व्लादमिर पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या गायकाचा संशयास्पद मृत्यू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांच्यावर त्याच्या गाण्यातून टीका करणाऱ्या एका गायकाचा मृत्यू झाला आहे. बर्फाळ नदी पार करत असताना त्या नदीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. डीमा नोवा असे त्या गायकाचे नाव असून तो 35 वर्षांचा होता. डिमा हा प्रसिद्ध बँड क्रिम सोडाचा मुख्य सदस्य होता.

19 मार्चला नोवा हा त्याचा भाऊ व तीन मित्रांसह वोल्गा नदी पार करत होता. तापमान शून्य अंशापेक्षा खाली गेल्याने ही नदी गोठलेली होती. अचाक नोवा व त्याचे दोन मित्र नदीत पडले. त्या तिघांनाही बचाव पथकाने तेथून बाहेर काढले. मात्र नोवाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियातून देखील या युद्धाला विरोध झाला होता. त्यावेळी नोवाने देखील या युद्धावर व राष्ट्राध्यक्षांवर टीका करणारी गाणी तयार केली होती. त्याचे अॅक्वा डिस्को हे गाणे त्यावेळी खूप गाजलेले. ते गाणे रशियन सरकार विरोधातील प्रत्येत आंदोलनात वाजवले जात होते. त्या गाण्यात नोवाने पुतिन यांच्या 1.3 दशलक्ष डॉलर्स खर्च करून तयार केलेल्या बंगल्यावर सडकून टीका केली आहे.