रशियात कोरोनाचा कहर, एका दिवसात पहिल्यांदाच हजारांहून अधिक मृत्यूची नोंद

हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात असला तरी रशियामध्ये मात्र कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. शनिवारी रशियामध्ये एक हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. कोरोना महामारीमध्ये रशियात पहिल्यांदाच एक हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

रशियामध्ये कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा वाढायला लागले आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे विक्रमी 33 हजार 208 कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 1002 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा 2 लाख 22 हजार 315 झाला आहे.

युरोपमध्ये कोरोनाच सर्वाधिक कहर रशियामध्ये दिसत आहे. रशियात आतापर्यंक कोरोनाचे 79 लाख रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही रशियात सर्वाधिक आहे. तसेच जगात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या असणाऱ्या देशांमध्ये रशियाचा पाचवा क्रमांक लागत आहे. रशियाचे लोक कोरोना प्रतिबंधक लस घेत नसल्यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचा आरोप राष्ट्रपती कार्यालयाने लावला आहे.

रुग्णसंख्या 24 कोटींवर

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आतापर्यंत 24 कोटी लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे, तर 48.8 लाख लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तसेच या जीवघेण्या आजारातून वाचण्यासाठी लसीकरणही वेगात सुरू असून आतापर्यंत 6.58 अब्ज लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.