रशियात जनक्षोभ; लाखो लोक रस्त्यावर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात नवेलनी समर्थकांचा उठाव

रशियात राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ जवळपास 100 शहरांमध्ये त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी उणे 50 अंश तापमानात उठाव करण्यात आला. पोलिसांनी नवेलनी यांच्या पत्नीसह 3400हून अधिक आंदोलकांना अटक केली आहे. नवेलनी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

44 वर्षांचे नवेलनी हे नुकतेच रशियात दाखल झाले. त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली. या कारवाईवरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी मॉस्को, सायबेरिया, सेंट पिटर्सबर्ग येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले. रॉयट पोलिसांनी आंदोलकांना बस व ट्रकमधून बाहेर खेचून त्यांची दांडय़ाने पिटाई केली. तसेच त्यांना फरफटत नेत पोलीस गाडीमध्ये कोंबले. पोलिसांच्या दंडुकेशाहीला प्रत्युत्तर देत जमावाने बर्फाचे गोळे, पाण्याच्या बाटल्या व अंडी फेकली. जमावाच्या हल्ल्यात 39 पोलीस अधिकारी जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईचा अमेरिका आणि युरोपिय संघाने निषेध केला आहे. तसेच जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली या देशांनीही नवेलनी यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

एलेक्सी नवेलनी कोण आहेत?

नवेलनी हे भ्रष्टाचाराविरोधात लढणारे नेते आहेत. ते 2018मध्ये पुतिन यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार होते. परंतु त्यांना एका गुह्यात दोषी ठरवले गेले. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत. पाच महिन्यांपूर्वी ते जर्मनीला गेले होते. रस्त्यात त्यांना कुणीतरी चहामध्ये विष दिले होते. या विषप्रयोगाचा आरोप पुतिन यांच्यावरच झाला होता.

जगातील तीन मोठय़ा देशांच्या प्रमुखांविरोधात जनतेने उठाव केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिथावणीखोर वक्तव्य महागात पडले. हिंदुस्थानात कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱयांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. त्यापाठोपाठ रशियात पुतिन यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या