सामना अग्रलेख – भुकेला भस्मासुर!

8837

जगातील कुठल्याही देशाला न जुमानता चीनचा विस्तारवादी राक्षस आपल्या सीमेला लागून असलेल्या देशांचे लचके तोडत सुटला आहे. एकीकडे साम्यवादाची जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे सीमांचा विस्तार करत साम्राज्यवादी नखे बाहेर काढायची, असे चीनचे दुतोंडी धोरण आहे. आता ताजिकिस्तानच्या पामीर भूप्रदेशावर चीनने दावा ठोकला आहे. चीनचा हा भुकेला भस्मासुर भविष्यात जगासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. जगभरातील तमाम देशांनी एकत्र येऊन चीनला वठणीवर आणणे हाच त्यावर उपाय आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला पिछाडीवर टाकून चीनला एक निरंकुश महासत्ता बनवण्याचे दिवास्वप्न चिनी राज्यकर्ते सध्या बघत आहेत. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी चीनने केली आहे. वाटेल ती किंमत मोजून चीनचा भौगोलिक विस्तार करण्याचे जे धोरण चिनी राज्यकर्त्यांनी स्वीकारले आहे त्यामागे महासत्ता बनण्याची घाई हेच एकमेव कारण आहे. लागोपाठ समोर येणाऱया घटना, घडामोडी पाहता चीनला इतर देशांचे भूभाग बळकावण्याची राक्षसी भूक लागल्याचे दिसते. हिंदुस्थानात लडाखलगतच्या गलवान खोऱयात बळजबरीने घुसखोरी केल्यानंतर चीनने आपला मोर्चा आता मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशाकडे वळवला आहे. आपल्या सीमेवर जशी सैन्याची मोठी जमवाजमव चीनने केली तशी आगळीक ताजिकिस्तानवर अद्याप केलेली नाही. तथापि ताजिकिस्तानच्या संपूर्ण पामीर पहाड रांगांवर चीनने दावा ठोकला आहे. ‘पामीर’ची पहाडे हा चीनचाच भूभाग असून ताजिकिस्तानने तो चीनला परत करावा, अशी मागणी चीनने केली आहे. चीनच्या तुलनेत ताजिकिस्तान हा तसा खूपच गरीब देश. आक्रमक चीनच्या या मागणीमुळे ताजिकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जगातील सोन्याच्या एकूण खाणींपैकी

एकटय़ा ताजिकिस्तानमध्ये

तब्बल 145 खाणी आहेत. या खाणींचा विकास करण्याचे, खाणी खोदण्याचे कंत्राट चिनी कंपन्यांकडेच आहे. त्यामुळेच 128 वर्षांपूर्वी चीनपासून तुटलेल्या ‘पामीर’च्या भूभागावर चीन राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी पडली असावी. चीनची तमाम सरकारी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील भूमिका ज्या सरकारी मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होतात, त्याद्वारेच चीनने ‘पामीर’च्या पर्वतराजींवर आपला हक्क सांगितला आहे. यासंदर्भात चीनच्या सरकारी मीडियाने एका इतिहासकाराचा लेख प्रसिद्ध करून संपूर्ण पामीर क्षेत्र चीनच्याच मालकीचे असल्याचे व हा भूप्रदेश कुठल्याही परिस्थितीत चीनने आपल्या ताब्यात घेतलाच पाहिजे, असे नमूद केले आहे. या दाव्याच्या पुष्टीसाठी चीनमधील जुने संदर्भ व दाखल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक, चीनचा अनेक वर्षांपासूनच ‘पामीर’वर डोळा आहे. दहा वर्षांपूर्वी पामीरच्याच डोंगररांगांवरून चीन आणि ताजिकिस्तानमध्ये एक करार झाल़ा त्यानुसार इच्छा नसतानाही ताजिकिस्तानला पामीर क्षेत्रातील 1158 किलोमीटरचे क्षेत्र दबावाखाली चिन्यांना द्यावे लागले होते. आता तर राक्षसी ड्रगनने संपूर्णच पामीर मागितल्याने ताजिकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. रणनीतीच्या दृष्टीने रशियाही मध्य आशियातील देशांवर आपला दावा ठोकत असतो. चीनच्या

‘पामीर’वरील नव्या दाव्यामुळे

रशियाही आता चीनकडे संशयाच्या नजरेने बघणार हे ओघाने आलेच. जगातील कुठल्याही देशाला न जुमानता चीनचा विस्तारवादी राक्षस आपल्या सीमेला लागून असलेल्या देशांचे लचके तोडत सुटला आहे. एकीकडे साम्यवादाची जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे सीमांचा विस्तार करत साम्राज्यवादी नखे बाहेर काढायची, असे चीनचे दुतोंडी धोरण आहे. घुसखोरी करून शेजारी देशांचे भूप्रदेश गिळंकृत करण्याची चिन्यांची विकृती वाढतेच आहे. चीनच्या विद्यमान सीमा सध्या 14 देशांना लागून असल्या तरी जमिनी आणि समुद्री सीमांवरून केवळ हिंदुस्थानच नव्हे, तर तब्बल 27 देशांशी चीनचे वाद सुरू आहेत. चीनचा हव्यास किती राक्षसी आहे हेच यावरून सिद्ध होते. आता ताजिकिस्तानच्या पामीर भूप्रदेशावर चीनने दावा ठोकला आहे. चीनचा हा भुकेला भस्मासुर भविष्यात जगासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. जगभरातील तमाम देशांनी एकत्र येऊन चीनला वठणीवर आणणे हाच त्यावर उपाय आहे. कोरोनानंतर आधीच एकाकी पडलेला चीन जागतिक एकजुटीपुढे तग धरू शकणार नाही. सुमारे दीडशे कोटींची लोकसंख्या आणि प्रचंड क्षेत्रफळाचा भूप्रदेश या जोरावर जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न चीन बघत आहे. जागतिक समुदायाने वेळीच सावध होऊन एकत्रितपणे पावले टाकून चीनच्या स्वप्नांचा चक्काचूर करायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या