सामना अग्रलेख – अफवांचा ‘कोरोना’

4973
social-media

कोरोना हे एक गंभीर आणि मोठे आव्हान म्हणून देशासमोर उभे राहिले आहे. अशा वेळी सोशल मीडियाचा अविचारी आणि अनियंत्रित वापर घातक ठरू शकतो. `आली पोस्ट, केली फॉरवर्ड’ ही प्रवृत्ती मारक ठरू शकते. सोशल मीडिया जर केंद्र सरकार म्हणते त्याप्रमाणे `नियंत्रणाबाहेरील अडथळा’ ठरणार असेल तर कसे व्हायचे? महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने हा अडथळा नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले हे चांगलेच झाले. कोरोनाची साथ आटोक्यात येणारच आहे, पण अफवांचा `कोरोना’ कधी आणि कसा नियंत्रणात येणार हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पोलीस व सरकार आपल्या पद्धतीने शोधतीलच. मात्र समाजाचीही जबाबदारी तेवढीच आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. रस्त्यांवर अनावश्यक फिरणारे वाहनचालक, पादचारी यांच्याविरुद्ध देखील कारवाई केली जात आहे. त्यात आता सोशल मीडियावरून कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱयांची भर पडली आहे. राज्यात अशाप्रकारचे 51 गुन्हे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेतर्फे दाखल करण्यात आले आहेत. व्हॉट्स ऍप, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि फेसबूक वगैरेंच्या माध्यमातून कोरोनाबाबत खोटय़ा व चुकीची माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र त्यांची कसलीही शहानिशा न करता त्या जशा त्या तशा फॉरवर्ड केल्या जात आहेत. म्हणजे कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग ज्या वेगाने पसरतो त्याच्या कित्येक पटीने अफवांच्या विषाणूचा प्रसार होत आहे. यापूर्वीही अनेक संवेदनशील घटना आणि घडामोडींबाबत सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांचे घातक परिणाम देशाने अनुभवले आहेत. आता कोरोनासारख्या भयंकर साथीबाबतही दुर्दैवाने तेच घडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तरारून आलेल्या या अफवांच्या पिकांची छाटणी आवश्यकच होती. पोलिसांनी ती सुरू केली हे चांगलेच झाले. कोरोना रोखण्याच्या प्रयत्नांना अफवांचा अटकाव होणार असेल तर कसे व्हायचे? मुळात ही गोष्ट अफवांचा `वाहक’ (कॅरियर) असलेल्या समाजासाठीच घातक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. `चिकन खाल्ल्याने कोरोना होतो’ इथपासून `अमूक-तमूक खाल्ल्याने कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होत नाही’, इथपर्यंत हा

अफवांचा बाजार

पसरला आहे. त्यात सर्वसामान्य लोक जसे आहेत तसे `मोदींवर टीका केल्याची शिक्षा म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले’ अशा `इस्लामपुरी अफवा’ पसरविणारेदेखील आहेत. राज्याच्या सर्वच भागात अफवांचा बाजार फैलावला आहे. देशातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळेच केंद्र सरकारवर याबाबत सर्वोच्च न्यायालयात लेखी निवेदन करण्याची वेळ आली आहे. `कोरोना आटोक्यात आणण्यात खोटय़ा बातम्या, अफवा आणि त्यामुळे समाजात पसरणारी गंभीर भीती व दहशत हाच सर्वात मोठा आणि नियंत्रणाबाहेरील अडथळा आहे’, अशी कबुली केंद्र सरकारने दिली आहे. कोरोनासंदर्भात जो वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्राने आता सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे त्यात मुद्दाम किंवा अनावधानाने पसरविल्या जाणाऱ्या अफवांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारची ही चिंता सगळय़ांनीच समजून घेतली पाहिजे. समाजातील काही रिकामटेकडय़ा आणि अतिउत्साही मंडळींमुळे या खोटय़ानाटय़ा पोस्ट व्हायरल होतात. त्यामुळे लोकांमध्ये जशी घबराट निर्माण होते तसा कोरोना रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही कळत-नकळत धक्का पोहोचतोच. बुधवारच्या 1 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेला कारवाईचा इशाराही त्यामुळेच महत्त्वाचा ठरला. `एप्रिल फूल’च्या आडून सोशल मीडियावरून कोरोनाबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पसरणाऱ्या अफवांना आणि विनोदांना त्यामुळे आपोआपच आळा बसला. सोशल मीडिया हे शेवटी दुधारी शस्त्र आहे. त्याचा जसा सदुपयोग होऊ शकतो तसा दुरुपयोगही होऊ शकतो. कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य आजाराबाबत सोशल मीडियाचा दुरुपयोगच जास्त होणार असेल तर हे कोरोनाएवढेच धोकादायक आहे. या आजाराबाबतचे मेसेजेस, मिम्स आणि माहिती सुरुवातीला लोकांना गमतीची आणि कुतुहलाची वाटली हे खरे आहे. मात्र आता कोरोना हे एक गंभीर आणि मोठे आव्हान म्हणून देशासमोर उभे राहिले आहे. अशा वेळी सोशल मीडियाचा अविचारी आणि अनियंत्रित वापर घातक ठरू शकतो. `आली पोस्ट, केली फॉरवर्ड’ ही प्रवृत्ती मारक ठरू शकते. किंबहुना हे

दुष्परिणाम

कोरोनाएवढ्या वेगाने वाढू लागले आहेत. सोशल मीडिया जर केंद्र सरकार म्हणते त्याप्रमाणे `नियंत्रणाबाहेरील अडथळा’ ठरणार असेल तर कसे व्हायचे? महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने हा अडथळा नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले हे चांगलेच झाले. कोरोनाची साथ आटोक्यात येणारच आहे, पण अफवांचा `कोरोना’ कधी आणि कसा नियंत्रणात येणार हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर पोलीस व सरकार आपल्या पद्धतीने शोधतीलच. मात्र समाजाचीही जबाबदारी तेवढीच आहे. अफवांचा बाजार हा येथील सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी नेहमीच अनियंत्रित अडथळा ठरला आहे. तो आटोक्यात यायलाच हवा.

आपली प्रतिक्रिया द्या