सामना अग्रलेख – मुशायऱ्यांचा ‘शेर’ गेला!

4242

मानवी भावनांबरोबरच राहत इंदौरी यांनी बेरोजगारी, धार्मिक तणाव, राजकीय स्वार्थ, राजकारणातील दांभिकता, धर्माच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार यावरदेखील आपल्या शायरीतून अत्यंत परखड भाष्ये केली आहेत. सेक्युलर विचारांची पाठराखण भक्कमपणे करतानाच ‘हिंदुस्थानी’ असल्याचा गर्व बाळगणारे राहत इंदौरी म्हणूनच अवलिया ठरतात. स्वाभिमानाची गर्जना करणारा आणि मुशायऱयात वाघासारखा दहाडणारा राहत इंदौरी नावाचा ‘शेर’ आता कायमचा अबोल झाला आहे!

दो गज ही सही,
मगर मेरी मिल्कीयत तो हैं…
ऐ मौत, तुने मुझे
जमींदार कर दिया…

अशा शब्दांत साक्षात मृत्यूलाही ललकारणारे डॉ. राहत इंदौरी यांना मंगळवारी अचानक त्याच मृत्यूने कवेत घेतले. उर्दू दुनियेच्याअवकाशातील एक तेजस्वी तारा निखळला. हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने राहत यांना थोडीही ‘राहत’ दिली नाही. इंदौरमधील इस्पितळात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राहत इंदौरी हे शब्दांचे जादूगार होते. वाणी आणि लेखणी असे दुधारी शस्त्र बाळगणारा हा शायर म्हणजे मुशायऱ्यातील मैफलीचा प्राण होता. मुशायऱ्यात ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात असे त्यात राहत इंदौरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. शायरी पेश करण्यासाठी राहत यांनी उभे राहण्याचा अवकाश की, समोरून टाळ्यांचा कडकडाट होत असे. जे डोक्यात, तेच लेखणीत आणि तेच ओठात. कुठली लपवाछपवी नाही. हातचे राखून ठेवणे नाही. शायराना मैफलीची अदब राखत शब्दांचे अंगार फुलवणे याचे दुसरे नाव डॉ. राहत इंदौरी होते. बेबाक आणि निडरपणे ते आपली भूमिका शायरीतून मांडत राहिले. मानवी भावनांना मोहक शब्दसाज चढवितानाच प्रचंड ऊर्जा, जीवनाविषयीचे आत्यंतिक प्रेम आणि सद्यस्थितीतील घडामोडींवर

बेधडक भाष्य

करणे हे राहत इंदौरी यांचे वैशिष्टय़ होते. राज्यकर्त्यांचे विमान एका क्षणात जमिनीवर आणणारा असा शेर फक्त केवळ राहत इंदौरीच ऐकवू शकतात…

जो आज साहिब-ए-मसनद है,
कल नही होंगे…
किरायेदार है,
जाती मकान थोडी है…?

सत्ताधारी मंडळींना थेट ‘भाडेकरू’ ठरवून जनता हीच कशी देशाची खरी मालक आहे हे निक्षून सांगताना त्यांचा अंदाज कणखर आणि चेहरा उग्र होत असे.

‘हौसले जिंदगी के देखते है,
चलिए कुछ रोज जी के देखते हैं।’

असे लिहिणारे राहत इंदौरी जगण्याची नवी उमेद आणि आयुष्य जगण्याची सुंदरताच सांगतात. एक उत्कृष्ट चित्रकार, एक अद्वितीय शायर आणि तेवढाच चांगला माणूस म्हणून फक्त हिंदुस्थानातच नाही तर परदेशातदेखील राहतजी प्रचंड लोकप्रिय होते. शायरीची त्यांची स्वतःची एक लकब होती. मुशायऱयातील त्यांचे सादरीकरण आणि गझला पेश करण्याची शैली अलौकिकच होती.

उसकी कत्थई आखों में है
जंतर मंतर सब…
चाकू-वाकू, छुरियाँ-वुरियाँ, खंजर-वंजर सब..!

