मुंबईच्या ‘साद माऊंटेनियर्स’ची लडाखच्या कांग यात्से-2 शिखरावर यशस्वी चढाई

246

मुंबईच्या साद माऊंटेनियर्स गिर्यारोहण पथकाने लडाखचे कांग यात्से-2 हे 20 हजार 500 फूट उंचीचे हिमशिखर सर करण्याचा पराक्रम साकारला. बदलापूर, ठाणे येथील गिर्यारोहक अरुण त्रिमुखे (26) यांनी सादच्या 12 सदस्यीय पथकाचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे पथकासोबत वैद्यकीय अधिकारी म्हणून गेलेले पर्वतीय औषधतज्ञ डॉ. रघुनाथ गोडबोले यांनीही 18 हजार फूट उंचीपर्यंत शिखर सर करणाऱ्या पाच गिर्यारोहकांना साथ दिली. या पथकात मुंबईसह ठाणे, राजकोट, अहमदाबाद येथील गिर्यारोहकांचा सहभाग होता. यातील 12 गिर्यारोहकांत वैद्य, दंतचिकित्सक आणि फिजिओथेरपिस्ट अशा मान्यवरांचा समावेश होता.

14 सप्टेंबरला उगवत्या सूर्याच्या साथीने सादच्या पाच गिर्यारोहकांनी कांग यात्से-2 शिखराला गवसणी घालत मराठी जनतेसह गुजरातच्या साहसी क्रीडाप्रेमींना अभिमान वाटावा अशी कामगिरी साकारली. हिमशिखर सर करणाऱ्या पथकात कृतिका तांडेल या चुनाभट्टीकर महिला गिर्यारोहकही होत्या.  या कॅम्पपर्यंत पथकातील 12 गिर्यारोहकांनी चढाईत भाग घेतला होता. त्यात सेवानिवृत्त अतिरिक्त विक्रीकर अधिकारी रवींद्र वानखेडे (76), सिद्धार्थ डे (28), राजन देशमुख (62), डॉ. श्रुती पाटील, डॉ. भारत कलारिया (राजकोट)आणि डॉ. योगेश (राजकोट) यांचाही समावेश होता.

पाच जणांचे यश

सादच्या 12 पैकी 5 गिर्यारोहकांनी लडाखच्या कांग यात्सेवर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम केला. त्यात अरुण त्रिमुखे (बदलापूर, ठाणे), कृतिका तांडेल (चुनाभट्टी, मुंबई), शशिकांत भोईर (कळवा, ठाणे), डॉ. जयेश पटेल (राजकोट) आणि  डॉ. अमित सीतापारा (राजकोट) यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या