निर्दयी बापाने दिले ३ वर्षांच्या मुलाला चटके, शरीरावर चावा घेतल्याच्याही खुणा

58

सामना प्रतिनिधी । नागपूर

एका निर्दयी बापाने आपल्या ३ वर्षाच्या मुलाला कासव छाप अगरबत्तीचे चटके देऊन त्याला मरण यातना दिल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आज उघडकीस आली. या निदर्यी बापाने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला चक्क चटके दिले, एवढेच नव्हे तर त्या चिमुकल्याच्या शरीरावर पाच ठिकाणी चावाही घेतल्याचे व्रण त्या निष्पाप जिवाच्या अंगावर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पायल बांगर हि महिला मूळची यवतमाळ येथील रहिवासी आहे. पहिल्या पतींकडून तिला एक ३ वर्षीय मुलगा आहे. एक वर्षापूर्वी नवऱ्याने फारकत दिली म्हणून लहान मुलाला सहारा मिळावा यासाठी पायलने दुसरे लग्न केले. चेतन ढोक असे त्याच्या दुसऱ्या पतीचे नाव असून लग्न करतांना चेतनने पायलच्या आदित्य नावाच्या मुलाचा सांभाळ करण्याच्या शपथही घेतली. लग्नानंतर काम शोधण्यासाठी चेतन पत्नी आणि आदित्यला घेऊन शेगावात पोहचला आणि तेथे एका हॉटेलवर वेटर म्हणून कामाला लागला. मात्र लग्न होताच चेतनने आपले असली रूप दाखवयास सुरुवात केली.

पती पत्नीच्या नात्यात ३ वर्षाचा सावत्र मुलगा चेतन ढोक या नराधमाला काटा वाटायला लागला. त्यामुळे चेतन दररोज कुठल्याही कारणाने आदित्यला मारहाण करीत असे. या निर्दयी सावत्र बापाने तीन वर्षीय चिमुकल्यास डासांच्या पेटत्या अगरबत्तीने चटके आणि अंगावर जनावरांसारखा चावा घेतला. हा निर्दयी बाप एवढ्यावरच न थांबता या क्रूर बापाने डोळा आणि कान फुटेल एवढी मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार दररोज सुरु असायचा. दररोज बालकाचे किंचाळणे आणि हृदय हेलावेल असे रडण्यावर सुदामा नगरातील शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी घरात कोंडून ठेवलेल्या या बालकाबद्दल बाल संरक्षण अधिकाऱ्यांना फोन करून सर्व माहिती सांगितली.

माहिती मिळताच बाल संरक्षण अधिकारी अविनाश चव्हाण व त्यांच्या पथकाने शेगाव गाठून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.डी. ढाकणे व शेजारी यांना सोबत घेऊन ढोक याच्या घरात पोहचले असता घरात आदित्य त्यांना घाबरलेला दिसला. पोलीस आणि इतर नागरिक पाहताच चिमुकल्या आदित्यने पोलिसांना मिठी मारली. आदित्यच्या अंगावर मोठ मोठया जखमा पाहून खंबीरपणे तपास करणारे पोलिसही शेगावातील या निदर्यी बापाचा प्रकार पाहून हादरून गेले, उपस्थितांसह त्यांच्याही डोळयात पाणी आले.

आदित्यने पोलिसांना पाहून ‘मला घेऊन चला अशी आर्त हाक देताच’ सर्वांचेच मन हेलावले. पोलिसांनी आई पायल आणि आदित्यला पोलीस स्टेशनमध्ये आणून विचारपूस केली असता चेतन हा दारू पिऊन कुठल्याही कारणाने आपल्यासह आपल्या मुलाला मारायचा असे तिने सांगितले. पोलिसांनी बालकाचे वैद्यकीय तपासणी केली असून कपाळापासून तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल ४७ खुणा आढळल्या, तर चावा घेतल्याच्या शरीरावर ५ खुणा दिसून आल्या. पोलिसांनी सदर बालकाला आईच्या संमतीने बालसुधार गृहात पाठविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या