।।श्री साईगाथा।। भाग ५ – जाता कहाँ है?

  • विवेक दिगंबर वैद्य 

नाना चोपदारांच्या आईला भक्तिभावाने आकर्षित करणारे ते गोरेगोमटे सुंदरसे लाघवी पोर, पाहावे तेव्हा गुरुस्थानी बसलेले असे. लहर आली तर बाहेर हिंडावे, कुणी अगत्याने दिले तर खावे, अन्यथा सद्गुरू-चिंतनात निमग्न रहावे असा त्याचा दिनक्रम होता.

नाही म्हणायला, काही काळानंतर त्या पोराने एक नवीनच खेळ आरंभला. एकेदिवशी त्याने कुठूनशी फुलझाडांची रोपे आणली आणि तिथल्याच एका मोकळ्या जागेवर पाणी शिंपडून फुलझाडे लावली. वामनतात्याला त्या लाघवी पोराविषयी अपार माया होती, त्यायोगे तोसुद्धा मातीचे घडे भरून पाणी आणत असे आणि झाडांवर शिंपडत असे. पाहता पाहता ‘झाडे’ तग धरू लागली आणि काही दिवसांतच बाळसं धरून मोठीही झाली. त्या नापीक, खडकाळ जमिनीवर या पोरसवद्या योगियाने छानशी बाग उठवली, मात्र शिर्डीवासीयांना त्याची जाणीव होण्याच्या आधीच, एकाएकी कुणासही न सांगता-सवरता ते पोर दिसेनासे झाले.

त्या पोराचे एकाएकी निघून जाणे शिर्डीतील कित्येकांना जाणवले नाही ना कुणी त्याचा शोध घेतला. याचे कारण शिर्डी हे गाव आडवळणी आणि छोटेखानी असले तरीही त्या पोराची दखल घेण्याची तसदी गावातील काही मोजक्याच मंडळींनी घेतली होती. त्या सर्वांनाच त्या पोराचे निघून जाणे खटकले होते. वामनतात्या निगुतीने झाडांना पाणी घालीत होते, नाना चोपदाराची आई त्याच्या आठवणीने व्याकूळ झाली होती. एरव्ही दुर्लक्षित असलेल्या त्या पोराचा तिथला निरूपद्रवी वावर काही सद्भाविकांना मात्र चांगलाच जाणवू लागला. अनेकदा ही मंडळी निंबवृक्षाकडे जात असत, वेड्या आशेने त्या पोराची वाट पाहात असत. ‘अवतीभवती पंचक्रोशीत त्याचे जाणे झाले असावे, कालांतराने त्याचे परतणे होईल’ अशी त्यांची भाबडी धारणा होती, मात्र त्यांच्या आशेला पालवी फुटली नाही.

शिर्डी हे खरे तर आडवळणी गाव, गोदावरीच्या तीरावर वसलेलं, मोजक्याच घरांचं, शांत आणि थोडेसे दुर्लक्षितदेखील. गोदावरीच्या काठी वसलेल्या गावांना अनेक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ सत्पुरुषांचा सहवास लाभला होता. गोदावरीचे पाणी सकल पातकांचा नाश करणारे असून या जलतीर्थाचे प्राशन केले असता तसेच येथे स्नानादी कर्मे केली असता संसारदुःखाचे निवारण होते असे पुराणांचे वचन आहे.

गोदावरी, नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून (सध्याच्या राहता तालुक्यातून) वाहते. गोदावरीचे पात्र ओलांडल्यावर पलीकडच्या काठाहून सुमारे तीन कोसावर (अंदाजे सहा मैल) निमगावच्या सान्निध्यात शिर्डी हे गाव वसलेले आहे. गोदावरी सान्निध्यात गोणाई (गोमाई), नामदेव, सजनकसाई, सावतामाळी, नरसीमेहता, तुकाराम, निवृत्तीनाथ, जनाबाई, मुक्ताबाई, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर ही आणि अशी अनेक दिग्गज संतमंडळी नांदती झाली, आपल्या अस्तित्वयोगाने या भूमीस पावन करती झाली. त्याच गोदातीरावर वसलेल्या शिर्डीस येत्या काळामध्ये योगेश्वर श्रीसाईनाथांचा स्पर्श झाला आणि गोदावरीचे महत्त्व आणखीनच झळाळून उठले. दरम्यान बराच काळ लोटला. विस्मृतीच्या योगाने शिर्डीवासीयांमधील त्या पोरसवद्या साधूची आठवणही पुसट होत गेली. मात्र त्याच वेळी संभाजीनगरच्या धूप खेड्यामध्ये एका वेगळ्याच घटनेची, शुभशकुनाची चाहूल जन्म घेती झाली होती.

धूप खेड्यातील चांद पाटील प्रवासाच्या हेतूने निघाला असता, त्याची घोडी हरवली. दोन महिने पावेतो चांद पाटलाने शोध घेतला मात्र घोडीचा काहीएक पत्ता लागला नाही. पाटील निराश झाला, हताश झाला. अखेरीस हळहळत्या मनाने त्याने खोगीर पाठीशी मारले आणि तो परतीच्या वाटेने माघारी निघाला. संभाजीनगरास साडेचार कोस अंतराने मागे टाकून पुढे निघालेल्या चांद पाटलाच्या कानी एकाएकी कुणाचा तरी हाकारा आला “जाता कहाँ है? इधर आ!!!’’
चांद पाटलाने मागे वळून पाहिले तो एक धडधाकट तेजस्वी फकीर मंद स्मित करीत त्याच्याकडे पाहात उभा होता.

आपली प्रतिक्रिया द्या