होते, असे त्यांनी सांगितले. अनेकजणांना ते आवडत नाहीत. त्यांचे विचार सगळ्यांनाच पटतील असे नाही. त्यांचे प्रशंसक आहेत, त्याप्रमाणे विरोधकही आहेत. असे असले तरी त्यांच्या व्यक्तीमत्त्वात अनेक गुण आहेत.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते अध्यक्षपदापर्यंत पोहचले. यातूनच त्यांचे कर्तृत्व दिसून येते, असे पुतीन यांनी सांगितले. मात्र, सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून आपल्याला फारशा अपेक्षा नसल्याचे सांगत पुतीन यांनी बायडन यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्रम्प आणि बायडन यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे ट्रम्प यांनी विविध क्षेत्रात नाव कमावले आहे. तर बायडन फक्त राजकारणातच आहेत. ते करियर मॅन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत, असे पुतीन यांनी सांगितले.

बायडन शांत स्वभावाचे असले तरी त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे काही फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदी असल्याने कर्तबगारी दाखवतील, काही धडाडीचे करतील, असे आपल्याला वाटत नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांचे रशियातही प्रंशसक आहेत. तसेच ते रशियात लोकप्रिय आहेत, अशी चर्चा अमेरिकेत होती. त्यामुळेच पुतीन यांनी त्याचे कौतुक केल्याची चर्चा आहे.

बायडन यांनी पदभार स्विकारल्यानंतर अमेरिका आणि रशियातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिका रशियावर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करत आहे. तसेच रशियाने अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. पुतीन आणि बायडन यांची 16 जूनला जिनेवात भेट होण्याची शक्यता आहे. त्याआधी पुतीन यांनी बायडन यांच्यावर टीका केल्याने याला महत्त्व आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या