ही राहत इंदौरी यांची गझल तर गझलप्रेमींनी प्रचंड डोक्यावर घेतली. प्रत्येक मुशायऱयात या गझलची फर्माईश हमखास व्हायचीच. रंगात आलेले राहतही एखाद्या कसलेल्या अभिनेत्याला लाजवेल अशा बहारदार पद्धतीने ही गझल पेश करायचे. रसिकांची नाळ गवसलेला हा जनतेचा शायर होता. ही नाळ आज तुटली आहे. मित्र-चाहते आणि रसिकांमध्ये सतत रमलेला हा शायर उत्तम चित्रकार होता. इंदोर येथे चित्रपटांची पोस्टर्स रंगविण्याची कामे राहत यांनी केली. ‘कलार्थी’ हा स्टुडिओदेखील उघडला. मात्र त्यांची खरी ओळख राहिली ती शायर म्हणूनच. अनेक हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी लिहिली आणि ती गाजली. ‘सर’, ‘मिशन कश्मीर’, ‘मर्डर’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘खुद्दार’ अशा अनेक चित्रपटांत राहतभाईंची गीते आहेत. तरुणांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय होते. देश-परदेशांत त्यांचे लाखो चाहते आहेत. मानवी भावनांबरोबरच राहत इंदौरी यांनी बेरोजगारी, धार्मिक तणाव, राजकीय स्वार्थ, राजकारणातील दांभिकता, धर्माच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार यावरदेखील आपल्या शायरीतून अत्यंत

परखड भाष्ये

केली आहेत. त्यांच्या शायरीत एक वेगळीच चमक आणि ‘अकड’ दिसून येते. निवडणुकांच्या तोंडावर युद्धज्वर निर्माण करून भावनिक मुद्दय़ांवर निवडणुका जिंकण्याच्या किळसवाण्या राजकारणावर टीका करतानाच हिंदुस्थान-पाकमधील तणाव आणि अमेरिकेची लुडबुड यावरही राहत इंदौरी परखड भाष्य करतात.

‘सरहदों पर बहुत तनाव है क्या?
कुछ पता तो करो चुनाव है क्या’
खौफ बिखरा है दोनों समतों में
तिसरी समत का दबाव है क्या?

असे बिनधास्त आणि बिनतोड लिहिणारा हा शायर होता. सेक्युलर विचारांची पाठराखण भक्कमपणे करतानाच ‘हिंदुस्थानी’ असल्याचा गर्व बाळगणारे राहत इंदौरी म्हणूनच अवलिया ठरतात. कोणाचीही पत्रास न बाळगता, भीडभाड न करता ते शेवटपर्यंत लिहीत राहिले, व्यक्त होत राहिले. त्यामुळेच तर उर्दू साहित्य आणि शायरीत त्यांचा दबदबा राहिला. शायरीच्या प्रांतात त्यांचा धाकच होता. हा दबदबा, ती विलक्षण ऊर्जा, निडरपणा, परखडपणा आता अस्तंगत झाला आहे.

बुलाती है…
मगर जाने का नई!

या त्यांच्या गझलेने तर लोकप्रियतेचे शिखरच गाठले. साक्षात मृत्यूचे बोलावणे आले तेव्हा मात्र ‘जाने का नई’ या आपल्याच शिकवणीचे विस्मरण राहतजींना झाले. याला दैवदुर्विलास नाहीतर काय म्हणायचे! सूर्य, चंद्र, तारे यांना निचोडण्याची भाषा करणारा

‘शाखों से टूट जाये वो पत्ते नहीं है हम,
आँधियों से कहो की औकात में रहें’

असा खुला आवाज देणारा, स्वाभिमानाची गर्जना करणारा आणि मुशायऱ्यात वाघासारखा दहाडणारा राहत इंदौरी नावाचा ‘शेर’ आता कायमचा अबोल झाला आहे!

आपली प्रतिक्रिया द्या