भरधाव वेगातील एस.टी. बसने वृध्दास चिरडले; लातूर बसस्थानकातील घटना

57

सामना प्रतिनिधी । लातूर

भरधाव वेगातील एस.टी.बसने वृध्दास चिरडल्याची घटना लातूर मध्यवर्ती बसस्थानकात घडली. यामध्ये वृध्दाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी एस.टी.बसच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अनुभव नरहरी श्रीखंडे रा. सर्वोदय कॉलनी, प्रकाश नगर, लातूर याने गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उदगीर येथून त्याचे आजोबा लक्ष्मण एकनाथ पाचंगे ( वय ६९ ) हे लातूर येथे आले होते. सणासाठी गावी जातो म्हणून ६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना अनुभव याने मोटारसायकलवरुन मध्यवर्ती बस स्थानकात आणले होते. उदगीर येथे जाण्यासाठी ते बसस्थानकात थांबले होते. त्याचवेळी एम.एच.२० बीएल १३११ क्रमांकाच्या उदगीर लातूर बसच्या चालकाने भरधाव वेगात गाडी आगारात आणली आणि एस.टी.ची वाट पाहात थांबलेल्या लक्ष्मण एकनाथ पाचंगे यांना धडक दिली. एस.टी.चे समोरील चाक व पाठीमागील चाक त्यांच्या कमरेवरुन गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात एस.टी.च्या चालकाविरुध्द ७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या